बीड (रिपोर्टर)- बीड, जालना रोडवर रोड रॉबरी करून फरार झालेल्या अट्टल दरोडेखोराच्या स्थानिक गुन्हे शाखेने काल मुसक्या आवळल्या असून त्यांनी गुन्ह्यात वापरलेल्या चोरीच्या बोलेरोसह मुद्देमाल जप्त केला आहे.
धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाडळसिंगी पुलाच्या खाली अट्टल दरोडेखोरांनी दोन ट्रक चालकांना लुटल्याची घटना 5 जानेवारी रात्री घडली होती. त्यांना लुटण्यापुर्वी त्या दरोडेखोरांनी वैजापूर येथे एक बोलेरो गाडी चोरून आणली होती. तीच बोलोरो गाडी वापरून ते चोर्या करत होते. ते अट्टल दरोडेखोर कोपरगावला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच पीआय भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बी.जी. दुल्लत यांचे पथक काल कोपरगावला गेले होते. त्या ठिकाणाहून त्यांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या तर तिघे जण फरार झाले. या वेळी पोलिसांनी आरोपी प्रवीण उर्फ पप्पु बापु साळवे (वय 19 वर्षे, रा. देवळाला ता. येवला जि. नाशिक), दुसरा आरोपी राहुल ऊर्फ मोगली इंद्रजीतसिंह कोरी (रा. कोपरगाव जि. नगर) या दोघांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून चोरीची बोलेरो (क्र. एम.एच. 15 बी.एन. 4188) व पाडळसिंगी येथे रोडरॉबरीतील दोन मोबाईल आणि काही नगदी रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेला कोयता, लोखंडी रॉड आदी साहित्य जप्त केले आहे. या अट्टल दरोडेखोरांवर राहता येथे 395, 392 नुसार गुन्हे दाखल आहेत. सदरील कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनिरीक्षक बी.जी. दुल्लत, पो.हे.कॉ. शेख सलीम, तुळशीराम जगताप, सोमनाथ गायकवाड, प्रसाद कदम, विकास वाघमारे, अतुल हराळे यांनी केली.