Friday, May 20, 2022
No menu items!
Homeसंपादकीयजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १ टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र मुर्दाड...

जिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १ टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र मुर्दाड आणि निसत्वाला कर्तृत्वाची फुंकार घाला

जिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १
-गणेश सावंत
९४२२७४२८१०

अखंड जगाच्या पाठीवर भुगोलाबरोबर इतिहास असणारा भारत हा एकमेव देश आहे. शतकानु शतके पारतंत्र्यात राहीला तरी स्वातंत्र्याची आस सोडली नाही. स्वातंत्र्यासाठी कर्तृत्व आणि संघर्ष पराकोटीचा केला. यात अनेक योद्धे अजरामर झाले. रणांगणात तळपणारी तलवार योद्धाचे नाव इतिहासात अजरामर होत राहिले. परंतु राजकीय, आर्थिक, सामाजिक न्यूनगंडतेवर विजय प्राप्त करणार्‍या एकमेव राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ मॉ साहेब ठरल्या. मुर्दाड आणि निसत्वाला कर्तृत्वाची फुंकार कशी घालायची आणि माणसा माणसात ऊर्जा कशी निर्माण करायची, त्यांच्यात आत्मविश्‍वास कसा वाढवायचा हे जिजाऊ मॉ साहेबांनीच महाराष्ट्रालाच नव्हे तर अखंड जगाला आपल्या कर्तृत्वातून शिकवलं. मॉ साहेबांचा कार्यकाळ हा तसा साधा सोपा नव्हता आज जो शब्द घराघरात आणि माणसा माणसाच्या तोंडातून उच्चारला जातो ते टेंशन, तो तणाव आजच्या कुठल्याच माणसाला जिजाऊ एवढा नसेल. हे आम्ही ठामपणे सांगू शकतो. आज जो तणावात आहे, टेंशनमध्ये आहे त्यानेही थोडा विचार केला आणि सोळाव्या शतकात जिजाऊंचा तळपता कार्यकाळ पाहितला तर त्यालाही आपले टेंशन जिजाऊ मॉ साहेबांच्या ताण-तणावापुढे अत्यंत कमी वाटेल. परंतु आज टेंशन आणि तणावाच्या नावाखाली डिप्रेशनमध्ये येऊन लोक जे काही टोकाचे पाऊल उचलून स्वत:चा आणि परिवाराचा घात करत आहेत तो नेभळटपणा म्हणावा लागेल. म्हणजे आजच्या माणसांवर टेंशन आणि तणाव विजय मिळवत आहे. हे उघड सत्य नाकारता येणार नाही. म्हणूनच टेंशन आणि तणावावर विजय मिळवायचा असेल तर जिजाऊ मॉ साहेबांचे चरित्र आता प्रत्येकाने आत्मसात करायलाच हवे.


