बीड (रिपोर्टर)
बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी तथा औरंगाबादचे आयुक्त सुनिल केंद्रेकर यांचे चार फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत असून या फोटोत केंद्रेकर हे औरंगाबाद येथील एका बाजारतळावर सहकुटूंब बाजारासाठी आल्याचे दिसून येते. त्यांच्या हातात फळभाज्यांनी भरलेली पिशवी आहे. बाजार झाल्यानंतर तीच पिशवी खांद्यावर घेवून निघतानाचा एक फोटो पहावयास मिळत आहे. सदरचे चारही फोटो सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहेत. साधी राहणीमान, कर्तव्यपणा यासह अन्य कौतुकाचे विशेषणे लावत नेटकर्यांनी केंद्रेकरांचा अभिमान बाळगला आहे. एवढेच नव्हे तर असे अभिमानास्पद काम करण्याची उर्जा केंद्रेकर यांच्याकडे पाहिल्यानंतर मिळते. असेही अनेक नेटकर्यांनी म्हटले आहे. याबाबत केंद्रेकरांनी मात्र यात काही विशेष नाही, हा माझा दैनंदिन भाग असल्याचे रिपोर्टरला सांगितले.
सोशल मिडीयावर सकारात्मक दृष्टीकोनातून व्हायरल होणार्या सुनिल केंद्रेकरांच्या या फोटोंवर अनेकांनी कॅप्शन दिले आहे. त्यातलं एक कॅप्शन हे फोटो बघा, खादी आणि खाकी यांच्यात खुप पुढे जाणारे हे चारित्र्य आहे. समाजाचे खरे हिरो हे आहेत औरंगाबादचे विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर (आयएएस) औरंगाबाद भाजी बाजारात खरेदी करताना आपल्या कतृत्ववान खास बनल्यानंतर आम राहण्यात खरी कसोटी लागते माणसाची. कोणतही ढोंग न करता साधेपणा कसा टिकवला जावू शकतो याचे हे फोटो उदाहरण आहे. महाराष्ट्र नशीबवान आहे, प्रशासनात आजही असे अनेक अधिकारी आहे. ज्यांचे माणुसपण सुटलेले नाही, जे विद्यार्थी एमपीएससी आयएएस होण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांनी हे फोटो कायम स्मरणात ठेवावेत. अशा एक ना अनेक प्रतिक्रिया, बिरूदावली, शिर्षक वापरून फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हॉटसअप, टेलिग्राम यासह अन्य सोशल साईडवरून सुनिल केंद्रेकरांचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. सुनिल केंद्रेकर हे बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी असून त्यांची कारकीर्द वादळी आणि कार्यक्षम होवून गेलेली आहे.
केंद्रेकर जेव्हा बीडमध्ये होते तेव्हा मोठ्या दुष्काळाचा सामना सर्वसामान्य जनतेला करावा लागत होता. अशा परिस्थितीत केंद्रेकरांनी दुष्काळाचे ते दोन वर्ष लोकउपयोगी निर्णय घेत घालवले. पानलोट क्षेत्रामध्ये विहिरी खोदल्या, जिथे टँकर सुरू करायला पंधरा ते वीस दिवस लागायचे तिथे अर्ज आला की पाण्याचे टँकर सुरू केले. शहरातील रस्त्याचे रूंदीकरण यासह ते भरवत असलेले जनता दरबार आणि त्यात सुटणारे सर्वसामान्यांचे प्रश्न यामुळे केंद्रेकर बीड जिल्ह्यातील जनतेच्या गळ्यातले ताईत बनले. त्यांची बदली झाली तेव्हा बीडकरांनी मोठे आंदोलन उभारले होते. केंद्रेकरांची कार्यप्रणाली आणि कर्तव्यदक्षपणा बीड जिल्ह्यातील जनतेला भावला होता. बदली झाल्यानंतरही बीडकर केंद्रेकरांच्या प्रेमात आजही असल्याचे दिसून येते. केंद्रेकर बाजारतळावर भाजीपाला घेण्यासाठी गेल्याचे काही फोटो कालपासून बीड जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहेत. अत्यंत साधी राहणीमान, उच्च विचार असे एक ना अनेक स्लोगन बिरूदावली वापरत नेटकरी केंद्रेकरांचे तोंडभरून कौतुक करताना थकत नाहीत. आयुक्त सुनिल केंद्रेकरांनी बाजारात जरी भाजीपाल्याची पिशवी खांद्यावर घेतली असली तरी नेटकर्यांनी मात्र केंद्रेकरांचा बाजाराच सोशल मिडीयावर डोक्यावर घेतला आहे.
याबाबत थेट सुनील केंद्रेकर यांच्याशी रिपोर्टर ने संपर्क केला असता केंद्रेकर म्हणाले यात विशेष ते काहीच नाही माझे ते रुटीनचे आहे