Wednesday, January 27, 2021
No menu items!
Home संपादकीय रोखठोक- नामांतर स्वराज्याचा धर्म आहे का? स्वराज्य हाच धर्म सर्वास पोटास लावणे...

रोखठोक- नामांतर स्वराज्याचा धर्म आहे का? स्वराज्य हाच धर्म सर्वास पोटास लावणे हेची कर्म


-गणेश सावंत
९४२२७४२८१०

महाराष्ट्र कोणाचा? या प्रश्‍नाचे सरळ साधे उत्तर शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेचा. स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांच्या कर्तृत्वाचा, शाहु, फुले, आंबेडकर या परिवर्तनवादी विचारांचा, क्रांतीकार्‍यांचा, स्वातंत्र्यवीरांचा असेच द्यावे लागेल. मात्र आज मित्तीला महाराष्ट्रात राजकारण करणार्‍या विविध पक्षांनी रयतेच्या महाराष्ट्राला आणि शिवशंभुंच्या स्वाराज्याला जात, पात, धर्म, पंत व नामांतराच्या मुद्यावरून जे नख लावण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत त्या प्रयत्नातून महाराष्ट्राचे अक्षरश: वस्त्रहरण होत आहे. गडेमुडदे उकरून काढायचे, महत्त्वाच्या प्रश्‍नांना बगल द्यायचे आणि सत्ता स्थापन करण्यासाठी अक्षरश: माणसामाणसात, जातीजातीत, धर्माधर्मात तेढ निर्माण करायचे एवढेच ध्येय आजच्या देशातल्या राज्यकर्त्यांचे आहे का? मुळ प्रश्‍नांकडे दुर्लक्ष करत लोकांच्या मुलभूत गरजांकडे कानाडोळा करत ज्या पद्धतीने देशातले भाजप आणि त्यांचे पिलावळे जातीय तेढ निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण करू इच्छिता प्रयत्नांची परिकाष्टा करत आहेत. त्या प्रयत्नातून नेमके साध्य काय होणार? हे त्या पिलावळांना तरी कळतेय का? आम्ही नुसता दोष भाजपालाही देत नाहीत. महाराष्ट्रात आणि देशात राजकारण करणार्‍या विविध पक्षांनी ज्या पद्धतीने सत्ता स्थापनेसाठी जात, धर्म याची ढाल करणे सुरू केले आहे ते रयतेच्या स्वराज्याला परवडणारे आहे काय? औरंगाबाद महानगर पालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रात पुन्हा एकदा नामांतराचा मुद्दा चेतवण्याचा प्रयत्न होतोय. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा अट्टाहास म्हणण्यापेक्षा खपली टोकरण्याचे काम ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीकडून आज सुरू आहे त्यातून औरंगाबाद अथवा संभाजीनगरचे नेमके भले ते काय होणार? होय औरंगाबादपेक्षा संभाजीनगर हे महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि महाराष्ट्रात निपजलेल्या प्रत्येक व्यक्तीला स्फुरण आणणारे नाव नक्कीच आहे. परंतू या नामांतराबाबत निवडणुका आल्याकीच सत्ताधार अथवा विरोधकांकडून बाऊ का केला जातो? ज्या महापुरूषाच्या नावाने या शहराला संभाजीनगरचे नाव द्यावे असे अखंड महाराष्ट्राला वाटते त्या स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या विचाराचे आजचे राजकारणी खरेच पाईक आहेत का? असतील तर मग नावापेक्षा संभाजी महाराजांच्या कार्यप्रणालीवर लक्ष का केंद्रीत केले जात नाही. रयतेकडे त्यांचे किती लक्ष होते, त्यांच्या मुलभूत गरजा ते कशा पुर्ण करायचे, गोरगरीब, कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, दीनदुबळ्यांना ते स्वराज्याच्या प्रवाहात कसे आणायचे? खायला धान्य आणि प्यायला पाणी मिळावं यासाठी किती विहिर खोदायचे, किती तलाव खोदायचे, आया बहिणींची आब्रु राखण्यासाठी कायदे कसे कठोर असायचे आणि शिक्षा कशा दिल्या जायच्या या प्रश्‍नांकडे आज लक्ष का दिलं जात नाही. असे प्रश्‍न जेंव्हा उपस्थित केले जातात तेंव्हा मात्र राज्यकर्त्यांबरोबरच विरोधकांचीही दात्तखिळी बसायला लागते. औरंगाबादचे संभाजीनगर व्हायला पाहिजे ही आज भाजपाची मागणी संभाजी महाराजांच्या प्रेमापोटी आहे की महापालिकेत शिवसेनेची सत्ता येवू नये यासाठी आहे? हे आधी स्पष्ट व्हायला हवे. कारण गेल्या तीस वर्षाच्या कालखंडात शिवसेनेनेही याच मुद्यावर औरंगाबादेत राजकारण केलं. आणि

