Tuesday, January 19, 2021
No menu items!
Home संपादकीय रोख- ठोक -अटीतटीचे 2020 मावळतेय पेरते व्हा..!

रोख- ठोक -अटीतटीचे 2020 मावळतेय पेरते व्हा..!

-गणेश सावंत-
9422742810
जगाचं लक्ष केंद्रीत करणार्‍या क्रिकेटसारख्या खेळात कसोटी केंव्हा मागे पडली ते जसं कळलं नाही आणि 20-20 च्या खेळात अटीतटीच्या लढती चित्तथरारक होत गेल्या. या 20-20 च्या खेळास मी-मी म्हणणारा मातब्बर खेळाडू जसा गारद होत राहिला अन् नवखा खेळाडू षटकार मारत राहिला. या 20-20 मध्ये जसं कोणाचं नशिब केंव्हा फळफळल अन् कोणाचं नशिब पालत पडल हे सांगता येत नाही तसेच 20-20 चे 2020 चे साल अखंड हिंदुस्तानसाठीच नव्हे तर जगासाठी राहिले. 20-20 च्या सालात चित्तथरारकच नव्हे तर माणसा-माणसांना थरकाप उडवून देणारा प्रत्येक क्षण याच सालात अनुभवयास मिळाला. दीर्घ आयुष्य लाभोचे अशिर्वाद माथ्यावर असतांना केंव्हा कोणाचे आयुष्यमान कमी होईल आणि केंव्हा कुठलं माणुस यमाच्या दारात जाईल हे सांगणे कठीण होवून बसले. कोरोनासारख्या महामारीने हिंदुस्तानात नव्हे तर जगभरात उच्छाद मांडला. अन् अवघ्या जगाला बंदीवासाची शिक्षा भोगावी लागली. कोरोनाने दारबंद केल्याने अनेकाच्या नोकर्‍या गेल्या. छोटे-मोठे उद्योग लयास गेले. कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूरांवर उपासमारीची वेळ आली, बेरोजगारीचा भस्मासुर पुन्हा उफळून आला त्यात देशातले मोदी सरकारने सर्व सामान्यांना तारण्यापेक्षा लहरीपणात म्हणण्यापेक्षा अहंमपणात काम सुरू ठेवले. केवळ आपल्याकडे बहुमत आहे आणि त्या बहुमताच्या जोरावर आपण कुठलेही कायदे करू शकू ते आंमलात आणु आणि आपल्याला वाटतेल तसे कायदे राबवू ही भूमिका केंद्र सरकारच्या मोदी सरकारने वर्षभरात ठेवली. परिणामी देशभरातील शेतकर्‍यांना रस्त्यावर यावे लागले. दिल्लीच्या सिमांवर आंदोलन सुरू ठेवले ते आजतागायत आहे. या वर्षात ज्यांनी जे-जे पेरले ते-ते पुढच्या वर्षीच्या सुर्य किरणात उगणार आहे. परंतू शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटी असतात. बीज जर शुद्ध नसेल तर उगवणार काय? हा प्रश्‍न अखंड देशवासियांना सतावत असला तरी देशवासियांनीच आता काय पेरायचं? काय उगवायचय? हे लक्षात ठेवत पेरते व्हाची भूमिका ठेवावी लागेल. आपार यातना, कष्ट, त्रास देणारे 2020 चे

