Wednesday, January 27, 2021
No menu items!
Home संपादकीय प्रखर- पोपटराव पवार, भास्कर पेरेंचा आदर्श घेणार का? गावगाड्याचं राजकारण तापलं

प्रखर- पोपटराव पवार, भास्कर पेरेंचा आदर्श घेणार का? गावगाड्याचं राजकारण तापलं

राजकारण कुठलंही असो, ते लवकर तापतं, तापलेल्या राजकारणातून काही चांगले शिजेल याचा काही भरोसा राहिला नाही. राजकारणातून विकास करण्याची संधी असते, मात्र विकासाचं फक्त नाव घेतलं जातं. विकास काय असतो, याचं अद्याप ही कोडं गाव पातळीवरील गोर-गरीबांना उलघडलं नाही. ग्रामपंचायत पासून ते लोकसभेपयर्र्ंतच्या निवडणुका रंगात येत असतात. ह्या निवडणुका जिंकण्यासाठी पुढारी वाट्टेल ते करण्याच्या प्रयत्नात असतात. देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षापेक्षा जास्त काळ झाला, तरी आज ही कित्येक गावांना साधा कच्चा रस्ता नाही, पिण्याचं शुध्द पाणी नाही, नळ जोडणी नाही, विजेची सोय नाही, घरासमोरील नाल्या नाही. असे अनेक प्रश्‍न आहेत, हे प्रश्‍न सोडवण्यावरुन आज पर्यंत नुसतं राजकारण खेळलं गेलं. राजकारणातून सत्ता आणि सत्तेतून स्वत:चं हित हेच होत राहिलं, त्यामुळे नागरी प्रश्‍न सोडण्याऐवजी प्रश्‍नाभोवती राजकारण फिरत राहत आलं. पाच वर्षाच्या काळात खुप काही करता येतं. गावाचा कायपालट करता येतो. पाच वर्षात ज्यांना साधा गावातील रस्ता करता आला नाही ते गाव पुढारी काय गावाचा विकास करणार आणि ते काय समाजाचं हित जोपासणार?


निवडणुका घोषीत झाल्या
कोरोनामुळे राज्यातील निवडणुका आता पर्यंत घेतल्या जात नव्हत्या. मात्र कोरोनाची तीव्रता कमी होत असल्याने निवडणुका घेण्यास सुरुवात होऊ लागली. राज्यातील पहिल्या टप्प्याच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका घोषीत करण्यात आल्या. या निवडणुकासाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. मतदान होण्यापुर्वी सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात आले होते. आधीच सरपंच पदाचे आरक्षण घोषीत केल्याने ‘घोडेबाजार’ मोठ्या प्रमाणात होईल याचा अंदाज राज्य सरकारला उशिरा आला आणि पुन्हा काढलेलं आरक्षण रद्द करण्यात आले. भाजपाच्या कार्यकाळात सरपंच पदाच्या निवडणुका थेट जनतेतून घेण्यात आल्या होत्या. हा निर्णय सध्या राज्य सरकारने बदलला आणि पुन्हा सदस्यातून सरपंच निवडण्याचा निर्णय घेण्यात आला. पुर्वीचा जो निर्णय होता, तो एक प्रकारे चांगलाच होता.

सर्वसामान्यांना सरपंच पदाची निवडणुक लढवता येत होती. सदस्यांची पळवा-पळवी होत नव्हती. सरपंच निवडी पर्यंत सदस्य सांभाळण्याची खटखट नव्हती. मात्र सरकार बदललं की, निर्णय बदलले जातात. आता पुन्हा सदस्यांना ‘भाव’येणार, ज्यासाठी जागा राखीव आहे, ते सदस्य पद जिंकण्यासाठी अगदी काटयाची टक्कर असते. ज्या गावात निवडणुका लागल्या तेथे निवडणुकीची रंगत पाहावयास मिळू लागली. निवडणुका घोषीत झालेल्या गावात पार्ट्यांचा जोर चढला. मतदानासाठी पैसे द्यावे लागतात हे काही नवीन राहिलं नाही. मतदान करण्यासाठी पैसे घेणारे आणि पाटर्या खाणारांकडून कोणती चांगली अपेक्षा करावी? लोकांना अजुन मताचं महत्वच कळलं नाही हे यातून सिध्द होत आहे. लोकशाही नेमकी काय आहे? मताचा अधिकार जो देण्यात आला आहे, त्याचा उपयोग कसा करायचा याचं भान लोकांना राहिलं नसल्याने नको ते लोक निवडून येवू लागले, पैशावर निवडणुकीचे सौदे होवू लागले हा लोकशाहीसाठी मोठा धोकाच म्हणायचा?