rok thok


बाळासाहेब ठाकरेंनी
इ.स.१९८८ साली औरंगाबादेत एका जाहीर सभेत औरंगाबादचे नामांतर करत संभाजीनगर केले. त्यांच्या या घोषणेनंतर शिवप्रेमी औरंगाबादला संभाजीनगरच म्हणू लागले. पुढे चालूून महाराष्ट्र सरकारनेही औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याबाबतचा मंत्री मंडळात प्रस्ताव आणला आणि तो एक मुखाने मंजूर करण्यात आला. पुढे या प्रकरणात याचिका दाखल झाली ती निकाली निघली. मात्र प्रत्यक्षात कागदपत्रात संभाजीनगर या नावापेक्षा औरंगाबाद याचा नामोल्लेख आज पावेत कायम राहिला. छत्रपती संभजी महाराजांचे नाव औरंगाबाद शहराला देण्याबाबत कोणाचाही विरोध नक्कीच नसेल परंतू संभाजीनगर हे नाव करण्यामागे ज्या लोकांचा उद्देश निर्मळ नाही त्यामागे जातीयतेची खाज आहे म्हणून याला आम्ही विरोध करत असल्याचे काहींचे म्हणणे आहे. संभाजी महाराजांचं कर्तृत्व शब्दात कोणी सांगू शकत नाही आणि त्यांना कुठल्या एका शहराला नाव देण्याची गरज नाही. संभाजी महाराज महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात आधिराज्य गाजवत आहेत. परंतू केवळ जातीच्या आणि धर्माच्या नावावर राजकारण केलं की आपले पित्र स्वर्गात जातात असा अभास आजच्या राजकारण्यांना आहे. त्यामुळे प्रत्येक निवडणूकीच्या वेळी औरंगाबाद शहराच्या विकासापेक्षा, मराठवाड्याच्या विकासापेक्षा लोकांच्या मुलभूत गरजांपेक्षा नामांतराचे मुद्दे समोर केले जातात. आजही भारतीय जनता पाटीकडून हा मुद्दा समोर आणून जे राजकारण केले जात आहे त्यावरून भाजपाचा उद्देश औरंगाबाद शहराचे संभाजीनगर नामांकरण करण्यापेक्षा औरंगाबाद शहराबरोबर महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण करणे एवढाच दिसून येतो. छत्रपती संभाजी महाराजांचे नाव औरंगाबाद शहराला द्यायचेच होते तर मग गेल्या पाच वर्षाच्या कालखंडात


