Friday, May 20, 2022
No menu items!
Homeसंपादकीयअग्रलेख- चितेवर नेणारा फ्ल्यु

अग्रलेख- चितेवर नेणारा फ्ल्यु


गणेश सावंत
९४२२७४२८१०

२०२० च्या सालात यमाची नगरी सजली होती. रेड्याला थोडीही उसंत नव्हती, इकडे मात्र माणसे रोज मरत होती. कोरोनाने आपल्या विळख्यात संपुर्ण जगाला घेतले होते. बाहेर फिरणाराच नाही तर कधी कधी घरात बसणाराही यमाच्या दारात जावून येत होता. कोरोना असा एक फ्ल्यू ज्याने अखंड जगात हाहाकार उडवून सोडला. या फ्ल्यूच्या उच्छादाने माणूस माणसात राहिला नाही की, माणसाला जगणं मुश्किल होऊन बसलं. या फ्ल्युचा असर आता कमी होताना दिसत आहे. तोच माणसांबरोबर आता पशू-पक्ष्यांच्या यमाच्या नगरीचे तोरण बर्ड फ्ल्यु बांधताना दिसून येतो. इथं पशू-पक्षी मरत असले तरी माणसांनाच त्याचा फटका बसणार आहे. कोरोना काळात सर्वसामान्य माणसांनी प्राण गमवले. आता राज्यावर आणि देशावर बर्ड फ्ल्युचे सावट आल्याने पक्षी कोंबड्या पटापट मरू लागले आहेत. त्यामुळे शेतकरी कुक्कुटपालन करणारे पोल्ट्री फार्मसह समाजातील व्यापारी वर्गालायाचा फटका मोंठ्या प्रमाणावर बसणार आहे. तो वर्ग पुन्हा एकदा फ्ल्युच्या संकटात येऊन अडकला आहे. बर्ड फ्ल्युने पक्षी मरण पावल्याच्या बातम्या जशाच येऊन धडकल्या तसे चिकन विक्रीत ४० ते ४५ टक्क्यांनी घसरण झाली. त्याचा आर्थिक फटका सर्वसामान्यातील सर्वसामान्य माणसांसह एका मोठ्या वर्गाला बसताना दिसून येत आहे. एकीकडे कोरोना लस सापडल्याचा उत्सव सुरू असताना हे नवे संकट सर्वत्र फडफडताना दिसून येत आहे. या बर्ड फ्ल्यु संकटात कोंबड्या, पक्षी मरत आहेत. याची चिंता नक्कीच माणूस म्हणून प्रत्येकाला भेडसावणारी आहे. आधीच २०२० चा साल मरण यातना सहन करावयास लावणारे त्यात २०२१ च्या सालातही फ्ल्युचा हा हैदोस सर्वसामान्यांना पुन्हा एकदा चिंताक्रांत करून सोडणारा आहे. जगामाध्ये असा कुठलाही देश कोरोनाने सोडला नाही तशा
बर्ड फ्ल्युने
आता भारत देशातला कुठला भाग सोडायचा नाही, असा जणू चंगच बांधला आहे. केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल, हरियाणा, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही या बर्ड फ्ल्युने आपले पाय पसरवण्यास सुरुवात केली आहे. गेल्या रविवारी बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात २६ कावळे मरून पडले. लातूरमध्ये कोंबड्या मेल्या, काल-परवा अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगामध्ये काही कोंबड्यांसह पक्ष्यांचा मृत्यु झाला. त्यामुळे पुन्हा एकदा अन्य राज्यांसह महाराष्ट्र हे फ्ल्युच्या संकटात येऊन अडकला. इथे माणसाचा आक्रोश ऐकायला कोणी तयार नाही, तेथे या पक्षी, कोंबड्यांच्या वेदना कोणी समजून घेईल का? अशी साधी सोपी आणि सरळ प्रतिक्रिया आजच्या व्यवस्थेवरून लोक व्यक्त करताना दिसून येत आहेत. तिकडे राजधानी दिल्लीतही पक्षी, कोंबड्या, बदके मरण पावल्याचे वृत्त आले आणि बाजार पेठेतून कोंबड्या, अंडी विक्री करणार्‍या दुकानांचे अक्षरश: शटर बंद झाले. फ्ल्युने पुन्हा एकदा पक्ष्यांसह माणसांना आपल्या कचाट्यात धरण्याचे धोरण आखल्याचे पुन्हा एकदा दिसून येऊ लागले. आधीच शेतकरी असंख्य संकटात सापडला असताना पुन्हा नव्याने फ्ल्युचे हे संकट शेतकर्‍यांच्याच उरावर थयथया नाचताना दिसून येत आहे.
शेतकरी
छाती बडवून

