Friday, January 22, 2021
No menu items!
Home संपादकीय संपादकीय- नांगरी संस्कृतीला व्यवस्थेचा शाप आहे का? बळी तरी किती घेणार?

संपादकीय- नांगरी संस्कृतीला व्यवस्थेचा शाप आहे का? बळी तरी किती घेणार?


गणेश सावंत
९४२२७४२८१०

अखंड हिंदुस्तानमधल्या नागरी आणि नांगरी संस्कृतीपैकी नांगरी संस्कृतीत वाढलेल्या लोकांच्या पदरी कायम काबाड कष्ट, मेहनत, संघर्ष पाचवीला पुजलेला. मात्र हा संघर्ष आणि ही मेहनतच आपलं सर्वस्व समजून नांगरी संस्कृतीतले लोक घामाचं रक्त ओकत काळ्या आईच्या उदरात आपल्या घामाचं पीक काढुन जगाचा पोशिंदा होणं पसंद करतात. जगाचा पोशिंदा होण्यासाठी जी मेहनत करावी लागते त्या मेहनतीच चीज नांगरी संस्कृतीत वाढलेल्यांनी केलं तर नांगरी संस्कृतीत राबराब राबणार्‍यांना ते बरं वाटेल, समाधानाचं वाटेल परंतू ते समाधान व्यवस्थेमार्फत येईलच हे सांगणे आज मित्तीला कठीण होवून बसलयं. नागरी संस्कृती म्हणजे शहरात वसलेले, अभ्यासलेले सुशिक्षीत लोक आणि नांगरी संस्कृती म्हणजे शेतात राबराब राबणारे, घरात मीठ मिरची खावून कर्तव्य, कर्मालाच महत्त्व देणारे परंतू त्या कर्तव्य कर्माला आणि श्रमाला ज्यांच्याकडून न्याय मिळायला हवा त्या शासन प्रशासन व्यवस्थेकडून न्याय मिळत नसला तरीही जगाचा पोशिंदा म्हणून धान्य उत्पादन करायचं तेच आपलं जगणं, तोच आपला जीवन धर्म मानणारा शेतकरी
धर्म आहे ज्या कुळाचा, दो करांनी देत जावे |
शिवाराची होत सुबी, पाखरांना तोषवावे ॥
माणसासोबत सजीव सृष्टीतील पशु पक्षांच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी या नांगर धार्‍यांची, शेतकर्‍यांची, कुणब्याची आहे. ती जबाबदारी ते तंतोतंत पार पाडतात. बरे झाले देवा कुणबी केले नाही तर दंभेची असतो मेले हा जगद्गुरू संत तुकोबांचा सिद्धांत डोळ्यासमोर ठेवून मोठ्या अभिमानाने मी नांगरी संस्कृतीत जन्माला आलेलो असलो, माझ्या नशिबी कायम काबाड कष्ट असले तरीही देवा मला तु कुणब्याच्या कुळात जन्माला घातलस. शेतकरी म्हणून जन्माला घातलस हे बर केलं म्हणणारा शेतकरीच आहे. परंतू त्याच शेतकर्‍याचे आज देशभरात जे हाल होत आहेत त्या शेतकर्‍याच्या आजच्या परिस्थितीला जबाबदार कोण? हा प्रश्‍न उपस्थित झाल्यानंतर शासन आणि प्रशासन व्यवस्थाच जबाबदार असल्याचे आम्ही स्पष्टपणे सांगू. अखंड सजीव सृष्टीतील प्राणी मात्रांच्या पोटापाण्याची गरज भागवणारा शेतकरी स्वत:च्या घरात अठराविश्‍व दारिद्रय आल्यानंतर आता


