बीड (रिपोर्टर)ः- उद्या बीड जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होत आहे. गेले पंधरा दिवस विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांसह गावपातळीवरील पुढार्यांनी प्रचारासाठी गावातले घर न घर पिंजून काढले होते. प्रशासनाच्यावतीनेही उद्याच्या मतदानासाठी जिल्ह्यातील विविध तहसिल कार्यालयातून मतदान साहित्य आणि अधिकारी कर्मचारी यांचा फौजफाटा मतदान होत असलेल्या गावाला रवाना झालेला आहे.
या 129 ग्रामपंचायतीमध्ये काही तलवडा, द्रिदुड,नित्रुड सारख्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत. पंचायत राज व्यवस्थेमध्ये आता ग्रामपंचायतीना प्रचंड महत्व आलेले आहे. विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आणि गावपुढार्यांनी ग्रामपंचायती आपल्या ताब्यात द्याव्यात यासाठी आटापिटा चालविलेला आहे. प्रशासनाच्यावतीनेही मतदान यंत्रे, मतदान कंट्रोल यंत्रे, निवडणुक निर्णय अधिकारी, मतदान अधिकारी, राखीव कर्मचारी सह बंदोबस्तासाठी पोलीसांचा फौजफाटा निवडणुक होत असलेल्या गावाला रवाना झालेला आहे. आज निवडणुक होत असलेल्या गावाला हे सर्व साहित्य जावून उद्या सकाळी 8 वाजल्यापासून मतदान प्रकियेला सुरूवात होईल. सध्याकाळी पाच वाजेपर्यंत हे मतदान नागरीक करतील. त्यानंतर मतदान पेट्या तालुक्याच्या ठिकाणी मोठ्या बंदोबस्तात ठेवल्या जातील. येत्या 18 तारखेला या मतदानाचे मतमोजणी होणार आहे.