बीड, गेवराई, अंबाजोगाई, आष्टी, परळीत पाचशे कोरोना योद्ध्यांना दिली जातेय लस, बीडमध्ये सर्वप्रथम डॉ. पांगरीकरांनी घेतली लस, दुपारी एक वाजेपर्यंत जिल्ह्यात 94 कोरोना योद्ध्यांना दिली गेली लस
बीड (रिपोर्टर)- बहुप्रतीक्षीत कोरोना लस अखेर आली असून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन उद्घाटन केल्यानंतर आज बीड जिल्हा रुग्णालयासह गेवराई, आष्टी, अंबाजोगाई आणि परळी या पाच तालुक्यात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. सर्वप्रथम कोरोना योद्धांना ही लस देण्यात येत असून आज पाचशे कोरोना योद्धांना लस देण्यास सुुरुवात झाली आहे. लसीमुळे कोनावर साईड इफेक्ट होतात का हे पाहण्यासाठी लस दिल्यानंतर संबंधितांवर डॉक्टरांची टिम लक्ष ठेवून आहे. बीडमध्ये जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्या उपस्थितीत लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली.
गेल्या वर्षभरामध्ये देशातच नव्हे तर जगभरात कोरोनाने हाहाकार माजवून सोडला होता. अवघ्या जगातले शास्त्रज्ञ लस शोधण्याच्या मोहिमेत होते. प्रदीर्घ कालावधीनंतर अखेर कोरोनावर लस शोधण्यात आली. देशात दोन मेड इन इंडियाच्या लस देण्याचा निर्णय झाला आणि आज देशभरात कोरोनाची लस देण्याचा शुभारंभ पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आला. इकडे महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन करून राज्यभरात लसीकरण मोहिमेस सुरुवात झाली. बीडमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्या उपस्थितीत लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी आरोग्य अधिकारी डॉ. पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुर्यकांत गित्ते यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम कोरोना योद्धांना सदरची लस दिली जात असून बीड जिल्ह्यात बीड, गेवराई, आष्टी, परळी या ठिकाणी प्रत्येक दिवशी शंभर लसीकरण आजपासून केले जात आहे. आज दुपारी एक वाजेपर्यंत जिल्ह्यात 94 कोरोना योद्धांना ही लस देण्यात आली. बीडमध्ये सर्वप्रथम सदरची लस ही डॉ. पांगरीकर यांनी घेतली. कोरोनाची लस उपलब्ध झाल्याने सर्वत्र आनंदही आनंद गडे... दिसून येत आहे.
महाराष्ट्राला साडेसात लाख डोसची गरज -राजेश टोपेे
केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला सुमारे दहा लाख कोरोनाचे डोस उपलब्ध झाले आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये सुमारे आठ लाख आरोग्य योद्ध्यांची को-विन अॅपवर नोंद झाली आहे.एका व्यक्तीला दोन डोस द्यावे लागत असल्याने सुमारे 16 लाख डोसची महाराष्ट्राला गरज आहे. दहा टक्के तूट यानुसार महाराष्ट्राला साडेसतरा लाख डोसची गरज आहे. सुमारे दहा लाख डोस राज्याला उपलब्ध झाले असून साडेसात लाख डोस अजून मिळावेत यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
कोरोनाला रोखायचं, सुचनेचं पालन करा -उद्धव ठाकरे
कोविड विषाणू प्रतिबंधात्मक राज्यव्यापी लसीकरण मोहिमेचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते झाला. या वेळी ठाकरे म्हणाले की, आज आपण एक क्रांतीकारी पाऊल टाकत आहोत. युद्धात जसं काम केलं जातं तसं आपण कोविड काळात काम केलं. कोविड केअर सेंटर सुरू केलं, गेले काही दिवस येणार… येणार… म्हणता म्हणता आज लस आली आहे. आजपासून देशभरात आणि महाराष्ट्रातही लसीकरण सुरू झाले. सर्वांना लस मिळेपर्यंत काही दिवस जाणार आहेत. लसीचा प्रभाव कळायला काही दिवस जातील, सर्वात महत्वाची लस म्हणजे आपल्या चेहर्यावरील मास्क आहे. हात धुवा, सामाजिक अंतर राखा हे नियम आपल्याला पाळावेच लागतील. लसीकरणाची सुरुवात आज झाली खरी मात्र आपल्याला कोरोनाला पुर्णपणे रोखायचे आहे. त्यामुळे आमच्याकडून येणार्या सर्व सूचनांचे वेळोवेळी पालन करा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.