गणेश सावंत | बीड
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात एका महिलेने कथीत आरोप केल्यानंतर गेल्या चार दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर खळबळ उडाली आहे. धनंजय मुंडेंनी या प्रकरणात खुलासा केल्यानंतर वस्तूस्थिती महाराष्ट्रासमोर येऊन मुंडेंविरेाधात साधक-बाधक प्रतिक्रिया व्यक्त होत असतानाच ज्या महिलेने मुंडेंवर कथीत आरोप केले, ती महिला प्रकाश झोतात आली खरी परंतु तिच्या कथीत आरोपाचे आणि तिच्या कथनीचे वाभाडेच महाराष्ट्राच्या पटलावर येताना दिसून आले. मुंडेंपाठोपाठ त्या महिलेने अन्य काही लोकांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याच्या अनेक घटना समोर येत असून दोन घटना प्रत्यक्ष पोलिस ठाण्यापर्यंत गेल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात ‘एक मेल तीन फिमेल ब्लॅकमेल’ची चर्चा अधिक रंगात येत ना.मुंडेंचा विजयी अश्व रोखण्याइरादे षडयंत्रकर्यांनी या महिलेचा वापर केला की षडयंत्राची मुख्य सुत्रधार ‘ती’ महिलाच आहे याचा शोध घेणे आज मितीला गरजेचे आहे. दुसरीकडे सामाजिक जिवनात एका महिलेच्या उपटसुळ धंद्यामुळे अखंड महिला बदनाम होत असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियातून अनेक महिलांनी व्यक्त होऊन सदरील महिलेचा निषेध केल्याचे चित्रही पहावयास मिळते.

शून्यातल्या भारतीय जनता पार्टीला उंच शिखरावर घेऊन जाणारे स्व. गोपीनाथ मुंडे अन् स्व. प्रमोद महाजन यांच्या मुशीत वाढलेले धनंजय मुंडे यांची २५-३० वर्षांची राजकिय कारकिर्द ही अत्यंत संघर्षमय आहे. राजकारणामध्ये केव्हा काय होईल, कोण के व्हा दगा फटका करेल आणि कोणाला केव्हा ‘मला वाचवा हो!’ चा टाहो फोडावा लागेल हे सांगता येत नाही. मात्र अशा स्थितीतही आपलं लक्ष स्थिर ठेवत ध्येयवादी बनत आणि प्रामुख्याने संघर्ष करत धनंजय मुंडेंनी आपली राजकीय घोडदौड सुरू ठेवली. या घोडदौडीत अनेक संकटानंा धनंजय मुंडेंना सामोरे जावे लागले. आप्तस्वकियांशी लढावे लागले, समाजाशी एकरुप होण्यासाठी स्वत: खरे असताना आपलं सत्यत्व सिद्ध करण्यासाठी संघर्षाची जणू अग्निपरिक्षा द्यावी लागली. हा संघर्ष करताना, अनेक संकटांवर मात करताना धनंजय मुंडेंनी लोकहिताचे काम सोडले नाही. कर्तव्य-कर्म हाच आपला धर्म मानत मुंडे काम करत राहिले. बीडच्या परळी मतदारसंघात नेतृत्व करणार्या मुंडेंनी आपल्या कर्तृत्वातून महाराष्ट्राला केव्हा कव्हेत घेतले हे कळालेच नाही आणि इथेच धनंजय मुंडेंचे हितशत्रू कामास लागले. सुरुवातीपासून धनंजय मुंडेंच्या संकटात अधिक अधिक भर कशी पडली जाईल हे त्यांचे विरोधक बारकाईने पाहत राहिले. मात्र त्या संकटांवर मात करत ‘मै जब जब बिखरा हुँ तब तब दुगनी रफ्तार से निखरा हुँ’ म्हणत आव्हाने पेलवत धनंजय मुंडेंनी प्रत्येक संकटावर मात केली. सामाजिक, राजकीय, आर्थिक संकटात धनंजय मुंडे सापडत नाहीत, त्यांच्या विजयी अश्वाला रोखता येत नाही, हे लक्षात आल्यानंतर विरोधकांनी २०१९ पासून धनंजय मुंडेंच्या व्यक्तीगत जीवनावर हल्ला चढवण्यास सुरुवात केली. एखादा व्यक्तीला आणि त्याचा विजयी वारू रोखता येत नसेल तर त्याच्या व्यक्तीगत जीवनावसह चारित्र्यावर शिंतोडे उडवा म्हणजे तो निपचीत पडेल, ही परंपरा दशकानु दशकापर्यंत चालत आली आहे. या आधीही महाराष्ट्राचे रक्षण करणार्या रयतेचे आणि देशातील जनतेचे हित पाहणार्यांविरोधात असे प्रयोग झाले आहेत.
