Sunday, October 17, 2021
No menu items!
Homeक्राईमबाईचा खून करून पुरावा नष्ट केला, स्थानिक गुन्हे शाखेने रहस्यमय घटनेचा छडा...

बाईचा खून करून पुरावा नष्ट केला, स्थानिक गुन्हे शाखेने रहस्यमय घटनेचा छडा लावला

गावात हरिनाम सप्ताह असल्याने सर्वत्र भक्तीमय वातावरण झाले होते. अन् दुसर्‍या दिवशी काही अवचीत एैकायला येणार असे वाटलेही नसतांना एका धक्कादायक पहाटेने अंबाजोगाई तालुक्यातील पोखरी ग्रामस्थांची सुरुवात झाली. ज्या काशीबाईचा खून झाला त्या काशीबाईने आदल्या दिवशी सकाळी सप्ताहाची समाप्ती असल्याने सर्व लोकांना सकाळी जेवण दिले होते. रात्री महाराजांचे कीर्तन असल्याने त्यांनी कीर्तनात हजेरी लावून महाराजाला फुलांचा हार देखील घातला होता. त्यानंतर काशीबाई कीर्तनातून उठून नारळ आणते म्हणून म्हणून नऊच्या दरम्यान जवळच असलेल्या एका किराणा दुकानावर गेल्या होत्या. नारळाचा भाव विचारुन उद्या घेते म्हणून परत गेल्या त्या पून्हा आल्याच नाहीत. त्या नेमकं कुठे गेल्या? का गेल्या? याची मात्र कसलीच माहिती कोणालाच नव्हती. किर्तन संपल्यानंतर सर्वजण आपापल्या घरी जाऊन झोपले मात्र काशीबाई कायमच्या झोपल्या होत्या. कीर्तन संपलं तरी काशी बाई घरी आल्या नाही म्हणून काशिबाईच्या बहिणीची मुलगी सकाळी तिला शोधोत होती. त्याच वेळी पोखरी गावालगत असलेल्या पट्टी नावाच्या शेतात एक जळालेल्या अवस्थेत मृत्तदेह आढळून आला. त्यापूर्वीच अंबाजोगाई ग्रामीण पोलिसात काशिबाई बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाली होती. मात्र मृतदेह पूर्णपणे जळालेला असल्याने तो नेमका कोणाचा आहे? हे पोलिसांना उमगल नाही. मात्र तपासात त्या मृत्तदेहाच्या पायात रॉड असल्याने समोर आले. अन् तो मृत्तदेह २९ नोव्हेंबर २०२० च्या रात्री पासून बेपत्ता असलेल्या काशीबाई विष्णुदास निकम वय ५५ वर्षे यांचा असल्याचे निष्पन्न झाले.


खून कोणाचा झाला हे काही वेळातच पोलिसांसमोर स्पष्ट झाले होते. मात्र खून करणार्‍या ओरोपीने मोठ्या शिताफिनी पुरावे नष्ट केल्याने पोलिसांसमोर एक नवे आव्हान उभे राहिले ते आरोपी शोधण्याचे काशीबाईचा खून कोणी केला? आणि का केला? रात्री साडेनऊ वाजेपर्यंत सर्व गावकर्‍यांनी काशीबाईला पाहिले होते. त्यानंतर शेवटी किराणा दुकानावर आलेल्या काशिबाईला दुकाणदारासह चार लोकांनी पाहिले त्यानंतर काशीबाई एका गल्लीत गेल्या अन् त्या गल्लीतच गयब झाल्या. कारण गल्लीच्या शेवटी काही मुले थांबले होते त्यांना पोलिसांनी विचारले काशीबाई येथून पुढे गेल्या का तर त्या मुलांनी सांगितले आम्ही बारा ते साडेबारा पर्यंत याच गल्लीत थांबलो होतोत त्या येथून पुढे गेल्याच नाहीत. त्यामुळे दुकान आणि त्या दुकानाची किल्ली त्याच्या मध्येच काशीबाईचा घात झाला असावा आणि बाई मोठ्या धिप्पड असल्याने त्यांना रस्त्यावरुन कोणी उचलून नेऊ शकत नाही. त्यांनी सार गाव गोळा केलं असत. त्यामुळे नियोजनबध्द पद्धतीने काशिबाईला घरात बोलावून तिचा काटा काडला असल्याचा संशय स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय भारत राऊत यांना आला आणि त्या दिशेने त्यांनी तपास करत अवघ्या दोन दिवसात त्या रहस्यमय कुणाच्या घटनेचा उलगडा केला.