जिजाऊंचा तो काळ
आज वाचला तरी अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही. हाताच्या मुठी वळल्याशिवाय राहत नाही, तळपायाची आगही मस्तकाला जाते. परंतु वाचताना आणि जिजाऊंचा तो काळ चित्ररुपी पाहताना जी आग तणामनात लागते तीच आग माणसाने स्वत:च्या तणाव आणि टेंशनच्या विरोधात लावली तर नक्कीच माणसा-माणसांना टेंशनपासून मुक्ती मिळाल्याशिवाय राहणार नाही. इतिहासाच्या कालपटलावर योद्धांबरोबर स्त्री व्यक्तीमत्वांनीही आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. त्यामध्ये अग्रभागी जिजाऊ मॉ साहेबांचं नाव आपल्याला घ्यावाच लागेल. त्यांच्या कार्याची दखल आज जगभरात घेतली जात असताना त्यांच्याच महाराष्ट्रात आणि त्यांच्याच भारतात त्यांची कार्यप्रणाली आत्मसात केली जात नाही, म्हणून टेंशन आणि तणाव माणसावर स्वार होतोय, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. ज्या काळामध्ये मराठी माती सर्वत्र मुर्दाड झाली होती निसत्व वातावरण निर्माण झालं होतं, निधड्या छात्या आणि शिवशिवते मनगट दुश्मनांना मुजरे घालत होते, त्यांच्या पुढे गुडघे टेकत होते, कुर्नीसात करत होते, पारतंत्र्य आणि गुलामीबद्दल कुणाला तिटकारा वाटत नव्हता, स्वातंत्र्य गमवल्याचा खेद नव्हता, भूमिपुत्रांना मुस्कटदाबी मुकाट्याने सहन करावी लागत होती. अस्मानी संकटांबरोबर चार पातशाह्या इंग्रज, डच, पोर्तुगिज यांच्या अन्याय, अत्याचारापुढे रयत पिचली जात होती. एकीकडून राज्य करणारे राज्यकर्ते रयतेची छळवणूक करत होते तर दुसरीकडे धर्म मार्तंड रयतेला दैववादी बनवून आजचे मरण उद्यावर ढकलू पाहत होते. अशा भयावह परिस्थितीत त्या काळच्या रयतेला तणाव, टेंशन बरोबर भीती ती काय असेल त्यातही स्वाभिमानी स्वातंत्र्याची आस असणार्‍या आणि पारतंत्री पराचक्राविरोधात संताप असणार्‍या व्यक्तींना काय वाटत असेल, त्यांची माणसिकता काय असेल, त्या मानसिकतेत जिजाऊ मॉ साहेबही होत्या. त्यांना तणाव आला नसेल का, त्यांना टेंशन आले नसेल का, मग त्यांनी त्या तणावाच्या वेळी काय करायला हवं होतं. आजच्या तणावतले टेंशनमधले थेट गळफास घेतात नाही तर विष पिऊन आपलं जिवन संपवतात. जिजाऊ मॉ साहेबांनी ते टेंशन, तो तणाव कसा सहन केला असेल, उलट आम्ही तर म्हणू ते टेंशन आणि त्या तणावाला त्यांनी ढाल, तलवार बनवले

अन्
स्वराज्य विचाराचा
पुरस्कार केला

त्या काळात स्वराज्याचा विचार करणे म्हणजे चांगल्या-चांगल्या मातब्बर सरदारांना गळ्यात धोंडा बांधून विहिरीत उडी घेण्यासारखा होता. तरीही जिजाऊ मॉ साहेबांनी तो विचार अमलत आणलाच. जिजाऊंचं चरित्र महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला माहित आहे, परंतु ते आत्मसात करताना मात्र जी काटकसर तुमच्या-आमच्याकडून होतेय म्हणूनच तुमच्या आमच्यावर तणाव टेंशन अधिराज्य गाजवतय, स्वराज्य विचाराचा पुरस्कार करताना सर्वात अधिक जिजाऊ मॉ साहेबांनी मराठी मुलखातील प्रस्थापितांना उलथवून टाकले. जो स्वराज्याचा विचार करेल, जो रयतेसोबत असेल, जो माणसाला माणूस म्हणून वागवेल अशांची मोट बांधली आणि ती मोट शिवबांच्या हाती देऊन स्वराज्य निर्माण केले. त्यावेळी स्वराज्य विचार ही या मराठी मुलुखातील नांदी होती. हे आपल्याला विसरता येत नाही. मनुवाद्यांनी स्त्रीयांना गुलामीचं जिणं बहाल केलं होतं, समाजाच्या मोठ्या वर्गाला दैववादी बनवलं होतं. माणसामाणसात जातीपातीच्या भींती उभ्या केल्या होत्या. समाजातील क्षत्रियत्वाच्या विचाराकडे पाठ फिरवली होती आणि समाज बलहिन, सत्वहिन, तेजोहिन बनविला होता. या परिस्थितीत जिजाऊंनी प्रयत्नांची कास धरली, रयतेच्या गमवलेल्या सत्वाला फुंकार घातली, त्यांच्यातील स्वाभिमान जागा केला आणि त्यांना क्षात्र बाण्याची शिकवण दिली, शिवरायांच्या पाठिशी उभं राहून यतेचं स्वराज्य प्रत्यक्षात आणलं. ज्या काळात जिजाऊंसारख्या महिलांनी स्वराज्य विचाराचं जागरण लोकात केलं तो काळ आणि परिस्थिती ध्यानी घेतली की, जिजाऊंप्रती असणारा आदर द्विगुणीत होतो. आदर्श राजपत्नी, आदर्श राजमाता म्हणून तर त्यांची जगभरात ख्याती आहे. एवढ्यावरच त्यांच्या ठायी वसलेली गुणसंपदा संपत नाही, जो जो विचार करू तो तो विचार व्यक्तीमत्वाचे अनेक पैलू ठाशीवपणे लक्षात राहतात, समर्थपणे राज्यासकट पेलवणार्‍या एक असामान्य कर्तबगार प्रशासक राजकारणाच्या उत्तूंग जाणकार प्रतिकुल परिस्थितीवर मात करणार्‍या कुशल मुत्सद्दी आणि प्रशासनात तितक्याच कर्तव्य कठोर असणार्‍या जिजाऊंचं चरित्र हे सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आणि माणसा माणसात उर्मी घालणारा आहे.