खुनशी राजकारण
गावगाड्याच्या कारभाराची जबाबदारी सरपंचाची असते. सरपंच पद हे आज महत्वाचं ठरु लागलं. जिल्हा परिषद सदस्यापेक्षा पुढारी सरपंच होण्यास पसंदी देतात. गावाच्या विकासासाठी सरपंचांना अधिकार दिलेले आहेत. दरवर्षी लाखो रुपयाचा निधी ग्रामपंचायतींना दिला जातो. तसेच वित्त आयोगाचा वेगळा निधी असतो. या निधीतून गावांचा चांगला कायापालट होवू शकतो. मात्र गावांचा कायापालट करण्याची तितकी दानत गाव पुढार्‍यात नसते. कोणत्या निधीतून आपल्याला किती पैसे राहितील याचाच विचार पुढारी करत असतात. त्यामुळे विकासाला खिळ बसते. राजकारण हे निवडणुकीपर्यंत न राहता, त्याची खुन्नस वर्षानुवर्ष कायम ठेवली जात आहे. त्यामुळे अनेक गावपातळीवर कोणत्या ही कारणावरुन राजकीय वादावादी होत असते. काही वेळा राजकीय भांडणाला रक्तरंजीतपणा येतो. हाणामार्‍या, खुन अशा घटना अनेक गावात राजकारणातून घडल्या आहेत. निवडणुका बिनविरोध काढणारे गावकरी खुपच थोडे आहेत. मात्र काही जण बिनविरोध ग्रामपंचायत काढून सरपंचपद विकतात हे खुपच धोकादायक आहे.

विकलेल्या सरपंच पदातून गावाचा काय विकास होणार? ज्याने ग्रामपंचायत विकत घेतले त्याला गावाच्या विकासाचं काय देणं-घेणं आणि गावकरी त्याला विकासाबाबत विचारु शकत नाही कारण त्याने पाच वर्षासाठी सरपंच पदच विकत घेतलेलं असतं. सरपंच पद विकण्याचे पायंडे हाणुन पाडले पाहिजे. राजकारणातून चांगलेपणा शिकवण्याची तितकी ‘अक्कल’ गावपुढार्‍यांना आली नाही, त्यामुळे ग्रामीण भाग जसा विकासात मागे आहे. तसाच विचारातही मागेच राहिला. गाव पातळीवरच राजकारण हे सगळ्यात खतरनाक असतं. तालुका किंवा जिल्हा पातळीवर राजकारण करणारे पुढारी गावतील राजकारण तापवत असतात. गावात प्रत्येक पक्षाच्या पाट्या आणि कार्यकर्ते असतात. राजकाणातून एकमेकांवर सातत्याने कुरघोडी केली जाते. या पक्षाचे कार्यकर्ते त्या पक्षाच्या घरगुती कार्यक्रमाला किंवा लग्नसोहळ्यास जाण्यास तयार नसतात. इतकं राजकारणातून दुषीत वातावरण होवू लागलं. असं दुषीत वातावरण समाज हिताचं नाही.


पाच वर्षात काय केलं?
पाच वर्षात आपण काय केलं? याचा प्रश्‍न प्रत्येक सरपंचाला विचारला तर त्याचं उत्तर फक्त नकारार्थीच येईल. पाच वर्षात असं काहीच भरीव कार्य केलेलं नसतं. नाल्या, रस्ते, बनवले जातात पण ते ही वर्षातच खराब होतात. जिल्हा परिदषेच्या शौचालयाच्या बांधकामात पैसे काढणारे काही कमी नाहीत. गावो-गावच्या जि.प. शाळांना अवकळा आली. शाळा दुरुस्ती किंवा नवीन इमारत बांधकामासाठी निधी येतो, आलेल्या निधीत अपहार केला जात आहे. शाळा आपलीच आहे, ही भावना सरपंचाच्या मनात नसते. त्यामुळे शाळाचं संवर्धन होत नाही. गावाच्या एकीतून शाळा दुरुस्त केल्या तर नक्कीच परिवर्तनची नांदी ठरेल पण असं होत नाही. काही बहाद्दर सरपंच शाळेच्या दुुरुस्तीसाठी आलेला निधी पुर्णंता खावून टकतात. पुन्हा शाळाच चांगल्या राहिल्या नाही म्हणुन ओरडत असतात. शाळेत राजकारण केलं जातं, काही शिक्षकांना दबाब टाकला जातो. मुख्याध्यापक आपल्या मर्जीतील नसेल तर त्याच्या बदलीसाठी प्रयत्न केला जातो. शाळेला कुलूप ठोकले जाते, किंवा शाळा शिक्षण विभागाच्या कार्यालयात भरली जाते, अशा पध्दतीचं राजकारण शाळेच्या बाबतीत केलं जातं, पण स्वत: पुढाकार घेवून शाळेचं रुपडं पालटण्याचं काम सरपंच व इतर गावकरी कधीच करत नाही. अपवाद एखादा सरपंच असू शकतो.