11 12 2020 crime


अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांना हद्दीतील पोखरी गावात २९ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी जळालेल्या अवस्थेत एक प्रेत आढळले असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस ठाण्याचे निरिक्षक महादेव राऊत यंाच्यासह पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत मृत्तदेह ताब्यात घेवून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. ही महिती स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय भारत राऊत यांना मिळाल्यानंतर त्यांनी ३० नोव्हेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक भगतसिंग दुल्लत, पो.ह.रामदास तांदळे, पो.ना.विकास वाघमारे,सायबर सेलचे संतोष म्हात्रे यांना घटनास्थळी पाठवले. त्यांनी घटनेची बारकाईने पाहणी केली मात्र आरोपीने मोठ्या शिताफीने खून करत सर्व पुरावे नष्ट केले होते. त्यामुळे पोलिसांना आरोपीचा काही सुगावा लागत नव्हता. घटनेची संपूर्ण पाहणी करून आजूबाजूला चौकशीकरत केली. या रहस्यमय कुणाच्या घटनेचा गुन्हा उघड करण्यासाठी दुसर्‍या दिवशी म्हणजेच एक डिसेंबर २०२० रोजी दस्तुरखुद्द स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भारत राऊत हे पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार, अंबाजोगाईचे पोलिस उपअधिक्षक सुनिल जायभाये, यांचे मार्गदर्शन घेऊन घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत पोलीस उपनिरीक्षक भगतसिंग दुल्लत,पो.ह. बालाजी दराडे, तांदळे, विकास वाघमारे, संगीता शिरसाट, सायबर सेलचे संतोष मेहत्रे आणि सलीम शेख हे होते. त्यांनी घटनेची व्यवस्थित पाहणी केली. ज्या रात्री खून झाला होता त्याच्या दुसर्‍या दिवशी अंबाजोगाई पोलीसांनी घटनेचा पंचनामा करुन अज्ञात आरोपी विरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला होता. भारत राऊत यांनी ज्यावेळेस घटनास्थळाची पाहणी केली त्यावेळेस त्यांना अनेक प्रश्न पडले. काशीबाईचा खून कोणी आणि का केला? काशीबाईला याच शेतात आणून मारलं का? एवढ्या रात्री काशीबाई इथे आल्या का की त्यांना गावात मारून येथे आणलं? एक ना अनेक प्रश्न त्यांच्यापुढे होते.

या रहस्यमय घटनेचा उलगडा करण्यासाठी त्यांनी काशिबाईची पार्श्‍वभूमी तपासायला सुरुवात केली. त्यावेळी त्यांच्या निदर्शनास असे आले की काशीबाई ह्या गेल्या १५ ते १६ वर्षापासून माहेरी राहतात. त्या गावातच मोठी सावकारकी करतात. त्यांचा सावकारी व्यवसाय मोठा वाढल्याने आणि त्यांना अपत्य नसल्याने त्यांनी बहिणीची एक बावीस वर्षाची मुलगी आणली होती. जेव्हापासून त्या पतीला सोडून राहतात तेव्हापासून त्याचे अंबाजोगाई येथील एका व्यक्तीशी सूत जुळले होते. मात्र तो पुरुष गेल्या काही वर्षापूर्वीच मृत्यू झाला होता. मात्र तो जिवंत असतांना त्याने त्याची जमिन काशीबाई यांच्या नावे करून दिली होती. आणि त्याचा मुलगा काशीबाईकडे येत-जात असे . त्यामुळे पोलीस निरीक्षक भारत राऊत यांनी त्याच्याकडे संशय नजरेने पाहत त्याची कसून चौकशी केली. मात्र त्याने हा खून केला नसल्याचे त्यांच्या नजरेत आले. त्यानंतर लाखोंची प्रॉपर्टी सांभाळण्यासाठी आणलेल्या बहिणीच्या मुलिनेही पैशाच्या हव्यासापोटी तिचा काटा काढला असावा म्हणून पोलिसांनी सायबर सेलचे शेख सलीम व संतोष मेहत्रे यांच्यामार्फत काशीबाईच्या बहिणीच्या मुलीचे सर्व कॉल डिटेल्स तपासले. त्यात पोलिसांना तिच्यावरचा संशय कमी झाला.त्यानंतर तिच्या मित्राने तर खून केला नाही ना म्हणून त्याचा शोध घेतला असता. ते या दरम्यान बाहेरच असल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी त्या मार्गाचा तपास बंद केला. मात्र खूनाचा काहीच धागा धोरा लागत नसल्याने पोलिसांनी काशीबाईचा त्या दिवसाचा घटनाक्रम पाहण्यास सुरुवात केली. काशिबाईने सकाळी सप्ताहाचा शेवटचा दिवस असल्याने जेवणाची पंगत दिल्यानंतर रात्री साडेनऊ वाजेपर्यंत काशीबाई कीर्तनात दिसल्या. दिवसभर देखील त्यांची कोणासोबत खरखर झाली नव्हती. किर्तन सुरु झाल्यानंतर महाराजाला फुलाचा हार घालून त्या जवळच असलेल्या भाऊसाहेब हरिदास थोरात यांच्या किराणा दुकानात नारळ आणण्यासाठी गेल्या होत्या.