फडणवीस सरकार झोपले होते काय?
हा जळजळीत सवाल आता विचारावा लागेल. गेल्या ३० वर्षापासून शिवसेना औरंगाबादचे संभाजीनगर करण्यासाठी राजकीय लढा देत आहे. त्या मुद्यावरच औरंगाबादेत राजकारण करत आहे हे सर्वश्रुत आहे. गेल्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकत्रित होती. या दोघांचे सरकार महाराष्ट्रात होते. त्ययावेळी भाजपासह शिवसेनेला औरंगाबादचे नाव संभाजीनगर का करावेसे वाटले नाही? आज भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे बेंबीच्या देठापासून औरंगाबादचे नाव संभाजीनगर झाले पाहिजे असे म्हणत रोज गडेमुडदे उकरून काढत आहेत. नक्कीच शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी हा त्यांना राजकीय मुद्दा आहे असे आपण गृहीत धरू. परंतू संभाजी महाराज हा एक महाराष्ट्राचा नव्हे देशाचा विचार आहे. संभाजी महाराज हे महाराष्ट्राच्या मस्तकावरील जीरेटोप आहे. आणि त्या महाराजांच्या नावाचं राजकारण सातत्याने स्वार्थासाठी आणि सत्तेसाठी कुठलाही राजकीय पक्ष करत असेल तर त्यांच्या सारखे दळभद्री ते कोणीच नसतील. आजपर्यंत महाराष्ट्रात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचं सरकार होतं. औरंगाबादच्या नामांतरावरून मुस्लिमांची मते आपल्यापासून दूर जातील या भितीने कॉंग्रेस राष्ट्रवादीने औरंगाबादचं नामांतरण केलं नाही असं आपण समजू. किंवा शिवसेना भाजपाचा तो आरोप मानू परंतू जेंव्हा महाराष्ट्रामध्ये फडणवीसांच्या नेतृत्वात सेना-भाजपाचं सरकार होतं त्यावेळेस औरंगाबादचा नामांतर का केलं नाही? आज भारतीय जनता पार्टीचे प्रत्येक नेता औरंगाबादच्या नामांतरावर बोलत आहे. मग फडणवीसांना औरंगाबादचे नामांतर का करावेसे वाटले नाही. आज महाविकास आघाडीच्या नावाने बोट मोडणार्‍या भाजपाला आपल्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये ते का करता आलं नाही? एकूणच जात, पात, धर्म, पंताचे नामांतरासारखे विषय चेतवत ठेवायचे. निखारे विजू द्यायचे नाहीत, जातीय विषवल्लींना सातत्याने पाणी टाकत राहायचे आणि लोकांच्या मुलभूत प्रश्‍नांकडे दुर्लक्ष करायचे हे जे धोरण सध्या भारतीय जनता पार्टी बरोबर अन्य पक्ष संघटनांचे आहे ते महाराष्ट्राला अधोगतीकडे घेवून जाणारे आहे. शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारले आणि ते स्वराज्य तलवारीच्या लखलखत्या धारेवर नुसते सुरक्षितच ठेवले नाही तर ते वाढवले असे राजे संभाजी महाराज अथवा छत्रपती शिवाजी महाराज यांनी महाराष्ट्रातल्याच नव्हे तर परप्रांतातल्या एका किल्ल्यालाही


