शिरूर (रिपोर्टर)- शिरूर तालुक्यातील 8 ग्रामपंचायतींसाठी परवा मतदान झाल्यानंतर आज प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा दुपारपर्यंत हाती आलेल्या तीन ग्रामपंचायतींच्या निकालानुसार राहेमोहा ग्रामपंचायतीवर विद्यमान पंचायत समिती सदस्य जालिंदर सानप यांनी झेंडा फडकविला असून माजी जि.प. सदस्य मदन जाधव यांचा 5 मतांनी ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव झाला आहे.
शिरूर तालुक्यात रायमोहा ही मोठी ग्रामपंचायत असून या ठिकाणी पंचायत समिती सदस्य जालिंदर सानप यांच्या गटाचे 7 सदस्य तर माजी जि.प. सदस्य मदन जाधव यांच्या गटाचे 4 सदस्य निवडून आले. मदन जाधव हे अवघ्या 5 मतांनी पराभूत झाले. तर कान्होबाचीवाडी या ठिकाणी माजी सरपंच संतोष सवासे यांच्या गटाचे पाच सदस्य तर माजी सदस्य बबन मोरे यांच्या गटाचे दोन सदस्य निवडून आले. ही ग्रामपंचायत सवासे यांच्या ताब्यात गेली. इकडे कोळवाडी ग्रामपंचायतीमध्ये माजी सरपंच बाबासाहेब नेटके यांना धक्का देत राजकारणात नवखे असलेले साईनाथ नेटके यांनी 4 सदस्य आणून ग्रामपंचायत आपल्या ताब्यात घेतली. बाबासाहेब नेटके यांच्या गटाला दोन तर सुभाष यमपुरे यांच्या गटाचा एक उमेदवार निवडून आला.