सरणाला जवळ
करतोय, विष पितोय, स्वत:च्या शेतात गळफास घेतोय, आपल्या घरातल्या म्हातार्‍या आई-बापांची काठी मोडतोय, बायकोचं कुंकु पुसतोय, लेकरा बाळांच्या डोक्यावरचं छत हिरावून नेतोय हे केवळ आजच्या व्यवस्थेमुळेच होतय. राज्य असो या केंद्र या दोन्ही सत्ता पटलावर उद्योजक व्यावसायिक यांच्याकडे जेवढ्या प्रकर्षाने लक्ष दिलं जातं तेवढ्या प्रकर्षने नांगरी संस्कृतीत वाढणार्‍या शेतकर्‍याकडे लक्ष दिलं जात नाही. तो राबराब राबतो, घामाचं पाणी काढतो त्याच्या मेहनतीला फळही येतं परंतू कधी ते फळ निसर्ग हेरावून नेतो तर कधी शासन प्रशासन व्यवस्थेतला भाव अक्षरश: हिसकावून घेवून जातो. अशा वेळी पदरमोड आणि मुद्दलात घाटा होत राहिला तर तो शेतकरी सरशेवटी सरणाला जवळ करतो. दुर्दैव याचं वाटतं उद्योग, व्यवसायात लाखो कोट्यवधी रूपये कर्ज असलेले उद्योजक आत्महत्या करत नाहीत. देशा बाहेर पळून जात अय्याशी करतांना दिसतात. त्या उद्योजकांना आमचं सरकार मोठ्या प्रमाणात जे द्यायचं ते देत राहत मात्र शेतकर्‍यांच्या मालाला भाव देत नाही, फळ भाज्यांना भाव देत नाही. शेतकर्‍यांना मोठी उभारी मिळावी यासाठी अर्थांजनांची तेवढी मदतही केली जात नाही. परिणामी


राक्षसभुवन मधला
बालासाहेब होतो

बीड जिल्ह्यातल्या राक्षसभुवन बालासाहेब मस्के हा उमदा तरूण आपल्या शेतामध्ये वेगवेगळे प्रयोग करायचे, आपण ज्या शेतकर्‍याच्या पोटी जन्माला आलो आहोत त्याचे सार्थक करून दाखवायचे यासाठी सातत्याने प्रयत्नांची परिकाष्टा करायचा, शेतात नवे नवे प्रयोग करायचा. फळबाग असेल, पाल्याभाज्या असतील, कापूस, सोयाबीन यासह अन्य पीके घेण्यासाठी धडपडायचा तो स्वत:च्या शेतातच नव्हे तर गावातल्या शेतकर्‍यांना सोबत घेवून शेतीमधून जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येईल, काळ्या आईची सेवा करतांना घरामध्ये धनधान्याच्या राशी कशा लागतील यासाठी उद्बोधन करायचा.

शेतकर्‍यांना जागृक करायचा. शासनामार्फत मिळणार्‍या योजना तंतोतंतपणे राबवायचा परंतू शासन प्रशासन व्यवस्थेकडून यावेळेस अशी काही गल्लत झाली म्हणण्यापेक्षा गेंड्याची कातडी पांघरलेल्या प्रशासन व्यवस्थेने ती जाणीवपुर्वक केली अन् तरण्याताठ्या शेतकर्‍याला थेट यमाच्या दारात या व यवस्थेने नेवून सोडले. काय चुक होती बालासाहेब मस्केंची? त्याने शासनाच्या पोकरा योजने अंतर्गत आपल्या शेतात राबवल्या ही त्याची चुक होती? शासनाने केलेल्या आवाहनाला साद घातली ही त्याची चुक होती? तो धडपड्या,खटाटोप करणारा भविष्याचं स्वप्न पाहणारा उमदा तरूण होता ही त्याची चुक होती? की त्याने शेतकर्‍याच्या पोटी जन्म घेतला ही त्याची चुक होती? याचे उत्तर व्यवस्थेला आता द्यावे लागतील. बालासाहेबाची
आत्महत्या म्हणजे