त्या दुकानासमोर चार-पाच लोक असल्याने त्यांनी बाहेरूनच नारळाचा भाव विचारला अन् दुकानदाराने बावीस रुपयाला एक नारळ आहे असे सांगितल्यानंतर काशीबाई म्हणाल्या राहू द्या उद्या घेते असे म्हणून काशीबाई एका बोळीत शिरल्या. तोपर्यंत काशिबाईला दुकानदारासह दुकानासमोर असलेल्या चार लोकांनी पाहिले होते. मात्र पुढे नेमकं काशीबाई कुठे गेल्या? हे त्यांनाच माहीत होतं. ज्या गल्लीत काशिबाई गेल्या त्या गल्लीत पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर रात्री त्या गल्लीच्या शेवटला काही तरुण थांबलेले होते. ते किर्तन संपेपर्यंत तेथेच होते. त्यांना पोलिसांनी विचारले असता या गल्लीच्या पुढे काशीबाई गेल्याच नाही असे त्यांनी पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांना दुकानापासून त्या गल्लीपर्यंत काशीबाईचे काहीतरी बरेवाईट झाले असल्याची शंका आली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय भारत राऊत यांनी त्यांच्या स्टाईलने त्या गल्लीत तपास सुरू केला. त्यांनी कोणालाच काही त्रास न देता त्या गल्लीतील प्रत्येक लोकांचे आणि काशीबाईचे कसे संबंध आहेत हे सुरुवातीला तपासले त्यावेळेस याच गल्लीत राहणार्‍या दुकानदाराकडे काशीबाईचे पैसे असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. शिवाय त्याच्या आदल्या दिवशी तिने बहिनीच्या मुलीला त्या दुकानदाराकडून वसूली करायची आहे असे सांगितले होते. यावरु पोलिसांचा संशय बळावला आणि आरोपी ह्या घरात असल्याचा संशय पोलिसांना आला. मात्र पोलिसांनी त्यांना सरळ सरळ विचारपूस करण्यास सुरुवात केली तेव्हा आम्ही सधन घरचे आहोत. आम्ही त्यांचा खून का करावा? असा प्रतिप्रश्‍न पोलिसांनाच त्यांनी केला. पोलिसांच्या प्रश्‍नाला दिलेल्या उत्तरातून आणि घरच्या वातावरणामुळे पोलिसांनाही एक वेळेस वाटले आपला तपासाचा ट्रॅक चुकत तर नाही ना? मात्र स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय भारत राऊत यांच्या नजरेतून आरोपी सुटणे तेवढे सोपे नाही. दुकानदार भाऊसाहेब हरिदास थोरात यांच्या घरातील सर्व लोकांची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी त्यातील चार जणांना बाजूला काढले. म्हणजेच भाऊसाहेब थोरात आणि त्यांचे तीन मुले.

