पवारांनी शिवसेनाप्रमुख पदासह ठाकरेंना दिल्या शुभेच्छा
मुंबई (रिपोर्टर) शिवसेनेतील 40 आमदार आणि 12 खासदार फोडल्यानंतर एकनाथ शिंदे हे आता संपूर्ण पक्षावरच कब्जा करायला निघाले आहेत. या सगळ्यात त्यांना भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पडद्यामागून कायदेशीर रसद पुरवत आहेत. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शिवसेना आता उद्धव ठाकरे यांची कशी राहिली नाही, आमदार-खासदारांचे बहुमत कसे आपल्या बाजूने आहे, या गोष्टी वारंवार जनमानस आणि शिवसैनिकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न होत आहे. याचाच एक भाग म्हणून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी उद्धव ठाकरे यांना ’हातचे राखून’ वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. या दोघांनीही उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देताना एकसारखाच मजकूर ट्विट केला आहे. यामध्ये दोघांनीही उद्धव ठाकरे यांचा उल्लेख माजी मुख्यमंत्री असा केला आहे, पण त्याचवेळी उद्धव ठाकरे यांची शिवसेना पक्षप्रमुख ही उपाधी काढून घेण्यात आली आहे. यामधून शिंदे आणि फडणवीस यांनी शिवसेना ताब्यात घेण्याच्या भविष्यातील आपल्या वाटचालीची दिशा स्पष्ट केली होती. या पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि संकटमोचक म्हणून ओळख असलेले शरद पवार हे उद्धव ठाकरे यांच्या मदतीसाठी धावून आले आहेत.
शरद पवार यांनी काहीवेळापूर्वीच उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी पोस्ट टाकली आहे. यामध्ये शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख जाणीवपूर्वक ’शिवसेना पक्षप्रमुख’ असा केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! श्री. ठाकरे यांना दीर्घायु चिंतितो व नव्या भावी संकल्पांसाठी शुभकामना, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. त्यामुळे आगामी काळात शिवसेनेचा पक्षप्रमुख कोण, यावरुन राजकीय संघर्ष तीव्र होणार आहे.
सध्या शिंदे गटातील 16 बंडखोर आमदारांची अपात्रता आणि शिवसेना पक्ष कोणाचा, याबाबतच्या याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. एकनाथ शिंदे गटाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना पक्ष आपल्या नावावर करावा, अशी मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटाला यासंदर्भात पुरावे सादर करण्याचे आदेश दिले होते. याविरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेची ही याचिका दाखल करुन घेतली होती. त्यामुळे आता शिवसेना कोणाची, हा निकालही सर्वोच्च न्यायालयात लागण्याची चिन्हे दिसत आहेत.
एकनाथ शिंदेंनी बोलणं टाळलं
माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना, शिवसेनेचे बंडखोर तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोशल मिडीयावर शुभेच्छा देताना शिवसेनाप्रमुख असा उल्लेख टाळल्याचे निदर्शनास आल्यानंतर याबाबत पत्रकारांनी मुख्यमंत्री शिंदेंना विचारलं असता त्यावर बोलणं एकनाथ शिंदेंनी टाळलं.