कोरोना संशयितांच्या रोज चाचण्या; जिल्ह्यात आज केवळ ३० बाधीत, पाच तालुक्यात एकही रुग्ण आढळला नाही
बीड (रिपोर्टर)- इंग्लंडमध्ये जणुकीय बदल झालेला कोरोना विषाणू आढळल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील जिल्हास्तरावरील आरोग्य व्यवस्था आणि प्रशासन सतर्क झाले असून त्या अनुषंगाने जागरुकतेने बीड जिल्ह्यात तपासण्या होत आहेत. आज आनंदाची बाब म्हणजे जिल्ह्यातील पाच तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नसून अन्य सहा तालुक्यात ३० नवीन कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. जिल्हा रुग्णालयासह जिल्ह्यातील कोविड सेंटरमध्ये ८४२ बेड रिकामे आहेत.
आतापर्यंत जिल्ह्यात ५२६ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. दुसरीकडे कोरोना लस देण्याबाबत गावागावात प्रशासनाकडून माहिती घ्यायला सुरुवात झाली आहे.
इंग्लंडमध्ये जणुकीय बदल झालेला कोरोना विषाणू आढळल्यानंतर राज्यासह जिल्हास्तरावर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. इंग्लंडहून परत आलेल्या प्रवाशांचे सर्वेक्षण करण्यात येऊन त्यांची तपासणी केली जाते. यात राज्यातील १६ प्रवासी बाधीत आढळले. त्यामध्ये औरंगाबाद येथील एक प्रवासी असल्याने मराठवाड्यात अधिक सतर्कतेने कोरोना चाचण्या होत आहेत. बीड जिल्ह्यातही आरोग्य विभाग सतर्क असून काल ४७१ कोरोना संशयितांच्या चाचण्या घेण्यात आल्या. यामध्ये ४४१ जण निगेटिव्ह आढळून आले. दरम्यान गेवराई, पाटोदा, धारूर, शिरूर, परळी या पाच तालुक्यात एकही कोरोनाचा नवा रुग्ण आढळून आला नाही.
मात्र अंबाजोगाई, आष्टी, बीड, केज, माजलगाव, वडवणी या सहा तालुक्यात मात्र कोरोनाचे ३० बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत बीड जिल्ह्यात १ लाख ७७ हजार ६१६ संशयितांच्या तपासण्या होऊन यामध्ये १ लाख ६ हजार ९९९ जणांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहे तर १६ हजार ६१७ जणांना जिल्ह्यामध्ये कोरोनाने बाधीत केले होते. यात ५२६ बाधीतांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाबत प्रशासनाकडून जनजागृती करण्यात येत असून सोशल डिस्टन्स आणि मास्क लावण्यावर भर दिला जात आहे. सध्या बीड जिल्ह्यातील कोविड सेंटरमध्ये ८४२ बेड शिल्लक आहेत. कोरोना बाधीतांच्या संख्येत रोज घट होत आहे ही जिल्हावासियांसाठी समाधानाची बाब आहे.