पर्यावरणाचा प्रश्‍न आज गंभीर आहे. प्रत्येक वर्षी झाडे लावण्याची मोहीम हाती घेतली जाते. प्रत्यक्षात ग्राम पंचायत अंतर्गत किती झाडे लावली जातात आणि त्याची जोपासणा किती होते? झाडे लावण्यासाठी पाच वर्षात कोटयावधी रुपयाचा खर्च ग्रामीण भागात करण्यात आला. इतक्या पैशातून किती झाडे जगली? याचा हिशोब केला जात नाही. घरकूलासाठी पैसे खाणारे सरपंच आहेत. घरकूल मंजुर करण्यासाठी एक रुपयाही लागत नाही, पण बहुतांश सरपंच पैसे घेतात हा निलाजरेपणा नाही का?


आदर्श घेणार का?

‘गाव करी ते राव न करी’ अशी एक म्हण आहे. गावकर्‍यांच्या मनात आलं की, कोणतीही अशक्य बाब ते शक्य करु शकतात. फक्त चांगले विचार मनात असावे लागतात. नगर जिल्हयातील हिवरेबाजार नावाची ग्रामपंचायत आहे. ही ग्रामपंचायत नावारुपाला आली ती पोपटराव पवार यांच्यामुळे, त्यांनी गावासाठी प्रचंड मेहनत करुन गाव समृध्द केलं. गावकर्‍यांच्या सहकार्यातून पोपटराव पवार यांनी गावाचा कायापालट केला. पाणलोटापासून ते गावच्या प्रत्येक नियोजनात गाव भारीच आहे.

गावाचं नाव व पोपटराव पवार यांचं नाव राज्यातच नव्हे तर देशात घेतलं जातं, हे गाव पाहण्यासाठी लोक इतर ठिकाणाहून येतात. दुसरं गाव म्हणजे औरंगाबाद जिल्हयातील पाटोदा हे गाव, या गावचं भाग्य उजाळण्याचं काम भास्करराव पेरे पाटील यांनी केलं.

भास्करराव हे खुप काही शिकलेले आहेत असं नाही. कमी शिकलेले असून ही त्यांनी गावासाठी काही तरी चांगलं करायचं म्हणुन एक निर्धार केला आणि गावाचा चेहराच बदलून टाकला. गावाला शुध्द पाण्यापासून ते गरम पाणी पाईप लाईनने पुरवठा केला जातो. अशा पध्दतीचा पाणी पुरवठा करणारी ग्रामपंचायत देशात पहिलीच असावी. गावकर्‍याकडून टॅक्स घेतला जातो आणि त्या बदल्यात गावकर्‍यांना विविध सुविधा पुरवल्या जातात. गावकरी कोणतीही तक्रार न करता शंभर टक्के टॅक्स भरतात , गावात कुणाला काही अडचण असेल तर ती तात्काळ सोडवली जाते. गावात सगळ्या प्रकारच्या फळांचे झाडे आहेत. झाडामुळे गाव दिसत नाही इतके झाडं या गावात आहे. गावासाठी काही तरी केलं तरच गाव झळकतं. नसता, गावो-गावचं वातावरण पहितल्यानंतर असं वाटतं की गावात जाणंच नको. हिवरेबाजार आणि पाटोदा सारखं गाव असेल तर ते गाव कुणाला नको वाटेल? निवडणुका येत असतात, जात असतात. निवडणुकीतून फक्त राजकारण करण्यापेक्षा आपलं गाव हिवरेबाजार किंवा पाटोदा सारखं कसं करता येईल याचा प्रयत्न प्रत्येक गावातील नागरीकांनी केला तर नक्कीच राज्यात बदल दिसून येईल आणि ग्रामीण भाग समृध्द दिसेल. फक्त चांगली मानसीकता हवी!

Most Popular

ड्रग्ज आऊट ऑफ कंट्रोल शहरात एकाचा बळी

ग्राऊंड रिपोटींग- शेख रिजवान कोडिन व कॉस्मेटीक पदार्थाचा जास्त...

पेठबीड पोलिसांनी रोखला बालविवाह

पोलिसांनी वधू-वर पित्यास दिली समजबीड (रिपोर्टर)- सोलापूर जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीचा पेठ बीड हद्दीतील खडकपुर्‍यातील एका मंगल कार्यालयात धुमधडाक्यात विवाह होत होता....

आष्टीत पिस्टलधारी तरुण जेरबंद

अवैध पिस्टल बाळगणार्‍यांविरोधात मोहीम उघडाबीड (रिपोर्टर)- जिल्ह्यात वाळू माफियागिरीसह गुटखा, मटका या माफियांनी उच्छाद् मांडला असून जिल्ह्यात अनेक जणांकडे अवैध पिस्टल, कट्टे...

पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते पोलीस अधिक्षक आर. राजा यांचा सन्मान

*जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना विभागीय स्तरावरील पुरस्कार मिळाल्याने पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार उल्लेखनीय कामगिरीबद्दल विद्यार्थी , पोलीस दलातील...