बीड (रिपोर्टर)- गेल्या दोन दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या सर्व खातेप्रमुख आणि विस्तार अधिकारी, कर्मचार्यांची कार्यशाळा सामाजिक न्याय भवनातील सभागृहामध्ये सुरू आहे. आजच्या माहिती आणि तंत्रज्ञान युगामध्ये आज काही प्रस्ताव हे लिखित फाईलद्वारे येतात. मात्र अनेक कर्मचार्यांना फाईलची टिपणी लिहिता येत नाही. फाईलसंदर्भात पत्रव्यवहार कसा करायचा याबाबत अनेक त्रुटी आढळून येत असल्यामुळे कालपासून सामाजिक न्याय भवनाच्या सभागृहामध्ये या कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्यासाठी कार्यशाळा आयोजित केली आहे.
फाईल गहाळ होण्याचे प्रकार वाढत आहेत. काही फाईल वेळेवर सापडत नाहीत, फाईल सापडली तर त्यासोबत केलेला पत्रव्यवहार गायब झालेला असतो. या फाईलिंचे जतन कसे करायचे? फाईलमधली ‘नस्ती’ कशी सांभाळावी, मंत्रालय स्तरावरील अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या सोबतचा पत्रव्यवहार याबाबत या कार्यशाळेमध्ये खातेप्रमुखांसह कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. काल सुरुवातीच्या टप्प्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी मार्गदर्शन करून सामान्य प्रशासन विभागातील त्रुटी दाखवत त्या कशा सोडवायच्या याबाबत त्यांनी या कार्यशाळेत मार्गदर्शन केले. आजच्या कार्यशाळेमध्ये पशूसंवर्धन विभाग, शिक्षण विभाग आणि पाणीपुरवठा स्वच्छता विभाग या संदर्भातील कार्यशाळेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी हे कर्मचार्यांना मार्गदर्शन करत आहेत.