rok thok


साल मावळतय
मावळतीच्या सुर्याला वंदन करावं की नाही आज असं झालय. कारण गेल्या वर्षभराच्या कालखंडामध्ये 2020 सालाने घराघरामध्ये जी दहशत माजवली, ज्या दहशतीतून आजही माणसं उभारली नाहीत. तो 2020 चा सुर्य आज मावळतीला जातोय. खर तर गेल्या कित्येक दिवसापासून प्रत्येकाला हे वर्ष कधी जातय असं झालं होतं. या वर्षाने जे काही दाखवलं ते उभ्या आयुष्यात कोणीही पाहिलं नाही की अनुभवलं नाही. आजपर्यंत जगाच्या पाठीवर जेवढ्या जागतिक महामार्‍या आल्या त्या जागतिक महामार्‍यांपेक्षा कित्येक पटीने आक्रमक असणारे कोरोनाची ही महामारी माणसामाणसांना कोंडून ठेवणारी ठरली. या कोंडत वातावरणात जगणं मुश्किल झाल्याने प्रत्येक दिवस केंव्हा संपेल आणि उद्याचा सुर्य कसा निरोगी आरोग्य देण्यासाठी उगवेल याकडे प्रत्येक माणुस लक्ष ठेवून होता. परंतू दिवसामागून दिवस जात होते. अर्धवर्ष घरबंद राहावं लागल्याने सर्व सामान्य माणसांना जे हाल सोसावे लागले ते मरण यातनेचे होते. या घरबंद वातावरणामुळे देशाच्या अर्थ व्यवस्थेचं सोडा घरातल्या अर्थ व्यवस्थेची घडी जी बिघडली ती आज पावेत व्यवस्थित बसली नाही. बसवणारे अनेक जण घडी व्यवस्थीत बसवण्याचा प्रयत्न करत आहेत परंतू त्याला यश येत नाही याचे कारण जेवढा कोरोना आहे तेवढीच आजची व्यवस्था आहे. यात दुमत असण्याचे कारण नाही. कारण गेल्या वर्षभराच्या कालखंडामध्ये घरबंद परिस्थितीमुळे देशभरातील सर्वसामान्य माणसांवर जे काही आक्रमणे झाली आहेत ती आक्रमणे कोरोनामुळे झाल्याचे वरवर दिसून येत असले तरी व्यवस्थेमुळे जे आक्रमणे झाले. त्या


व्यवस्थेचे आक्रमण
भीक नको पण कुत्रं आवर असे आहेत. गेल्या वर्षभराच्या कालखंडात कोरोनामुळे जी परिस्थिती निर्माण झाली त्या परिस्थितीतून आधीच बेरोजगार असलेल्या माणसांमध्ये पुन्हा बेरोजगारांची मोठ्या प्रमाणात भरती झाली. सहा महिन्याच्या बंदीवासामुळे उद्योग धंदे ठप्प पडले. छोट्या-मोठ्या व्यावसायांना अक्षरश: कुलूप लावावे लागले. यामुळे सर्वच क्षेत्रात माणसाची कपात झाली अनेक ठिकाणी पगारी कापल्या गेल्या. कित्येकांना पगारी मिळाल्याच नाही त्यामुळे या बेरोजगारीच्या भस्मासुराने आऽऽऽ वासले कित्येकांना गिळंकृत करून टाकले. आज मित्तीला अनेक जण बिनपगारी आहेत, हाताला काम नाही तरी ही आपल्या कुटुंबियाचा राहटगाडा तो ओडतांना दिसून येत आहे. मात्र हा राहट गाडा ओढत असतांना जो थकला जातो तो एक तर गळ्याला फास लावतो नाही तर विष प्राशन करून आत्महत्या करतो. आत्महत्या करणार्‍यांमध्ये सर्वसामान्य शेतकरी प्रचंड आघाडीवर आहे. बेरोजगार तरूणांची संख्या ही तेवढीच आहे. याकडे व्यवस्थेचं लक्ष नसावं हे दुर्दैवं. 2020 च्या सालाने माणसा माणसांना अक्षरश: गुदमरून टाकलं. एखाद्याचा गळा दाबावा आणि त्याचा जीव वरच्या वरी आणि खालच्या खाली राहावा ही परिस्थिती निर्माण करून सोडली. ती याच सालामध्ये या परिस्थितीला तोंड द्यायचे सोडून सदरची परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही याकडे लक्ष द्यायचे सोडून व्यवस्था जर लहरी असेल, अहंमपणाची असेल अहंकाराबरोबर हुकुमशाही वृत्तीची असेल तर त्या व्यवस्थेमध्ये सर्वसामान्य माणूस हा भरडलाच जाईल. कोरोनाने नुसत्या भारताला वेठीत धरले नाही तर प्रगत राष्ट्रांनाही विळख्यात घेतले. तिथली व्यवस्था तिथल्या माणसांना सावरण्यासाठी मदत करते. परंतू


पंतप्रधान नरेंद्र मोदींची
व्यवस्था काय करतेय?