तेच प्रयोग धनंजय मुंडेंच्या विरोधात करण्यात येऊ लागले आणि एका महिलेने गेल्या चार दिवसांपुर्वी धनंजय मुंडेंच्या विरोधात कथित आरोप करत महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर काहूर उडवून दिले. त्यामुळे धनंजय मुंडेंच्या चारित्र्यावर मळभ निर्मण झाले. परंतु ‘कर नाही त्याला डर कशाला’ या स्थितीत धनंजय मुंडेंनी या सर्वात मोठ्या संकटाला सामोरे जाण्याचे ठरवले आणि त्या कथित व्यक्तीच्या कथित कथनीचे पोस्टमार्टम करत व्यक्तीगत जीवन मुंडेंनी सोशल मीडियाच्या व्यासपीठावर मांडली. परंतु प्रश्न हा पडतो, धनंजय मुंडेंना व्यक्तीगत जीवन चव्हाट्यावर आणण्यास भाग पाडणारे ते कोण? एकीकडे हा प्रश्न उपस्थित होत असताना दुसरीकडे मुंडेंवर कथित आरोप करणारी महिला खरच अबला आणि सोज्वळ आहे का? हा प्रश्न उपस्थित होत असतानाच काल सदरची महिला ही ब्लॅकमेल करते, असे एक ना अनेक प्रकरणे समोर येण्यास सुरुवात झाली. एकीकडे भारतीय जनता पार्टी धनंजय मुंडेंवर आरोप झाल्यावर त्यांचा राजीनामा मागत होती तर दुसरीकडे त्याच भाजपाचे माजी आमदार कृष्णा हेगडे हे पोलिस ठाण्यात आपबिती सांगत होते. मुंडेंवर आरोप करणारी महिला ही आपल्याशी लगट करण्याचा प्रयत्न करत होती, संबंध ठेवण्याचा प्रयत्न करत होती, आपण अनेक वेळा तिला दुर्लक्षित केले, मात्र ती सातत्याने मॅसेज करत होती, तिला म्युझिक स्टुडिओ काढायचा होता, ती ब्लॅकमेल करत असायची, असे एक ना अनेक आरोप केले. कृष्णा हेगडे यांच्या आरोपांपाठोपाठ एअरवेज अधिकारी रिजवान शेख यांनीही आपली आपबिती पोलिस ठाण्यात येऊन मांडली आणि त्यांच्याशीही या महिलेने तशी लगट केली, ब्लॅकमेल करण्याचा कसा प्रयत्न केला, किती फोन केले, किती मॅसेज केले, तिची मागणी काय होती हे मांडत त्या महिलेविरोधात तक्रार नोंदविली. पाठोपाठ मनसेचे मनीष धुरी यांनीही सदरील महिला कशी लगट करत होती हे सांगून टाकले. धनंजय मुंडे यांच्यावर कथित आरोप करणारी महिला ही महाराष्ट्रातील अनेक पक्ष, संघटनांच्या पदाधिकार्यांसह उच्च पदस्थ अधिकारी अणि समाजात मान असलेल्या लोकांना आपल्या जाळ्यात ओढायची, असा स्पष्ट आरोप काल दिवसभर होत राहिला. सदरील महिलेच्या ‘कामा’चा व्याप किती मोठा आहे हे दिसून येते. तिच्या म्हणण्यानुसार ती पीडित आहे की, लोकांनी तिच्या विरोधात केलेल्या तक्रारीनुसार ते पीडित आहेत हे महाराष्ट्र कालच उमजून चुकलाय. परंतु तिच्या कथित आरोपांमुळे ना. मुंडेंना व्यक्तीगत जीवन चव्हाट्यावर आणावं लागलं, मन:स्ताप सहन करावा लागत आहे.