Thursday, October 21, 2021
No menu items!
Homeबीडमजुरांना सुरक्षतेचे कवच असतांनाही मजुर असुरक्षित

मजुरांना सुरक्षतेचे कवच असतांनाही मजुर असुरक्षित


शासकीय कामावरील मजुरांना विमा, मजुरांना काम करण्यासाठी सुरक्षा किट देणे बंधनकारक; अनेक ठिकाणी
मजुरांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा न देता त्यांच्याकडून जास्तीचे तास काम करून घेवून ओव्हर टाईम देत
नसल्याचेही चर्चा; मजुर संघटनेने शासकीय कामाचा आढावा घेवून मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्‍न उपस्थित करावा
बीड (रिपोर्टर):- उन्हाळा, हिवाळा, पावसाळा असो मोल मजुरी करण्यासाठी हमखास मजुर हातात जेवनाचा डब्बा घेवून बाहेर पडतात. दुपारपर्यंत हाताला काम मिळाले नाही तर तो डब्बा तसाच घेवून रिकाम्या हाती घरी पोहचतात. बीड जिल्ह्यात एमआयडीसी नसल्याने बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

वेळेवर बीड जिल्ह्यातील बेरोजगार तरूण मिळेल ते काम करून आपली उपजिविका भागवतांना दिसतात. अनेक वेळेस अशा मजुरांसोबत काम करतांना दुर्घटना घडते. त्यावेळी मध्यस्थाकडून संबंधित गुत्तेदार दुर्घटनाग्रस्त मजुराला मदत करतो. परंतू ज्या मजुरांना शासन विमा देवून सुरक्षा कवच देते अशा मजुरांना मदत मागविण्याऐवजी न्याय मिळवुन देण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे कामावरील मजुरांची असुरक्षितता. मजुरांच्या सुरक्षेकडे ते स्वत: लक्ष देत नसले तरी मजुरांची सर्व जबाबदारी संबंधित गुत्तेदाराची असते. काही मोठी घटना घडली तरच मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्‍न उपस्थित होतो.

नसता काम करतांना छोट्या-मोठ्या घटना घडतात. त्याकडे संबंधित गुत्तेदारही लक्ष देत नसल्याने मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आलेला आहे. तसेच नियमाने मजुरांकडून आठ तास काम करून घेणे अपेक्षित असतांना त्यांची पिळवणुक कगरून दहा-दहा तास त्यांच्याकडून काम करून घेत असल्याचेही दबक्या आवाजात बोलले जात असून मजुरांना जास्तीचा ओव्हरटाईम देण्यासाठी ही कोणती संघटना पुढे येत नाही याकडे प्रशासनाने विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
सध्या रेल्वेचे काम प्रगतीपथावर असून चर्‍हाटा फाट्यापुढे रेल्वे पुलाचे काम सुरू आहे. या कामासाठी संबंधित गुत्तेदाराने इतर राज्यातुन किंवा जिल्ह्यातुन मजुर आणलेले दिसून येते. हे मजुर सध्या त्या ब्रीजचे काम करत आहेत. रिपोर्टरच्या प्रतिनिधीने संबंधित कामावर जावून पाहणी केली असता पुलाचे काम प्रगतीपथावर असले तरी काम करणारे मजुर असुरक्षित दिसून आले. शासकीय कामावरील मजुरांना विमा कवच असतो.

नियमाने मजुरांकडून काम करून घेतांना त्यांना सुरक्षा कीट देणे बंधनकारक आहे. उदाहरणार्थ डोळ्याला चष्मा, हातात हँडग्लोज, पायात बुट, डोक्याला हेलमेट तसेच कामावर युनिफॉर्म घालून जाणे गरजेचे आहे. अशा प्रकारे सुरक्षा असतांनाही एकाही कामावर मजुर अशा प्रकारे सुरक्षित काम करतांना दिसून येत नाही. एखाद्या ठिकाणी मजुरासोबत मोठी दुर्घटना घडली तर त्या मजुराच्या नातेवाईकाला मॅनेज करून संबंधित गुत्तेदार भरपाई देतो. अशा प्रकारे असुरक्षित मजुरांना न्याय मिळून देण्याऐवजी लाख-दोन लाखात मांडवली केली जाते. तसेच अनेक ठिकाणी मजुर आठ तास ऐवजी दहा ते बारा तास काम करतांना दिसतात. नियमाने ८ तास काम करून घेणे बंधनकारक आहे.

यापुढे जास्तीचे काम करायचे असेल तर संबंधित कंपनीने मजुरांना ओव्हरटाईम देणे बंधनकारक आहे. परंतू अनेक ठिकाणी मजुरांची पिळवणूक होत असतांनाही कोणतीही मजुर संघटना मजुरांच्या अशा गंभीर प्रश्‍नाकडे लक्ष देतांना दिसून येत नाही. प्रशासकीय अधिकारी ज्यावेळी साईडवर जावून कामाची पाहणी करतात त्यावेळी असुरक्षित मजुर त्यांच्यासमोर सर्रास विना कीटचे काम करतांना दिसतात.

तरी प्रशासन प्रशासकी अधिकारी संबंधित गुत्तेदाराला मजुरांच्या सुरक्षे संबंधी कोणत्याही प्रकारची विचारना करत नाही. अशा प्रकारे ही एक मजुरांची पिळवणुक असून विना कंपनीने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

दुर्दैवी घटना घडल्या तरी दुर्लक्ष
मजुरांसोबत अनेक वेळेस काम करतांना दुर्दैवी घटना घडतात. हमखास विद्युत कामे व ड्रेनजचे कामे करतांना अनेक मजुरांना आपले प्राण गमवावे लागले. काही दिवसापूर्वी ड्रेनेजमध्ये दम कोंडून मजुराचे प्राण गेल्याची घटना घडलेली आहे.

तसेच विहिर खांदतांना, विद्युत खांबावरून पडून मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटना समोरच आहेत. एवढे काही असतांना संबंधित मजुराला सुरक्षा काय होती याकडे कोणीही लक्ष देत नाही. संबंधित अधिकारीही गुत्तेदारासमोर मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्‍न उपस्थित करत नसल्याने हे मजुर दुर्लक्षित होत असावेत. किमान प्रशासनाने मजुरांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष दिले तर दुर्दैवी घटना थांबतील.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!