एका पाठोपाठ दोन टिप्पर अंगावरून गेल्याने शरीराच्या झाल्या चिंधड्या
राक्षसभुवन रोडवर घडली दुर्दैवी घटना, संतप्त गंगावाडीकरांनी रस्त्यावर मांडला ठिय्या, वाळू माफियांसह स्थानिक अधिकारी, कर्मचार्यांवर गुन्हे दाखल करा, त्यांच्या मुसक्या बांधा म्हणत ग्रामस्थांचा आक्रोश, सकाळी सहा वाजता घटना घडून दुपारी एक वाजेपर्यंत मृतदेह घटनास्थळावरच, आधी दोषींवर कारवाई करा नंतर मृतदेह उचलू ग्रामस्थांची भूमिका, घटनास्थळी वरिष्ठ अधिकार्यांची उपस्थिती
गेवराई (रिपोर्टर)- अवैध वाळू उपसा करत भरधाव वेगाने जाणार्या हायवाने रस्त्यावरून जाणार्या शेतकर्यास निर्दयीपणे चिरडल्याची घटना आज सकाळी गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन रस्त्यावर घडली. एका पाठोपाठ एक असे दोन टिप्पर सदरील शेतकर्याच्या अंगावरून गेल्याने त्याच्या शरीराच्या अक्षरश: चिंधड्या उडाल्या, घटनेची माहिती गावकर्यांना होताच गंगावाडी येथील ग्रामस्थांनी रस्त्यावर येऊन रस्ता रोको आंदोलनास सुरुवात केली असून सकाळी सहा वाजता घडलेल्या या घटनेनंतर दुपारी दीड वाजेपर्यंत मृतदेह घटनास्थळीच होता. जोपर्यंत वाळू माफियांसह त्यांना मदत करणार्या प्रशासनातील स्थानिक अधिकार्यांवर गुन्हे दाखल होऊन कठोर कारवाई केली जात नाही तोपर्यंत मृतदेह रस्त्यावरून हलवणार नाहीत, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. घटनास्थळी उपविभागीय अधिकार्यांसह तहसीलदार, डीवायएसपी दाखल आहेत.

गेवराई तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होतो. राक्षसभुवन, म्हाळसपिंपळगाव या दोन्ही गावांच्या सीमांमधून वाळू उपसा अधिक प्रमाणात होताना दिसून येतो. वाळू माफिया गुंडगिरीच्या जोरावर हा धंदा करत असल्याच्या अनेक तक्रारी प्रशासन दरबारी पडून आहेत. आज सकाळी गंगावाडी येथील रुस्तुम बाळाजी मते (वय 65) हे शेतकरी शेताकडे निघाले असता राक्षसभुवनकडून येणार्या हायवा टिप्परने त्यांना जोराची धडक देत चिरडून तो पसार झाला. त्यापाठोपाठ येणारा दुसरा हायवा टिप्परही या शेतकर्याच्या अंगावरून गेल्याने त्याच्या शरीराच्या अक्षरश: चिंधड्या उडाल्या. रस्त्यावर रक्तमांसाचे तुकडे प्रत्यक्षदर्शींचे हृदय हेलावून टाकत होते.

अपघात घडल्याची माहिती गावकर्यांना कळाल्यानंतर गावकर्यांनी घटनास्थळी येऊन रस्ता रोको करत ठिय्या मांडला. जोपर्यंत या अपघाताला जबाबदार असणार्या वाळू माफियांसह स्थानिक प्रशासनातील अधिकारी कर्मचार्यांवर गुन्हे दाखल होऊन त्यांच्यावर कठोर कारवाई केली जात नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नाहीत, अशी भूमिका घेतली. सदरचा अपघात हा सकाळी सहा वाजता घडला होता. दुपारी दीड वाजेपर्यंत घटनास्थळावर मृतदेह पडून होता. गावकरीही रस्त्यावर ठिय्या मांडून होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, डीवायएसपी स्वप्नील राठोड, प्रभारी तहसीलदार रामदासी, पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम चोभे यांनी घटनास्थळी धाव घेतली. उपस्थित संतप्त नागरिकांना शांत करण्याचा प्रयत्न करत दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले मात्र जोपर्यंत दोषींवर गुन्हे दाखल होत नाहीत, कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह हलवणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली.

गंगावाडीच्या ग्रामस्थांत महसूल
प्रशासनाविरोधात तीव्र असंतोष
अवैध वाळू उपसा करणार्या वाळूच्या टिप्परने शेतकर्याच्या शरीराच्या चिंधड्या उडवल्यानंतर गंगावाडी येथील ग्रामस्थात महसूल प्रशासनाविरोधात तीव्र असंतोष पसरला असून जोपर्यंत घटनास्थळी जिल्हाधिकारी राहूल रेखावार येत नाहीत आणि स्थानिक दोषी अधिकारी, कर्मचार्यांवर कारवाई करत नाहीत तोपर्यंत रस्त्यावरून हलणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली.