नागरिकांना विविध संकटांना द्यावे लागते तोंड
लाईट नसली तरी वीजबील चुकत नाही
बीड (रिपोर्टर) वीज वितरण कंपनीचा अनागोंदी कारभार नेहमीच चव्हाट्यावर येत असतो. वीज कंपनी ज्या ठिकाणी विजेची नादुरुस्ती आहे तेथे दुरुस्ती करण्याकडे कानाडोळा करत असल्याने याचा त्रास गावकर्यांना सहन करावा लागतो. बीड तालुक्यातील नागापूर खुर्द येथे सिंगलफेज योजना गेल्या काही दिवसांपासून बंद पडलेली आहे. थ्रीफेजचा भरोसा नसल्याने गावात अंधाराचे साम्राज्य आहे. गेल्या काही दिवसांपासून गावात लाईट नसल्याने चोर्यांचे प्रमाण वाढले असून विजेअभावी गावकर्यांना इतरही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. गावातील लाईट तात्काळ दुरुस्त करण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्यांनी लक्ष घालावे नसता गावकरी रस्त्यावर उतरून वीज कंपनीच्या विरोधात आंदोलन करणार आहेत.
वीज वितरण कंपनी आपल्या कारभारामध्ये सुधारणा करण्याचं नाव घेत नाही. मात्र ग्राहकांना बील नियमितपणे देते. काही ग्राहकांना तर वाढीव बील दिले जाते. ग्रामीण भागामध्ये विजेचा खेळखंडोबा झाला. कित्येक गावात विजेचा सातत्याने लपंडाव असतो. बीड तालुक्यातील नागापूर खुर्द येथे गेल्या काही दिवसांपासून लाईट नाही. सिंगलफेज योजना बंद पडल्याने थ्री फेजची लाईट व्यवस्थीत येत नाही. काही वेळेसाठी लाईट येते मात्र त्यानंतर लाईट ये-जा करते. गावात कायमस्वरुपी लाईट नसल्यामुळे नागरिकांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. वीज वितरण कंपनीला विजेच्या बाबतीत तक्रारी करूनही याकडे संबंधित इंजिनिअर व अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने गावकर्यात संताप व्यक्त केला जात आहे. गावातील वीज तात्काळ दुरुस्त न केल्यास सर्व गावकरी रस्त्यावर उतरून वीज वितरण कंपनीच्या विरोधात आंदोलन करणार आहेत.
वीज नसल्याने सहा वर्षीय बालकाचा सर्पदंशाने मृत्यू
गावात वीज नसल्याने सर्वत्र अंधार आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे साप, विंचू बिलातून बाहेर निघून घरामध्ये घुसत असतात. रात्री गावातील एका सहा वर्षीय बालकाला अंधारात सर्पदंश झाल्याने सदरील बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. गावात लाईट असती तर या बालकाला आपले प्राण गमवावे लागले नसते.