बीड (रिपोर्टर) राज्यातलं प्रत्येक गाव टँकरमुक्त व्हावं या दृष्टीकोनातून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार योजना सुरू केली होती. या योजनेला जवळपास 10 हजार कोटी रुपये इतका खर्च करण्यात आला होता. मात्र खर्चाप्रमाणे योजनेचे तितके सार्थक झाले नव्हते त्यामुळे ही योजना शासनाने रद्द केली होती. मात्र राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. योजनेतल्या काही त्रुटी दुरुस्त करून योजना नव्याने सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी सचिव डावले यांच्या अध्यक्षतेखाली हिवरेबाजार येथे पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न झाली.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्य कार्यकाळात राज्यामध्ये जलयुक्त शिवार योजना सुरू केली होती. दरवर्षी राज्यातील पाच हजार गावे टँकरमुक्त करण्याचा संकल्प फडणवीस यांनी ठेवला होता. पाच वर्षात या योजनेवर दहा हजार करोड रुपयांचा खर्च करण्यात आला. काही गावात योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले होते. फडणवीस यांचं सरकार गेल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन झाले. या सरकारने जलयुक्त शिवार योजना रद्द केली होती. सध्या शिंदे-फडणवीस यांचं सरकार आल्याने या सरकारने पुन्हा ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. जलयुक्त शिवार-2 या नावाने नव्या स्वरुपात योजना सुरू होणार आहे. सचिव एकनाथ डवले यांच्या अध्यक्षतेखाली नगर येथील हिवरेबाजार येथे पोपटराव पवार यांच्या उपस्थितीत धोरण समितीची बैठक सुरू झाली. या बैठकीला तज्ञ मान्यवर उपस्थित आहेत. बैठकीत योजनेतील त्रुटी दूर करणे, केंद्र आणि राज्य सरकारच्या आणखी काही पुरक योजना यासोबत जोडणे, पाण्याचा ताळेबंद मांडण्याची हिवरेबाजार पद्धत, जल साक्षरता मांडण्यासाठी प्रबोधन अशा काही उपाययोजना बैठकीत सुचवण्यात आल्या आहेत.