बीड (रिपोर्टर): केज तालुक्यातील 59 गावात रोजगार हमीच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचे तपासाअंती निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या प्रकरणातील जवळपास अडीचशे कर्मचार्यांना लवकरच नोटीसा बजावण्यात येणार आहे.
त्यासोबतच नोटीशीनंतर केजचे गटविकास अधिकारी यांचाही निलंबणाचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात येईल, असे जिल्हा परिषदेमधील प्रशासकीय सुत्रांनी सांगितले.
केज तालुक्यातील 59 गावात पांदण रस्ते, शेतीच्या कामाची बांधबंदीस्ती, जलसिंचन विहिरीची कामे आदी स्वरुपाची कामे रोजगार हमी योजनेतून करण्यात आले आहेत. या कामांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च झालेला आहे मात्र अनेक ठिकाणी कामे ही कागावरच केल्याच्या तक्रारी आल्या होत्या. तर काही कामांमध्ये कामाची मोजमाप पुस्तिका (एमबी) आणि झालेले काम याचा ताळमेळ तपासणी करणार्या पथकाला कोठेच जुळून आला नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या तपासणी पथकाने याबाबतचा अहवाल काही दिवसांपुर्वीच मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिला.
या अहवालानुसार 59 गावातील ग्रामसेवक, सरपंच, रोजगार सेवक, रोजगार हमी योजनेवरील सर्व कंत्राटी कर्मचारी यांच्या सोबत विस्तार अधिकारी, सहायक लेखाधिकारी आणि गटविकास अधिकारी अशा जवळपास दोनशे ते अडीचशे लोकांना नोटीसा बजावण्यात येत आहेत. त्यानंतर या कर्मचार्यावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कारवाई करतील मात्र गटविकास अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार मुख्य कार्यकारी अधिकार्यांना नसल्यामुळे याबाबतचा त्यांचा निलंबणाबाबतचा प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्याालयाकडे पाठविण्यात येणार आहे. दिलेल्या नोटीसा आणि त्यांच्यावर झालेली कारवाई ही बीड जिल्हा परिषदेमधील सर्वात मोठी कारवाई असेल, मात्र या कारवाई दरम्यान मोठ्या राजकीय प्रस्थांनी दबाव आणला नाही तर या कर्मचार्यांवर कारवाई होणार हे मात्र निश्चित.