संबधित अधिकाऱ्यांसह ठेकेदारालाही कडक शब्दात सुनावले
गेवराई (रिपोर्टर) : गेवराई -उमापूर- शेवगाव डांबरी रस्ता अवघ्या दोनच महिन्यात उखडला असून, अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. दरम्यान, अवघ्या दोन महिन्यातच रस्ता उखडल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांनी संताप व्यक्त केला असता याबाबत वृत्तपत्रात बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर याची दखल घेत आ.लक्ष्मण पवार हे रात्री मुंबईहुन परतले असता आज सकाळी तात्काळ त्यांनी थेट उमापूर येथे जाऊन या रस्त्याची पाहणी करून ठेकेदारासह बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना झापले असून मी यापुढे असा बोगसपणा खपवून घेणार नाही असे सांगत कडक शब्दात सुनावले. गेवराईहुन उमापूर कडे जाणारा जालना फाटा ते उमापूर पर्यंत चा रस्ता अत्यंत खराब झालेला होता. गेल्या कित्येक वर्षांपासून या रस्याची दैनिय अवस्था आहे. हा राज्यमार्ग असून या ठिकाणाहून गेवराई मार्गे उमापूर, शेवगाव, नगर, शिर्डी, पुणे, मुंबई कडे जाता – येता येते. म्हणून, या रस्त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र, या रस्त्याची दैयनिय अवस्था संपलेली नाही. आमदार पवार यांच्या काळात हा रस्ता थोड्याफार प्रमाणात बरा झाला होता. त्यानंतर, या रस्त्यासाठी आ. पवारांनी आणखी निधी उपलब्ध केला होता. परंतू , भाजपा-सेनेचे सरकार गेले आणि 2019 साली ठाकरे यांचे आघाडी सरकार सत्तेवर आले. दुर्दैवाने त्या सरकारच्या अडीच वर्षाच्या काळात, या रस्ता कामाला सुरुवात झाली नाही. आ. पवार यांनी संबंधित ठेकेदाराला अनेकदा सूचना देऊन सरकारकडे पाठपुरावा ही केला. मात्र, गुत्तेदाराने रोज नवी नवी कारणे दिली. अखेरीस आ.पवार यांच्या पाठपुराव्यामुळे गुत्तेदाराने मुहूर्त साधून दोनच महिन्यात काम उरकून मनमानी कारभार केला. त्यानंतर, अवघ्या दोन महिन्यात रस्ता उखडायला सुरूवात झाली असून, अनेक ठिकाणी या नव्या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या देखरेखीत संबंधित ठेकेदाराने हा रस्ता पंधरा दिवसांत पूर्ण केला होता. मात्र संबधित अधिकाऱ्यांनी ही याकडे दुर्लक्ष केल्याने हा रस्ता दोनच महिन्यात उखडला असून याबाबत बातम्या प्रसिद्ध होताच याची दखल घेत आ.लक्ष्मण पवार यांनी आज सकाळीच संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह थेट उमापूर येथे जाऊन या रस्त्याची पाहणी करत प्रचंड संताप व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांसह ठेकेदाराला झाप झाप झापले व हा रस्ता पुन्हा तात्काळ दुरुस्त करून दर्जेदार करा असे सांगत यापुढे असा बोगसपणा खपवून घेणार नाही असे कडक शब्दात सुनावले. यावेळी त्यांच्यासमवेत उप विभागीय अभियंता भोरे, शाखा अभियंता बोंद्रे, ठेकेदार वाघमारे, प्रा.शाम कुंड पत्रकार संघाचे अध्यक्ष मधुकर तौर, सुभाष सुतार, जुनेद बागवान, प्रा.येळापुरे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.