गणेश सावंत –
जिथे देशाचे पंतप्रधान थेट संसदेमध्ये शेतकर्यांच्या न्याय हक्काच्या मागण्यांवर हल्लाबोल करतात, त्यांच्या आंदोलनाला ‘आंदोलनजीवी’ म्हणतात, ज्या देशाचे पंतप्रधान पोषाखावरून देशवासियांची ओळख जाहीर सभेतून जगाला सांगतात त्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात देशाच्या सर्वोच्च मंदिरामध्ये आता काही शब्दांना बंदी घातली जातेय. जिथं सार्वभौम असायला हवं, जिथं लोकशाही असायला हवी तिथं हुकुमशाहीचे पाय रुतताना दिसून येतात. ज्या लोकशाहीच्या मंदिरातून लोकहिताचे कामे व्हायला हवेत, तिथे आम्हाला कोणी हरामी, काळे सत्र, दलाल, खून की खेती, नौटंकी, खलिस्तानी, हुकूमशाही, हुकूमशहा, अराजकतावादी, देशद्रोही, बदनामी, गिरगिट, काळा दिवस, काळाबाजार, घोडेबाजार, संवेदनाहीन, जुमलाजीवी, कोरोना स्प्रेडर, बाल बुद्धी, शर्म, दुर्व्यवहार, विश्वासघात, ड्रामा, पाखंड, अक्षम, शकुनी, लॉलीपॉप, चांडाल, गुल खिलाए, पिट्टू, कोयला चोर, गोरु चोर, चरस पीते हैं, सांड, विनाश पुरुष, अपमान, गूंस, घडियाली आंसू, असत्य, अंहकार, खरीद फरोख्त, दादागीरी, लैंगिक छळ, बेचारा म्हणू नये यासाठीच ही धडपड म्हणावी का. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या वरील शब्दांना संसदेत बंदी घातली आहे. जिथे शब्दांचे रत्न होतात, जिथे शब्दांचे शस्त्र व्हायला हवेत तिथच ही शब्दावरची हुकुमशाही, दादागिरी होत असेल तर त्या शब्दातून असे काव्य बाहेर पडेलच.
‘काळेसत्र’ त्यातले ‘हुकूमशाही’ पत्र
सत्य लपवण्यासाठी ‘असत्य’ावर अस्त्र
‘खून कि खेती’ कर के ‘गिरगिट’
भारतीयांना शिकवतो शास्त्र
हक्क मागणारा शेतकरी
इथं आंदोलनजीवी
माणसांची ओळख
जिथं पोशाख करवी
तो ‘बालबुद्धी’ ‘विनाशपुरुषी’
‘अराजकता’ वादी ‘खलिसस्तानी’
‘घोडेबाजार’ात गाळतो ‘घडियाली आंसू’
‘पाखंड’ातला हा ‘शकुनी’
‘जुमलाजिवी’ची ही ‘दादागिरी’
‘लैंगिक छळ’ालाही फळवते
सत्तेच्या माजावरचा ‘सांड’
देशात ‘अराजकता’ माजवते
सत्तेतले ‘हरामी’ ‘दलाल’
संसदेत चालवतात ‘काळेसत्र’
‘दुर्व्यवहार’, ‘ड्रामा’, ‘पाखंड’ अन्
‘लॉलीपॉप’, ‘चांडाल’ यांचे मित्र
‘अच्छे दिन’ची नौटंकी
आठ वर्षांचे ‘काळे सत्र’
संवेदनहीन गुरू चोर
बदनामीचा करतो शोर
असे म्हटले तर ते चुकीचे काहीच नसेल. इथं शब्दांना बंधने घातले जातील, भावनेला बंधन घातले जातील मात्र लोकांच्या मुलभूत गरजांकडे लक्ष द्यायला कोण आहे? अशा वेळी आपल्या शब्दांच्या फटकार्यातून संतांनीही तत्कालीन राज्यकर्त्यांना वेळोवेळी सुनावले. इथे लोकसभा अध्यक्षांच्या शब्दबंदीतील शब्दातून आम्हाला जे उमजले ते आम्ही येथे मांडले. खरंतर शब्दांना मर्यादा नाहीत हे अनेक वेळा दिसून आलं आणि जेव्हा पार्लमेंटचा विषय आला तेव्हा नामदेव ढसाळांनीही आपल्या विद्रोही भाषेत अनेक शब्दरचना केल्या. तत्पुर्वी संत कबीरजी सत्य मांडताना हे भाष्य केले…
गांडू भडवे रण चढे, मर्दो के बेहाल
पतिव्रता भुखन मरे,पेढे खाये छिनाल
या दोह्यातील शब्दरचनेपेक्षा सध्यातरी अन्य काही परिस्थिती देशात दिसून येत नाही. सत्याला सत्य म्हणणे, सत्यासाठी झगडणे इथे आंदोलनजीवी होतात. मात्र सत्तेसाठी अवैधरित्या जे काही होते ते यथायोग्य असते. अन्य पक्षात असलेला व्यक्ती इथे भ्रष्टाचारी असतो मात्र तोच सत्ताधार्यांच्या पक्षात आला की, सद्गृहस्थ होतो. हे वेदनादायीच. परंतु विद्रोह करताना, सत्य मांडताना ज्या शब्दांचा प्रयोग केला जातो ते शब्द रत्नही असतात आणि शस्त्रही असतात. जेव्हा जाती व्यवस्थेचा विषय हाताळला जातो आणि कपड्यावरून माणसाची ओळख दिली जाते तेव्हा भारतरत्न बाबासाहेबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. जातीव्यवस्थेने घातलेल्या मनामनाच्या बेड्या वागवत, मान खाली घालून चालत असलेल्या समाजात बाबासाहेबांनी स्फुल्लिंग चेतवलं आणि वणवा पेटला. याच वणव्याचा धगधगता झेंडा खांद्यावर घेतलेल्यांपैकी एक नामदेव ढसाळ. ढसाळ यांनी शब्दांचा अक्षरश: हत्यारासारखा उपयोग केला आणि शोषक व्यवस्थेचे वाभाडे काढले. ’तुझे बोट धरून चाललो आहे मी’ या कवितांमध्ये ढसाळ म्हणतात…
हा भाकरीचा जाहीरनामा
हा संसदेचा रंडीखाना
ही देश नावाची आई
राजरोस निजते कुबेराच्या सोबत
ही वस्तूस्थिती नव्हे का? इथे शेतकरी आत्महत्या करतो, बेरोजगार मरमर मरतो. छोटा व्यापारी, कष्टकरी, कामगार यांचे हाल तर विचारू नका. परंतु इथे अदानी-अंबानी कसे आहेत हे सांगण्याची गरज नाही. अशा वेळी एवढच म्हणू…
तेच तेवढे आईच्या उदरातून आलेत?
बाकीचे कुत्र्या-मांजराच्या!
या शब्दातले हे त्रोटक उदाहरणे. अभंग पहा, दोहे पहा, तुकडोजींना पहा, गाडगेबाबांना पहा… त्यांचा शब्द हा शब्दच आहे. तेच आम्ही शिकलो, सत्यासाठी भांडायचे, बोलायचे, लिहायचे तिथे शब्दांना बंधन नाही.