हे गेल्या वर्षभराच्या कालखंडात पाहणार्‍यांना आणि अनुभवणार्‍यांना सर्वश्रुत आहे. कोरोनामुळे नक्कीच घरबंद झाल्याने उद्योग व्यवसाय मोडकळीस आले आणि देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली. रूपया पार घसरला परंतू 2014 नंतर आजपावेत रूपयाची घसरण सुरूच आहे. रूपयाला बळकटी मिळवण्याची सोडून जीडीपी कितीही घसरला तरी अहंमपणाचे निर्णय घेणं सरकारच सुरूच आहे. नोटबंदीनंतर जे काही निर्णय घेतले गेले ते सर्व निर्णय हे वसुली मोहिमेसारखे राबवण्यात आले. एक प्रकारे याला जिजीया कर म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. परंतू या परिस्थितीला प्रोत्साहन देण्याचे काम हे केंद्र सरकारने सातत्याने केले. सर्वसामान्य माणसाच्या हिताला हात घालण्यासाठी धनदांडग्या उद्योगपतींचा वारू कसा उधळेल याकडे जास्त लक्ष दिल्याचे दिसून येते. त्यातलाच भाग म्हणजे आता केलेला नवीन कृषी कायदा म्हणावा लागेल. केवळ बहुमत आहे, लोकसभा आणि राज्यसभामध्ये आपल्याला कोणीही अडवू शकत नाही म्हणून शेतकर्‍यांच्या बाबतीत तीन कायदे करण्यात आले. या कायद्याला पंजाब, हरियाणासह अन्य राज्यातून प्रखर विरोध झाला. गेल्या 35-36 दिवसापासून दिल्लीच्या सिमेवर लाखो शेतकरी आंदोलन करत आहेत. मात्र या आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्याचे पाप मोदी सरकार करत आहे. यातूनच मोदी सरकारला शेतकर्‍यांच्या मागणीपेक्षा आपल्या अहंमपणाला अधिक महत्त्व द्यावास वाटतं. अनेक जानकारांच्या मते हा कायदा शेतकर्‍यांना उद्धवस्त करणारा आहे असे सांगितले जात असतांनाही कायद्यामध्ये बदल न करणे हा अट्टाहास कोरोना व्हायरसपेक्षा महाभयंकर म्हणावा लागेल. शेतकरी, कष्कटरी, कामगार, शेतमजूर यांच्या प्रश्‍नाकडे लक्ष देण्यापेक्षा पक्ष वाद आणि


निर्वादीत सत्तेसाठी

भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे सरकार जे काम करत आहे ते लोकशाहीला धरून नक्कीच नाही. एकीकडे लोकहिताचे काम करत असल्याच्या वल्गना करायच्या आणि दुसरीकडे सर्वसामान्यातील सर्व सामान्य माणसांना महागाईच्या खाईत कसे लोटले जाईल याचाच जणु अभ्यास व्यवस्था करते की काय? असा संशय आल्याशिवाय राहत नाही. 2014 पासून आजपावेत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये जी वाढ झाली आहे ती वाढ ऐतिहासीक म्हणावी लागेल. ऐतिहासीक हा शब्द एवढ्यासाठीच आम्ही म्हणतोय, कच्चा तेलाची किंमत एका चहाच्या कपाएवढी झाली असतांनाही भारतामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती मात्र सोन्याच्या किंमती एवढ्या राहिल्या. आज तर कच्चा तेलाच्या किंमती वाढल्या आहेत म्हणून पेट्रोल आणि डिझेल शंभरी गाठत असल्याचे सांगण्यात येते. परंतू वस्तुुस्थितीनुसार केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने पेट्रोल डिझेलवरील अतिरीक्त कर दहा-दहा रूपयाने कमी केला तर आजही भारतातील जनतेला पेट्रोल आणि डिझेल कमी किंमतीत मिळण्यास मदत होईल. शेतकर्‍यांच्या खिशातून काढायचं, सर्वसामान्याच्या खिशाला कात्री लावायची, मध्यम वर्गीयांचे खिशे झाडाझाडतीने रिकामे करायचे आणि मोठमोठ्या उद्योगपतींच्या खिशाचा भरणा करायचा. सर्वसामान्यातील सर्वसामान्य माणसांना रांगेत लावायच आणि धनदांडग्यांच्या आरत्या ओवाळायच्या हेच धोरण गेल्या पाच-सहा वर्षामध्ये पहावयास मिळाले. परिणामी गरीब हा गरीबच राहिला, बेरोजगारी वाढत गेली, मुलभूत प्रश्‍न जैसे थे राहत गेले. हे दुर्दैव नव्हे काय? गेलं वर्ष जेवढं बिकट आणि संघर्षमय गेलं तस जाण्यासाठी दैव अथवा नियती जबाबदार आहे की नाही माहित नाही परंतू केंद्र सरकारचा आणि आजच्या व्यवस्थेचा याबाबत थोडा तरी हातभार आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. म्हणूनच


