Friday, May 20, 2022
No menu items!
Homeबीडतीन मिनिटाची डेंजर ट्रॅव्हलींग सिंदफणा नदीतील थरार

तीन मिनिटाची डेंजर ट्रॅव्हलींग सिंदफणा नदीतील थरार

बीड तालुक्यातील आहेरचिंचोली ग्रामस्थांची ३० टक्के शेती सिंदफना नदीच्या दुसर्‍या बाजूला असल्याने दररोज होडीतून प्रवास करून शेतात जाण्याची वेळ
शेत मालकांना, शेत मजूर, वृद्ध व महिलांना शेतात जाण्यासाठी होडी एकमेव मार्ग, होडीतून प्रवास करतांना होतो थरकाप; शनिवारी दै.रिपोर्टरच्या प्रतिनिधीने आहेरचिंचोली गावात जावून प्रत्यक्ष घेतला अनुभव
शेतीला पाणी देण्यासाठी जातांना होडी उलटून एका ग्रामस्थाचा पाण्यात बुडून झाला होता मृत्यू तर अनेक वेळा होडी उलटल्याच्या झाल्या घटना
पिढ्या ना पिढ्या तेथील ग्रामस्थांचा शेती पिकवण्यासाठी होडीतूनच प्रवास, दररोज जीव धोक्यात टाकून करावी लागते शेती
गावातील योगेश सावंत, श्रीराम रकटे, राजेंद्र मस्के या तरूणांनी अनेक वेळा वाचवले होडी उलटल्यानंतर ग्रामस्थांच प्राण
पुर्वी तेथील शेतकर्‍यांना नदीतून पोहून जावे लागत होते शेतात, तीन वर्षापूर्वी ग्रामस्थांनी वर्गणी करून बनविली थर्माकॉलची होडी


पावसाळ्यात तर चक्क २०० मीटरच्या अंतरावर असलेल्या शेतात जाण्यासाठी करावा लागतो पंधरा कि.मी.चा प्रवास, आहेरचिंचोली गावातून हिरापूरला जावून शेतात यावे लागते
आहेरचिंचोली येथील ग्रामस्थांनी केली तात्पुर्त्या लोखंडी पुलाची मागणी; आ.संदिप क्षीरसागर करत आहेत पाठपुरावा, ग्रामस्थ आशावादी
या पावसाळ्यापुर्वीच कराव्या लागणार उपाय योजना; प्रशासनाने तात्काळ दखल घेण्याची गरज
या दररोजच्या जीवघेण्या प्रवासाला त्या गावातील महिला, वृद्ध भयभीत तर शेतात काम करण्यासाठी मजूर मिळेना; होडीतून रस्ता ओलांडतांना त्या ग्रामस्थांच्या चेहर्‍यावर मरणासन्न सन्नाटा स्पष्ट दिसून येतो
बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतकर्‍यांना स्वत:च्या शेतात जाण्यासाठी रस्ते नाहीत; नद्यातून, ओढ्यातून काढावी लागते वाट


शहरापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या खजाना विहिरीसमोर समनापूर शिवारातील शेतकर्‍यांना वर्षाच्या सात महिने नदीच्या पाण्यातून व पाच महिने नदीतील गोठ्यातून करावा लागतो प्रवास
शनिवारी त्या परिसरातील एकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे मृतदेह रूग्णालयामधून ऍम्ब्युलन्समध्ये घरी घेवून जात असतांना त्या ऍम्ब्युलन्सला डोंगर उतरून नदीतून जाण्याची वेळ; सुदैवाने नदीचे पात्र कोरडे
हायवे किंवा इतर सर्व्हिस रोड शेजारी अनेक शेतकर्‍यांची शेती परंतू रस्त्याअभावी या शेतकर्‍यांचा विकास खुंटलेला, प्रशासनाने आशा ठिकाणी पुल बांधून थेट मुख्य रस्त्याला जोडले तर शेतकर्‍यांना मिळणार मोठा दिलासा