आपल्या वेदना सरकारसमोर, व्यवस्थेसमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे मात्र गेल्या पन्नास ते साठ दिवसांपासून व्यवस्था त्यांना दाद देत नाही. दिल्लीच्या सीमांवर हजारो शेतकरी कडाक्याच्या थंडीत पन्नास दिवसांपेक्षा जास्त दिवसांपासून आंदोलन करत आहेत याचे देणेघेणे प्रस्तूत सरकारला नसल्याचे आजपर्यंत दिसून आले आहे. शेतकर्‍यांबाबत केलेले तीन कृषी कायदे रद्द करण्यात यावेत या प्रमुख मागणीसाठी शेतकरी आंदोलन करत असताना सरकारमधील लोक या आंदोलनाला आणि आंदोलकांना पाकिस्तानी, खलिस्तानी, चीनी, नक्षलवादी, माओवादी म्हणत आहेत. आता बर्ड फ्ल्युने पक्षी, कोंबड्या देशातल्या अनेक राज्यात मरत आहेत. तेव्हा सरकारमधले काही बगलबच्चे यामागेही पाकिस्तानी अथवा जातीयवादी शक्तींचा हात असल्याचा आरोप करतील. त्यात नवल ते काहीच नसेल. बर्ड फ्ल्युने ते पक्षी मरत आहेत, कोंबड्या मरत आहेत यात नुसते कोंबड्यांचे मरण नाही तर कोंबड्यांची शेती करणार्‍या देशभरातील लाखो शेतकर्‍यांचे मरण म्हणावे लागेल. कुक्कुटपालनाचा व्यवसाय करणारे शेतकरी या फ्ल्युमुळे अडचणीत सापडले यात दुमत असण्याचे कारण नाही. नव्या कृषी कायद्यानुसार या फ्ल्युला सरकारला रोखता येत असेल तर त्यांनी कायदा किती चांगला आहे हे दाखवण्यासाठी त्या फ्ल्युला रोखून दाखवावे आणि छाती बडवून दाद मागणार्‍या शेतकर्‍यांना दिलासा द्या, परंतु तसं होणार नाही. शेतकरी सर्वस्तरातून पिचला जाईल, तो वेदनेने विव्हाळेल तेव्हा दोन-पाच हजारांची मदत खात्यावर टाकून त्याची बोळवण केली जाईल. बर्ड फ्ल्युमुळे ग्रामीण भागातले कुक्कुटपालन करणारे शेतकरी आणि त्यांचे कुटुंबही यामध्ये मरत आहेत, याचं भान अद्यापही बहुदा देशातल्या केंद्र सरकारला आणि राज्यातल्या सरकारला नसावं, हे दुर्दैव म्हणावे लागेल. गेल्या सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बर्ड फ्ल्युबाबत बैठक घेतली आणि उपाय योजनांच्या सूचना दिल्या असल्या तरी त्यातून कुक्कुटपालन करणार्‍या शेतकर्‍यांची कोंबडी शेती उद्ध्वस्त होण्यापासून वाचणार आहे का?
बीडमधला
फ्ल्यु