पेरलं तसं उगवतं
आज वर्षाचा शेवटचा दिवस. 2020 कडे काळेकुट्ट साल म्हणून पाहिले जाणार आहे. सुर्य मावळतीला झुकतोय, काही तासाने तो मावळतीलाही जाईल. 2020 चं संकट काळच साल संपुष्टात येईल. रात्रीच्या 12 च्या ठोक्याला नव्या वर्षाची सुरूवात होईल. त्यामुळे काही तात्काळ उद्याच्या उगवत्या सुर्यानेच देशात काही बदल होतील. सर्वसामान्यातील सर्व सामान्य माणसांची फरफड थांबेल, बेरोजगारी संपुष्टात येईल, महागाई कमी होईल, शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबतील, खर्‍या अर्थाने शेतकर्‍यांना जगाचा पोशिंदा माणण्यात येईल तर याचे उत्तर नाहीअसे येईल. जसं पेरलं तस उगवणार हे मात्र निश्‍चित असल्याने देशातल्या केंद्र सरकारने आणि भाजपाने या नव्या वर्षात शुद्ध बीज पेरले तर नक्कीच पुढच्या काही दिवसात फळ रसाळ गोमटी मिळतील. सरकार काय करतय? व्यवस्था काय करतेय? ती हाताला काम देतेय का? आपल्या पोराबाळांच्या पोटापाण्याचा प्रश्‍न सोडवतेय का? या प्रश्‍नांसह खर तर सर्वसामान्यातील सर्व सामान्य माणसांनी खंबीरपणाने उठावं. 20-20 च्या लढतीत यश, अपयश आले असेल त्याकडे दुर्लक्ष व्हावं आणि नव्या वर्षाच्या नव्या दिवसाची सुरूवात


पेरते व्हा
म्हणत करावी आणि आपला सदाचाराचा, निर्भयतेचा, कष्टाचा, वैचारिकतेचा पेरा पेरत राहिलं तर आजच्या व्यवस्थेला ते आव्हानही ठरेल आणि आपण काही तरी करतोय त्यात सदाचार आहे. कष्ट आहेत, मेहनत आहे, विचार आहे याचं समाधानही सर्वसामान्यातील सर्वसामान्य माणसाला मिळत राहिल.

Most Popular

तीन मिनिटाची डेंजर ट्रॅव्हलींग सिंदफणा नदीतील थरार

बीड तालुक्यातील आहेरचिंचोली ग्रामस्थांची ३० टक्के शेती सिंदफना नदीच्या दुसर्‍या बाजूला असल्याने दररोज होडीतून प्रवास करून शेतात जाण्याची वेळशेत मालकांना, शेत मजूर,...

बीड तालुक्यात ८ ग्रा.पं.सेनेच्या तर ४ ग्रा.पं. राष्ट्रवादीच्या ताब्यात

बीड (रिपोर्टर)- तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाल्यानंतर आज मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा दुपारपर्यंत १२ ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले असून ८ ग्रामपंचायती शिवसेनेच्या...

गेवराई तालुक्यावर अमरसिंह पंडितांचा वरचष्मा सुरेश हात्तेंसह बप्पासाहेब तळेकर गटाचा दारुण पराभव

गेवराई (रिपोर्टर)- जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या गेवराई तालुक्यातील तलवाडा, मादळमोही, गढी, ग्रा.पं.सह २२ ग्रामपंचायतींपैकी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे ८, भाजपा ५, शिवसेना ४, महाविकास...

केजच्या सहा ग्रा.पं.वर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा

केज (रिपोर्टर)- ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली. तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींपैकी १९ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका झाल्या होत्या. चार ग्रा.पं. बिनविरोध निवडण्यात आल्या....