मुंबई (रिपोर्टर) विधानसभा निवडणूक जवळ आल्याने शरद पवार यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि लालबागचा राजाची आठवण झाली आहे. शरद पवार यांनी लालबागचा राजाचे दर्शन घेणे म्हणजे ढोंगीपणा आहे, असे वक्तव्य भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी केले. मध्यंतरी शरद पवार 40 वर्षांच्या खंडानंतर किल्ले रायगडावर गेले होते. ते मुख्यमंत्री होते तेव्हा लालबागचा राजाच्या दर्शनाला आले होते. त्यानंतर आता 30 वर्षांनी ते पुन्हा लालबागचा राजाच्या दर्शनाला आले. माझी देवाकडे एवढीच प्रार्थना आहे की, शरद पवार यांना हिंदुत्त्वाबाबत सुबुद्धी मिळो, असे दरेकर यांनी म्हटले.
शरद पवार यांनी सोमवारी सकाळी जावई सदानंद सुळे आणि नात रेवती सुळे यांच्यासह लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यानंतर प्रवीण दरेकर यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले. त्यांनी म्हटले की, ज्ञानेश्वर महाराव यांनी शरद पवार यांच्यासमोर प्रभू रामचंद्र, विठुराया आणि हिंदुत्त्वाचा अपमान केला. त्यावर काहीही न बोलता शरद पवार लालबागच्या राजाच्या दर्शनाला आले. निवडणुकीसाठी नौटंकी का होईना पण लालबागच्या राजाने शरद पवार यांना सुबुद्धी दिली. पण महाराष्ट्राच्या जनतेला ही ढोंगी श्रद्धा दिसून येत आहे, असे खोचक वक्तव्य दरेकर यांनी केले.
शरद पवार आणि अमित शाह लालबागचा राजाच्या दर्शनाला
शरद पवार आणि अमित शाह या दोन बड्या नेत्यांनी सोमवारी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. शरद पवार हे सोमवारी सकाळी त्यांचे जावई सदानंद सुळे आणि नात रेवती सुळे यांच्यासह लालबागचा राजाच्या दर्शनाला आले होते. यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेले होते. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील लालबागमध्ये उपस्थित होते. मात्र, यावेळी अजित पवार हजर नसल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे महायुतीमधून बाहेर पडतील, अशी चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांची लालबागमधील गैरहजेरी अनेकांच्या नजरेत भरणारी ठरली.