Friday, May 20, 2022
No menu items!
Homeबीडएकटं लढण्या इतकं काँग्रेसमध्ये बळ आहे का?

एकटं लढण्या इतकं काँग्रेसमध्ये बळ आहे का?

मजीद शेख । बीड
अंगात बळ असेल तर माणसाने बाहया पाठीमागं साराव्यात, बळच नसेल तर उगीच बाहया सारुन फायदा नसतो. बळ नसतांना समोरच्या ‘तगड्या’ पहीलवाना बरोबर लढणं म्हणजे स्वत:चे हात-पाय मोडून घेण्यासारखं आहे. अंगात बळ आणण्यासाठी त्याला परिश्रम करावे लागतात. रोज जोर बैठका काढाव्या लागतात, हे सगळं न करता. जत्रेचा आखाडा जवळ आला की, तगड्या पैलवानांना आव्हान देणं म्हणजे फक्त शरीरात नव्हे तर बोलण्यातच ‘दम’ आहे असं दिसून येतं. अशीच काहीशी अवस्था काँग्रेस पक्षाशी आहे. काँग्रेस मोठा पक्ष होता आज तो राहिला नाही, याचं भान काँग्रेसच्या नेत्यांना नाही. मुंबई महापालिकेच्या पुढील वर्षी निवडणुका होणार आहे. या निवडणुकीसाठी एकटे लढण्याची घोषणा आता पासूनच मुंबईचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केली. त्यांनी कुठल्या भावनेच्या भरात ही घोषणा केली हे त्यांनाच ठावूक, आपल्या पक्षाचं संघटन किती मोठं आहे, याचा त्यांना अंदाज नसावा. राज्यात तीन पक्षाचं सरकार असतांना त्यांना एकटं लढवण्याची का बरं आठवण झाली आणि तसं झालं तर निकाल काय लागणार हे सांगण्याची गरज नाही.

niwadnuk logo 2


निवडणुका म्हटलं की, राजकीय आखाडा असतो. हा राजकीय आखाडा जिंकण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. प्रयत्न न करता कुणी आखाडा जिंकू शकत नाही. काँग्रेस पक्ष हा जुना आहे. एक काळ होता काँग्रेसचा ‘आवाज’ होता. ग्राम पंचायतीपासून ते संसदे पर्यंत ‘पंजाची’ चलती होती, काँग्रेस पक्षाने दगडी ही उभा केला तरी तो निवडून येत होता. इतकं मोठं जनमत या पक्षाच्या पाठीमागं होतं. काळानूसार पक्षाला घरघर लागली. गेल्या दहा वर्षात पक्षाची मोठी हानी झाली. प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसला बोटावर मोजण्या इतक्याच जागा मिळू लागल्या. 2019 च्या लोकसभा आणि विधानसभेत राज्यात काँग्रेसची चांगली कामगिरी राहिली नाही. लोकसभेत फक्त एकच जागा जिंकता आली. विधानसभेत कशाबशा 44 जागा मिळाल्या. या जागा काँग्रेस पक्षासाठी भुषणाची बाब नाही, पण 44 जागा तरी मिळाल्या यात मात्र राज्यातील काँग्रेसचे नेते समाधान मानून होते. शिवसेना-भाजपाची युती न झाल्याने तीन पक्षाचं सरकार राज्यात स्थापन झालं. त्यामुळे काँग्रेस पक्षाला कधी वाटलं नव्हतं आपण सत्तेत येवू पण सत्तेची संधी आली. राज्यातील सत्तेत काँग्रेस पक्ष असला तरी राज्यात पक्ष वाढला असं बिलकुल झालं नाही. काँग्रेसला कोणाचा ना कोणाचा आधार घेवूनच निवडणुका लढवाव्या लागतील. कारण एकटं लढण्या इतकी ताकद काँग्रेस पक्षामध्ये नाही हे मान्य करावं लागेल. मुबंई महापालिकेची निवडणूक पुढील वर्षी होत आहे. या निवडणुकीत स्वबळाचा नारा मुंबईचे अध्यक्ष भाई जगताप यांनी दिला. त्यांनी कुठल्या आधारावर हा नारा दिला हे त्यांनाच माहित? कारण मुंबईवर काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकावणं सोपं नाही. निवडणुका फक्त घोषणा करुन आणि आरोप-प्रत्यारोप करुन जिंकता येत नसतात. त्यासाठी परिश्रम करावे लागतात. पक्ष वाढवावा लागतो. आज काँग्रेस पक्षवाढीसाठी काँग्रसेचे नेते किती प्रयत्न करतात हे निवडणुकात दिसूनच येत आहे. त्यामुळे स्वबळाचा नारा देवून उलट स्वत:च हासू करुन घेण्यासारखं आहे. आज पर्यंत अनेक निवडणुका काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्रीत लढवलेल्या आहेत. त्याचा फायदा या दोन्ही पक्षाला झालेला आहे. पक्षाचं तितकं मोठं संघटन असतं तर एकटे लढण्याची हिमंत दाखवता आली असती पण पक्षाचं बळ आज कमी झालेलं आहे, याचा विसर कदाचीत काँग्रसेच्या नेत्यांना पडला की काय असं वाटू लागलं. एकटं लढल्यामुळे काय निकाल लागेल हे सांगण्याची गरज नाही. एका वर्षात मुंबईमध्ये पक्ष भरारी घेईल असं नेतृत्वही नाही. मग कशाच्या बळावर स्वबळाचा नारा दिला गेला?

एकीचा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत फायदा झाला
महाआघाडीचा प्रयोग प्रथमच राज्यात झाला. तीन पक्ष एकत्रीत आले आणि राज्यात वेगळा इतिहास लिहला गेला. या तिन्ही पक्षाची मिळून मोठी ताकद निर्माण झाली. या ताकदीचा उपयोग या तिन्ही पक्षांनी प्रत्येक निवडणुकीत केला तर नक्कीच या तिन्ही पक्षांना फायदा होवू शकतो. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महाआघाडीचा प्रयोग दिसून आला. सहा पैकी चार जागा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यात आल्या. दोन जागा काँग्रेसला मिळणं ही खुप मोठी बाब आहे. काँग्रेस पक्ष या निवडणुका स्वबळावर लढला असता तर हातात भोपळा दिसला असता. दोन जागा मिळाल्याने काँग्रेस पक्षाच्या अंगात चांगलेच बळ आले हे नाकारुन चालणार नाही, हे बळ महाआघाडीचा करिष्मा आहे हे विसरुन चालणार नाही.

Most Popular

error: Content is protected !!