सोलापूर हायवेवरून दिसणार्‍या शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने पावसाळ्यास त्या शेतकर्‍यांना कोल्हारवाडी, समनापूर मार्गे शेतात जाण्याची वेळ किंवा नदीतील पाणी कमी झाल्यावर वाहने रस्त्यावर लावून दररोज पाई पाण्यातून ये-जा करतात दुध विक्रेते व शेतकरी
शेतकर्‍यांसाठी राज्य शासन विविध योजनांच्या माध्यमाने शेतकर्‍यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहेत. कोरोनानंतर शेतकर्‍यांच्या आत्महत्येच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणे घट आलेली दिसून येते ही अभिनंदनीय बाब आहे. परंतू अनेक शेतकरी वेदना सहन करूनही आपले जीवन जगतांना दिसतात. शेती करून आपली उपजिविका भागविणे हा एकमेव पर्याय असल्याने काही शेतकरी मोठ्या कष्टाने शेती पीकवितांना दिसून येतात. शेतकर्‍याच्या अडचणी प्रशासनापर्यंत पोहचल्या तर प्रशासन त्याकडे लक्ष देते. परंतू अशा अनेक अडचणी आहेत की त्या अडचणीचा मोठ्या प्रमाणात पाठपुरावा करावा लागतो. त्यासाठी अनेक शेतकर्‍यांचे प्रश्‍न प्रलंबित असतात. शेतकर्‍यांचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्‍न म्हणजे तो पाणी. परंतू जलसंधारणच्या माध्यमाने काही प्रमाणात पाण्यापासून शेतकर्‍यांना दिलासा मिळालेला दिसून येतो. तसेच यंदा पाऊस बर्‍या प्रमाणात झाल्याने सध्या तरी पाणी टंचाई पासून शेतकरी दूर आहे. दुसरा अत्यंत महत्त्वाचा प्रश्‍न म्हणजे शेतकर्‍यांना स्वत:च्या शेतात जाण्यासाठी रस्ता.

रस्त्याचा प्रश्‍न अत्यंत ऐरणीवर आलेला दिसून येत आहे. शेती पिकविण्यासाठी शेतकरी रस्त्याअभावी स्वत:चे जीव धोक्यात टाकून शेती पिकवितांना दिसून येत आहेत. त्याचे ताजे उदाहरण पहायला मिळाले ते म्हणजे बीड तालुक्यातील आहेरचिंचोली गावात. त्या गावातील शेतकरी पिढ्या ना पिढ्या पाण्यातून प्रवास करून शेती पिकवितांना दिसून आले. त्यांचा त्या तीन मिनिटाचा प्रवास पाहून थरकाप होतो. शनिवारी दै.रिपोर्टरच्या प्रतिनिधीने प्रत्यक्ष आहेरचिंचोली गावात जावून पाहणी केली आणि त्या डेंजर ट्रॅव्हलींगचा अनुभव घेतला. अत्यंत भयावह परिस्थितीत प्रवास करून त्या परिसरातील ग्रामस्थ शेती पिकवितांना दिसून आले. याकडे प्रशासनाने विशेष लक्ष देण्याची गरज असून आ.संदिप क्षीरसागर स्वत: याकडे विशेष लक्ष देवून असून प्रशासनानेही आपल्यास्तरावर पुढाकार घेण्याची गरज आहे. विशेष म्हणजे तीन वर्षापूर्वी या गावात एका शेतकर्‍याचा शेतात जातांना प्रवासा दरम्यान पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर अनेक वेळेस पाण्यातील होडी उलटल्याने घटना घडल्या. सुदैवाने अनेक वेळेस गावातील तरूणांनी तेथील ग्रामस्थांचे, महिलांचे प्राण वाचवले. अद्यापही त्या गावात मोठी दुर्घटना घडलेली नाही. यापुर्वीच उपाय योजना करणे अत्यंत गरजेचे झाले आहे.
बीड तालुक्यातील आहेरचिंचोली गावातील ग्रामस्थांची ३० टक्के शेती सिंदफना नदीच्या दुसर्‍या बाजुला असल्याने आहेरचिंचोली ग्रामस्थांना आपल्या शेतीच्या सिंचनासाठी सिंदफना नदी पार करून शेती करावी लागते. सिंदफना नदीचा मोठा पाट गावातून जात असल्याने ज्यावेळी हे शेतकरी स्वत:च्या शेतात जातात त्यांना तीन मिनिटाचा सिंदफना नदीतील प्रवास होडीतून करावा लागतो. पुर्वी या गावातील ग्रामस्थ अक्षरश: पोहून शेती करण्यासाठी जात असे. तसे पाहिले तर त्या गावातील ग्रामस्थ पिढ्या ना पिढ्या अशाच प्रकारे प्रवास करून शेती पीकवत आहेत. तीन वर्षापूर्वी तेथील ग्रामस्थांनी व सरपंच रकटे यांनी पुढाकार घेवून नदीचे पात्र पार करण्यासाठी एक थर्माकॉलची होडी तयार केली.