इतिहास साक्षीला
असताना तुम्ही-आम्ही दळभद्री, त्या इतिहासातील पाऊलखुणा ओळखत नाही, त्या पाऊल खुणांवर जात नाहीत, आजच्या आयुष्यात तो मुत्सद्दीपणा आणत नाहीत, आजच्या टेंशन तणावात उपाय शोधत नाहीत, त्या टेंशन तणावापुढे गुडघे टेकवतो, यालाच कुर्नीसात करतो आणि ईश्‍वराने दिलेल्या या देहाला आपल्याच हाताने आगीच्या स्वाधीन करतो. मग जिजाऊ मॉ साहेबांच्या महाराष्ट्रात आणि देशात आज आम्ही क्षात्रबाणा हरवून बसलो आहोत का? आजतर तलवार घेऊन कोणाविरोधात लढायची गरज नाही, त्यांनी दिलेल्या स्वातंत्र्यामुळे आणि त्यांनी दिलेल्या स्वाभिमानामुळे इंग्रजांविरोधात तुम्ही-आम्ही लढा उभारू शकलो आणि स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीत स्वातंत्र्याचा श्‍वास आज घेऊ शकलो. हा इतिहास साक्षीला आहेच ना, परंतु आम्ही तणाव-टेंशनच्या आहारी एवढे गेलो की आम्हाला इतिहासाने दिलेले तणाव-टेंशन विरोधातले मारक औषध असतानाही ते आम्हाला आजही विसत नाहीत, जिजाऊंचा उभा इतिहास पहा, जिजाऊंच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत केवळ आणि केवळ तणाव, टेंशनवरील जालिम उपचार आपल्याला जिथंतिथं उमजून येतील. जिजाऊ मॉ साहेब हे एक असं अजब रसायन होतं, की त्यामध्ये मातृत्वाबरोबर कर्तृत्व घडवण्याचं सामर्थ्य होतं, मग आमच्याकडे मातृत्व आहे, कर्तृत्व घडवताना टेंशन, तणाव आला तर आम्ही अविचाराला कुर्नीसात करण्यापेक्षा त्यावर विजयी पताका का फडकवत नाहीत.

उद्याच्या अंकात
जाधवाविरुद्धची लखलखती तलवार
अन् प्रतापगडच्या पायाजवळचा थरार
जिजाऊंनी तेव्हा कुठली पेन किलर घेतली असेल?

Most Popular

error: Content is protected !!