बीड (रिपोर्टर)- अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यातील शेतकर्यांच्या खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. राज्य सरकारने हेक्टरी दहा हजार रुपये नुकसान भरपाई जाहीर केल्यानंतर शेतकर्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत. हे पैसे काढण्यासाठी डीसीसी बँकेच्या शाखेमध्ये शेतकरी गर्दी करून आहेत.
परतीच्या पावसाने राज्यामध्ये धुमाकूळ घातला होता. यात सोयाबीन, कापूस, तूर, ऊस, मूग इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. राज्य सरकारने नुकसानीचे पंचनामे करून शेतकर्यांना हेक्टरी 10 हजार रुपये घोषीत केले होते. हे पैसे प्रत्येक डीसीसी बँकेच्या शाखेअंतर्गत जमा झाल्याने बँकेने ज्या शेतकर्यांना अनुदान मिळाले त्या शेतकर्यांची यादी बँक कार्यालयाच्या बाहेर लावलेली आहे. शेतकरी आपली नुकसान भरपाईची रक्कम काढण्यासाठी बँकेमध्ये गर्दी करून आहेत.
अनेक शेतकर्यांची नावे आली नाहीत
महसूल विभागाचा अनागोंदी कारभार नेहमीच चव्हाट्यावर आलेला आहे. तलाठ्यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे बहुतांश शेतकर्यांची नावे अनुदानासाठी लागलेली नाहीत. ज्या शेतकर्यांची नावे यादीमध्ये समाविष्ट नाहीत ते शेतकरी तलाठीकडे चकरा मारतात तेव्हा तलाठी तहसीलकडे बोट दाखवत आहेत. नेमकी चूक कोणाची ? हे मात्र महसूल विभागाकडून सांगितलं जात नसल्याने शेतकर्यांची फरफट होत असल्याचे दिसून येत आहे. राज्य सरकारने सरसकट शेतकर्यांना अनुदान घोषीत केले आहे मग इतर शेतकर्यांची नावे कशी काय वगळण्यात आली? असा प्रश्न उपस्थित होत आहे.