छत्रपतींनी नाव दिले नाही
छत्रपती संभाजी महाराज यांची संपूर्ण कारकीर्द तेजोमय होती. अगदी लहानपणापासून त्यांच्यावर अनेक संकटे आली. त्या संकटावर पाय रोवून उभे न राहता संभाजी महाराजांना समर्थपणे झेपही घेतली. संभाजी महाराज हे असामान्य व्यक्तीमत्व होते. अचाट धैर्य, अजोड पराक्रम, असामान्य शौर्य, प्रयत्नांची परिकाष्टा, अनेक भाषांवर प्रभुत्व, संस्कृत पंडित, स्वराज्य अभिमानी, व्यासंगी, आदर्श, महावीर, समाजकारण, राजकारण, अर्थकारण, धर्मकारण अशा अनेक क्षेत्रात आपले निर्विवादीत वर्चस्व त्यांनी गाजवलं. हे आम्हाला सांगण्याची गरज नाही. संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं कर्तृत्व आकाशात चंद्रसुर्य असे पर्यंत राहणार यात तिळमात्र शंका नाही. एवढं कर्तृत्व केल्यानंतरही महाराष्ट्रातल्या एकाही गडकिल्याला छत्रपती शिवाजी महाराज गड, अथवा छत्रपती संभाजी महाराज गड असे नाव कोठे आढळून येत नाही. स्वराज्य हा आपला धर्म, रयतेचं कल्याण हेच आपलं कर्म आणि सर्वास पोटास लावणे आहे हीच आपली घोषणा या दोन कर्तृत्वान छत्रपतींनी कायम ठेवली. आज दुर्दैवाने त्याच छत्रपतींच्या महाराष्ट्रात रयतेचे हाल होत असतांना रयत वेगवेगळ्या प्रश्‍नांनी पिचली जात असतांना, मुलभूत गरजा मिळत नसतांना, महिलांवर अत्याचार हेात असतांना महाराष्ट्राची गादी काल सांभाळणारे आणि आज संभाळणारे केवळ नामांतर आणि जातीय तेढ एववढ्या कडेच लक्ष देत असतील तर शिवशंभोंच्या विचारांना ती हरताळच म्हणावी लागेल. आम्ही तर म्हणू,
न लगे चंदना सांगावा परीमळ
कितीही घाणीत आणि कितीही दाटीत चंदन असले तरी त्याला आपल्या सुगंधाची चर्चा अथवा प्रचिती कररून देण्याची गरज पडत नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे दोन असे कर्तृत्वान महापुरूष आणि महाराष्ट्राचे दैवत आहेत. त्यांना कुठल्या नावाची गरज नाही. म्हणूनच संत तुकाराम महाराज म्हणतात
न लगे चंदना पुसावा परीमळ |
वनस्पती मेळ हाकारूनी ॥
अंतरीचे धावे सोभावे बाहेरी |
धरीता ही परी आवरेना ॥
सुर्य नाही जागे करीत या जना |
प्रकाश किरण कर म्हणू ॥
तुका म्हणे मेघ नाचवी मयुरे |
लपवीता खरे येत नाही ॥
विविध वनस्पतीच्या गर्दीत चंदनाचा सुगंध कोणाला विचारावा लागत नाही. तो काही लपुन राहत नाही. जे आत आहे ते स्वभावातच आपोआपच बाहेर येते. ते आडवायचा प्रयत्न केला तर आडवता येत नाही. लोकांना जागं कर असं सुर्य काही आपल्या प्रकाश किरणांना सांगत नाही. सुर्य उगवला की लोक अपोआप जागे होतात. तुकाराम महाराज म्हणता ढग पाहून मोर आपोआप नाचायला लागतो. त्याला आपला आनंद लपवायला येत नाही तसेच सत्य लपवायला येत नाही ते आपोआप प्रकट होत असतं. तसच संभाजी महाराजांचं शौर्य हे सुर्य प्रकाशा इतका प्रखर आहे. ते कोणाला ही लपवता येत नाही. औरंगजेबाला करता आलं नाही ते कोणाला ही करता येणार नाही. त्यामुळे संभाजी महाराज महाराष्ट्रातल्याच नव्हे तर देशातल्या प्रत्येकाच्या तनामनात अधिराज्य करून आहेत. औरंगाबादचे संभाजीनगर होवो अथवा न होवो त्याने कोणाचं कर्तृत्व झाकता येणारं नाही. परंतू या मागचा जो उद्देश आज तमाम राजकारण्यांकडून समोर येतोय तो उद्देश पाहता छत्रपती संभाजी महाराजांनीही तो खोडून काढला असता. भारतीय जनता पार्टी आज ज्या मानसिकतेत देशात काम करतेय ती मानसिकता संभाजी महाराजांची नव्हती तर अनाजी पंतांची होती असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. जात,पात, धर्म, पंतापेक्षा स्वराज्य धर्म काय सांगतो याकडे आता तरी लक्ष द्या.

Most Popular

ड्रग्ज आऊट ऑफ कंट्रोल शहरात एकाचा बळी

ग्राऊंड रिपोटींग- शेख रिजवान कोडिन व कॉस्मेटीक पदार्थाचा जास्त...

पेठबीड पोलिसांनी रोखला बालविवाह

पोलिसांनी वधू-वर पित्यास दिली समजबीड (रिपोर्टर)- सोलापूर जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीचा पेठ बीड हद्दीतील खडकपुर्‍यातील एका मंगल कार्यालयात धुमधडाक्यात विवाह होत होता....

आष्टीत पिस्टलधारी तरुण जेरबंद

अवैध पिस्टल बाळगणार्‍यांविरोधात मोहीम उघडाबीड (रिपोर्टर)- जिल्ह्यात वाळू माफियागिरीसह गुटखा, मटका या माफियांनी उच्छाद् मांडला असून जिल्ह्यात अनेक जणांकडे अवैध पिस्टल, कट्टे...

पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते पोलीस अधिक्षक आर. राजा यांचा सन्मान

*जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना विभागीय स्तरावरील पुरस्कार मिळाल्याने पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार उल्लेखनीय कामगिरीबद्दल विद्यार्थी , पोलीस दलातील...