बालकांचे कुपोषण रोखण्यासाठी ट्रॅकिंग व्यवस्था
बीड (रिपोर्टर)- ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी स्थानिक पातळीवर हंगामी वस्तीगृह सुरू करण्यात आले असले तरी झिरो ते ६ वयोगटातील व त्यापेक्षा जास्त वयाची मुलं आपल्या आई-वडिलांसह उसाच्या फडात जात असतात. यावर्षी १३ हजार ६६९ मुलं मजुरांसोबत गेले असल्याचे समोर आले असून या ऊसतोड मजुरांच्या मुलांचे कुपोषण रोखण्यासाठी ट्रॅकिंग व्यवस्था करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या मुलांना उसाच्या फडामध्ये सकस आहार पुरवण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्यातील लाखो ऊसतोड मजूर दरवर्षी राज्यासह इतर राज्यामध्ये ऊसतोडणीसाठी जातात. ऊसतोड मजुरांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी गावपातळीवर सहा महिन्यांसाठी हंगामी वस्तीगृह सुरू करण्यात येतात. असे असतानाही बहुतांश मुलं आपल्या आई-वडिलांसोबत जातात. यावर्षी कोरोना महामारीची परिस्थिती असल्याने अद्यापपर्यंत शाळा सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे जास्तीत जास्त मुलं आपल्या आई-वडिलांसोबत दिसत आहेत. ऊसतोड मजुरांच्या मुलात कुपोषणाचे प्रमाण जास्त प्रमाणात दिसत असल्याने त्यांचे कुपोषण रोखण्यासाठी ट्रॅकिंग व्यवस्था करण्यात येत आहे. मुलांना फडामध्ये पोषक आहार पुरवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. बीड जिल्ह्यातील जवळपास १३ हजार ६६९ मुलं स्थलांतरीत झाले असल्याचे समोर आले आहे.