गेल्या आठ दिवसांचा गेल्या आठवडाभरापुर्वीच पाटोदा तालुक्यात कावळे मरून पडल्याची घटना उघडकीस येते. त्या कावळ्यांचे शवविच्छेदन होते आणि त्यामध्ये बर्ड फ्ल्यु असल्याचे निष्पन्न होते. त्यापाठोपाठ आष्टी, अंबाजोगाई आदी भागातही बर्ड फ्ल्युमुळे कोंबड्या मरून पडल्याच्या घटना घडतात. एकूणच फ्ल्यु पुन्हा झपाट्याने पाय पसरत असल्याचे दिसून येत असल्यामुळे साहजीकच शेतीसह कुक्कुटपालन, छोटे मोठे उद्योग, व्यवसाय, व्यापार करणार्‍या लोकांचे तोंडचे पाणी पळणार यात दुमत असण्याचे कारण नाही. फ्ल्यु जेव्हा जेव्हा आला तेव्हा तेव्हा सर्वसामान्यातील सर्वसामान्य माणसांना त्याची किंमत चुकवावी लागली. आताचा बर्ड फ्ल्यु हा कोंबड्या, पक्षी मारत नाही तर त्यांच्या अंड्यावर आणि कोंबड्यावर उद्योग व्यवसाय करणार्‍या शेतकर्‍यांसह त्यांच्या कुटुंबियांना मारत आहे. अशा वेळी त्या शेतकर्‍यांना आणि उद्योग व्यवसाय करणार्‍या व्यवसायिकांना मदतीचा हात देणे हे केंद्रातील सरकारबरोबर राज्य सरकारचे आद्य कर्तव्य आहे. बीडमध्ये मोठ्या प्रमाणावर कुक्कुटपालनचा व्यवसाय केला जातो. जिल्ह्यातल्या काही तालुक्यात बर्ड फ्ल्युचा प्रसार होत आहे. प्रशासन हा प्रसार रोखण्यासाठी त्या त्या भागात कंटेनमेंट झोन लागू केले असले तरी फ्ल्युचा प्रसार रोखता येईलच हे सांगणे कठीण आहे. पाटोदा तालुक्यात ज्या कावळ्यांना बर्ड फ्ल्यु झाल्याचे निष्पन्न झाले तसे अन्य पक्ष्यांना बर्ड फ्ल्यु असू शकतो आणि हे पक्षी अन्य ठिकाणी कुठेही जावून त्याचा फैलाव करू शकतात. खरंतर या परिस्थितीला रोखण्यासाठी व्यवस्थेबरोबर सर्वसामान्यातील सर्वसामान्य माणसांनी समोर यायला हवे. गेल्या वर्षभराच्या कालखंडामध्ये फ्ल्यु भारतीयांची पाठ सोडायला तयार नाही. कोरोनासारखा फ्ल्यु, बर्ड फ्ल्यु हे येण्यापासून रोखता न येणारे फ्ल्यू असले तरी
व्यवस्थेतल्या
फ्ल्यूचे काय?

हा सवाल उपस्थित करावा लागेल. एकीकडे कोरोना काळामध्ये काम करताना अनेक आरोग्य कर्मचार्‍यांसह डॉक्टरांचं कौतुक नक्कीच केलं गेलं पाहिजे. परंतु आरोग्य व्यवस्थेचं काय? त्या व्यवस्थेमध्ये कामचुकार पद्धतीने काम करणार्‍यांचे काय? हा सवालही उपस्थित व्हायलाच हवा. २०२० चा साल कोरोनाने हाहाकार उडवून देणारा, आरोग्य व्यवस्थेला महत्व प्राप्त करून देणारा, आरोग्याबाबत सर्वसामान्यांपासून सर्वोच्च व्यवस्थेपर्यंत काळजीपुर्वक काम करण्याचे संकेत देणारं ते वर्ष असताना खरचं कोरोनाने समाजव्यवस्थेसह केंद्र आणि राज्य सरकारमधील आरोग्य व्यवस्थेला हुशार केले का? तर त्याचं उत्तर नाही येईल. नव्या वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात महाराष्ट्रातल्या भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात जे जळीत कांड झालं शिशूगृहाला आग लागून धुराने गुदमरून एक नव्हे दोन नव्हे दहा बालके मरण पावले. आज बर्ड फ्ल्युमुळे जसे पक्षी आणि कोंबड्या मरत आहेत त्यापेक्षा विदारक अवस्थेत ते दहा बालके तडफडून मेले. कोरोनासारख्या फ्ल्युला आणि बर्ड फ्ल्युला रोखण्यासाठी काहीही करता येईल परंतु व्यवस्थेतल्या या फ्ल्युमुळे मरण पावलेल्या त्या १० बालकांचे काय? आजही आपल्याकडे आरोग्य आणि शिक्षण व्यवस्थेकडे दुर्लक्ष केले जाते. देशाच्या आणि राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये त्याला बजेट कमी दिले जाते. हे व्यवस्थेतील फ्ल्युचे सर्वात मोठे लक्षण नव्हे का? म्हणून आता कोरोनासारख्या फ्ल्युने माणसाला यमाच्या दारी नेलं, बर्ड फ्ल्युने पक्षी, कोंबड्यांना यमाच्या दारी नेलं. या दोन फ्ल्युमधून केंद्र आणि राज्य सरकारने शिकावं आणि व्यवस्थेतला फ्ल्यु दूर करावा.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!