पोकरा योजनेची आत्महत्या
म्हणावी लागेल. शासन शेतकर्‍याच्या नावावर योजनांची मोठ मोठी घोषणा करते. कृषी विभागामार्फत या योजना राबवण्यासाठी अधिकारी, कर्मचार्‍यांना सवलत सुट, टीए, डीए देते मात्र कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी ज्या लाचखोरीने, ज्या सुस्ताडपणाने काम करतात, शेतकर्‍यांना कस्पटागत वागणुक देवून जी टक्केवारी खातात त्यात कृषी विभागाचा अधिकारी कर्मचारी मस्त मजेत असतो. शेतकरी मात्र सरणावर जावून झोपतो. बीडमध्ये गेल्या वर्षभराच्या कालखंडात १६० पेक्षा जास्त शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्यांच्या कारणामागे अनेक मुद्दे असतील परंतू या मुद्यांची कडी ही शेतात झालेलं नुकसान आणि शासन प्रशासनाने केलेलं दुर्लक्ष हेच स्पष्टपणे दिसून येतं.

देशात आणि राज्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्येचा आकडा पाहिला तर नागरी संस्कृतीत आता जन्म घेणं अथवा शेत करा रे फुकाचे, ‘नाम विठोबा रायांचे’ हे म्हणणं जीवघेणं ठरणार आहे का? केंद्र सरकारने शेतकर्‍यांच्या बाबतीत केलेला कायदा आणि त्याला देशभरातील शेतकर्‍यांकडून होत असलेला विरोध पाहता आजची व्यवस्था शेतकर्‍यांना मसनवाट्यात घालणार आहे का? हा जसा प्रश्‍न आहे तसाच संवेदनशील असणार्‍या प्रत्येक माणसाने मग तो नागरी संस्कृतीत वाढलेला असो की नांगरी संस्कृतीत वाढलेला असो या दोघांनीही विचार केला आणि नांगरी संस्कृतीत वाढलेल्या शेतकर्‍यांना त्रास होणार नाही, तो आत्महत्येचा मार्ग स्वीकारणार नाही यासाठी प्रयत्न केले तर नक्कीच जगाचा पोशिंदा हा स्वत:चं घर पोसू शकेल. त्याचबरोबर बालासाहेब मस्के सारख्या तरण्याताठ्या शेतकर्‍याला आत्महत्या का करावी लागली? त्या आत्महत्या मागचे कारण शोधून दोषी प्रशासन व्यवस्थेतील कुंभकर्णांना आणि रावणी वृत्तींना ठेचून काढले तर आणि तरच नांगरी संस्कृतीला व्यवस्थेचा शाप आहे का? हे म्हणण्याची वेळ येणार नाही.

Most Popular

ना. मुंडे विरुद्ध ची तक्रार मागे घेतल्या नंतर रेणू शर्माने केले ट्टिट, म्हणाली……….

बीड -रिपोर्टर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्काराची खोटी तक्रार करणाऱ्या रेणू शर्मा यांनी आपली तक्रार पोलिस स्टेशन मधून मागे घेतली असून...

अखेर सत्याचा विजय! धनंजय मुंडेंविरुद्ध ‘त्या’ महिलेने केलेली खोटी तक्रार घेतली मागे

मुंबई (रिपोर्टर): सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्कार केल्याचा खोटा आरोप केलेल्या रेणू शर्मा नामक महिलेने आपली तक्रार मागे घेतल्याने अखेर...

बीडच्या डीवायएसपी विरुद्ध मुंबईत बलात्काराचा गुन्हा डीवायएसपी वाळके म्हणाले, तपासात सत्य बाहेर येईल

मुंबई/बीड (रिपोर्टर)- बीडचे विद्यमान पोलिस उपअधीक्षक संतोेष वाळके यांच्या विरोधात मुंबई येथील रफी अहमद किडवई मार्ग पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने...

बीड न.प.च्या विषय समित्या जाहीर बांधकाम मुळुक यांच्याकडे तर शिक्षण सभापतीपदी भास्कर जाधव

बीड (रिपोर्टर)- बीड नगरपालिकेच्या विषय समित्या आज दुपारी जाहीर करण्यात आल्या. बांधकाम सभापतीपदी विनोद मुळुक यांची तर शिक्षण सभापतीपदी भास्कर जाधव यांची...