अन् त्यांना खाक्या दाखवण्यास सुरुवात केली. पोलिसांनी भाऊसाहेब थोरात यांना खाक्या दाखवल्या मात्र पोलिसांचे रट्टे सहन करत मी खून केलाच नाही असे तो सांगू लागला. बापाचाच पाढा पोरही वाचू लागले. मात्र या चौघांमध्ये आरोपी दडला आहे अशी पुरेपूर खात्री भारत राऊत यांना झाल्यानंतर त्यांनी बापासमोर लेकाला खाक्या दाखवण्यास सुरुवात केली. त्यामुळे बाप तो बाप असतो पोटच्या पोराला डोळ्यासमोर पोलीस सोलत असल्याचे पाहून बाप ओरडला साहेब थांबा नका मारू माझ्या लेकराला मीच खून केला काशिबाईचा. हे काम एकट्याचे नव्हते हे पोलिसांना महित होते. मात्र पोराला आणि घरच्यांना वाचविण्यासाठी तो एकटा आरोपी असल्याचे दाखवत होता. मात्र तीला घरात मारले तेव्हा हे सर्व कुठे होते. तु एकट्याने नाही तर सर्वच यात सहभागी असल्याचे पोलिस म्हणताच नाही साहेब सर्वजण नाही मी एकट्यानेच मारले आहे. घटनाक्रम सांगतो म्हणून तो पोपटासारखा बोलू लागला नेमकं २९ नोव्हेबर २०२० च्या रात्री काय घडलं याचा तो पोलिसांपुढे पाढा वाचू लागला. तो म्हणाला की माझ्याकडे काशीबाईचे व्याजाने घेतलेली पैसे होते. आणि ते पैसे त्यांनी मला २९ तारखेला द्यावेच लागतील असे सांगितले होते. जर २९ तारखेला पैसे दिले नाही तर याद राख म्हणून धमकीही दिली होती. २९ तारखेच्या रात्री काशीबाई नऊ वाजता माझ्याकडे पैसे मागण्यासाठीच माझ्या दुकानावर आल्या होत्या. मात्र दुकानात इतर चार लोक असल्याने काशीबाई नारळाचा भाव विचारून निघून गेल्या. मी रात्री साडेनऊच्या दरम्यान दुकान बंद करून घराकडे निघालो तेव्हा काशीबाई माझी वाट पाहत त्या बोळीतच थांबल्या होत्या. त्यावेळेस मला काशीबाई यांनी त्या बोळीतच आडवून माझे पैसे आत्ताच देवून टाक मला बाकी काही माहीत नाही. असे म्हणून माझा रस्ता अडवला. आजचा दिवस थांबा उद्या तुमचे पैसे देऊन टाकतो अशी मी त्यांना विनंती केली मात्र त्या काहीही ऐकत नव्हत्या. त्यामुळे मी पैसे देतो म्हणून माझ्या दुकानाच्या मागील आमच्याच रिकाम्या खोलीत त्यांना घेऊन गेलो. पैसे आणायला म्हणून पाठीमागे जावून हातात लोखंडी ठोंबा आणाला तसा पाठीमागून काशीबाईच्या मस्तकात घातला. त्यात त्या रक्ताच्या थारोळ्यात खाली पडल्या. मी दुसर्‍याच क्षणात पुन्हा एक ठोंबा त्यांच्या डोक्यात घातला अन् त्यांच्या तोंडात कापड कोंबून त्यांच्या मरणाची वाट पाहत बसलो. काही वेळातच काशीबाई गेल्याचे कळल्यानंतर त्यांना तेथेच सोडून बाहेर आलो आणि मुलगा विशाल ज्याच्याकडे जाऊन त्याला घरातून बाहेर आणले आणि मी काशीबाईचा खून केल्याचे त्याला सांगितले. विशालने खोलीत जाऊन पाहिले असता तुम्ही असे का केले? आपण जमीन विकून त्यांचे पैसे देऊन टाकले असते असे त्याने मला सांगितले. मात्र रागाच्या भरात माझ्याकडून हे कांड झाल्याचे त्याने त्याला सांगितले. कीर्तन मोडले आणि लोक आपापल्या घरी जाऊ लागले.

मात्र ते गाव शांत होण्याची वाट पाहत तिथेच थांबले होते. गाव शांत झाल्यानंतर काशीबाईचा मृतदेह पोत्यात घालून ते मोटर सायकलवरून एका शेतात गेले व सोयाबीनच्या ढिगार्‍यावर काशीबाईला टाकून त्यांच्या गाडीतील पेट्रोल काढून त्याला आग लावून दिली. नंतर ते दोघेही घरी आले. घरी आल्यानंतर भाऊसाहेब यांनी त्या खून केलेल्या खोलीमध्ये पडलेले रक्ताचे डाग साफ केले व स्वतःच्या अंगावरही रक्त पडल्यामुळे त्यांनी ते कपडे काढून एका रिकाम्या बॉक्समध्ये टाकले आणि दुसर्‍या दिवशी ते स्वतःच्या शेतात जाळले. असा घटनाक्रम त्याने पोलिसांना सांगितला. या खुनात ते दोघेच बापलेक असून अन्य दोन मुले निष्पाप असल्याचे समोर आले. त्यामुळे अंबाजोगाई पोलिसात भाऊसाहेब थोरात व विशाल भाऊसाहेब थोरात यांच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना अटक केली. ही रहस्यमय घटना उघड करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भारत राऊत यांना पोलीस अधिक्षक राजा रामास्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार, अंबाजोगाईचे पोलिस उपअधिक्षक सुनिल जायभाये यांचे मार्गदर्शन लाभले. तर त्यांना या तपासात अंबाजोगाई ग्रामीणचे ठाणेप्रमुख महादेव राऊत, स्थ.गु.शाखेचे उपनिरीक्षक भगतसिंग दुल्लत, पो.ह. बालाजी दराडे,पो. ना. रामदास तांदळे, पा. ना. विकास वाघमारे, म. पो.ना. संगीता शिरसाट, सायबर सेलचे सलीम शेख, संतोष मेहेत्रे यांनी सहकार्य केले. या प्रकरणाचा पुढील तपास अंबाजोगाई ग्रामीण पोलिस करत आहेत.

11 12 2020 crime

Most Popular

error: Content is protected !!