त्या होडीवर एका वेळी १० व्यक्ती प्रवास करू शकतात. होडीच्या दोन्ही बाजुने दोरी बांधलेली आहे. ज्यांना कोणाला आपल्या शेतात जायचे असेल त्यांनी दोरी ओढून होडीत बसावे व दुसर्‍या बाजुची दोर ओढली तर काही मिनिटात सिंदफना नदीच्या दुसर्‍या बाजुला सहज पोहचून जातात. दिवसभरात ही बोट ५० ते ७५ वेळा ये-जा करते. रात्री अपरात्री शेतकरी याच बोटीतून प्रवास करून शेतात जातात. विशेष म्हणजे महिला, वृद्ध व गावात आलेल्या नवीन सुनबाई हमखास या होडीतून प्रवास करण्यासाठी घाबरतात. त्यांच्या चेहर्‍यावर या तीन मिनिटाच्या डेंजर प्रवास करतांना चेहर्‍यावरील मरनासन्न सन्नाटा स्पष्ट दिसून येतो. परंतू दुसरा मार्ग नसल्याने तेथील शेतकर्‍यांना वर्षाच्या १२ महिने पाण्यातून ये-जा करावी लागते. या शेतकर्‍यांचा पाण्यातील हा प्रवास पाहून थरकाप होतो. एवढेच नव्हे तर जिल्ह्यातील अनेक शेतकर्‍यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. त्या शेतकर्‍यांच्या शेतासमोरून मोठमोठे हायवेचे रस्ते जातात. परंतू स्वत: या शेतकर्‍यांना ये-जा करण्यासाठी रस्ता नसतो. प्रशासनाने शेतकर्‍यांच्या रस्त्याचा मार्ग मोकळा करावा. जेणेकरून शेतकर्‍यांना शेती पिकवण्यासाठी दिलासा मिळेल व या शेतकर्‍यांच्या जमिनीची मागणी वाढेल. सध्या अनेक शेतकर्‍यांना शेतात जाण्यासाठी रस्ते नाहीत. रस्त्याअभावी या शेतकर्‍यांना मोठी रिस्क घेवून प्रवास करून शेतात जाण्याची वेळ येते. प्रशासनाने शेतकर्‍याच्या या प्रश्‍नाकडे विशेष लक्ष देण्याची गरज असून जिल्ह्यातील अशा अनेक गावे आहेत की ज्यांना धोकादायक रस्त्यातून प्रवास करून ये-जा करावी लागते. आहेरचिंचोली हे ताजे उदाहरण असले तरी बीडपासून काही अंतरावर असलेल्या समनापूर शिवारातील शेतकर्‍यांचीही अवस्था अशीच असून हायवेपासून शंभर मीटरवर असलेल्या शेतात जाण्यासाठी येथील शेतकर्‍यांचेही अतोनात हाल होत आहेत.

शंभर मीटरच्या शेतात जाण्यासाठी १५ कि.मी.चा प्रवास
आहेरचिंचोली गावातील ग्रामस्थांना पावसाळ्यात शेतात जाण्यासाठी गावाजवळच असलेल्या बंधार्‍यावरून ये-जा करावी लागते. परंतू तो बंधाराही तुटला असल्याने व पावसाळ्यात नदीतील पाणी उफान मारत असल्याने होडीचा ही वापर करता येत नाही. यामुळे या शेतकर्‍यांना शंभर मीटरवर असलेल्या शेतात जाण्यासाठी पंधरा किलो मीटरचा प्रवास म्हणजे आहेरचिंचोली, हिरापूर मार्गे शेतात अशा प्रकारे शेतकर्‍यांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच बीडपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या खाजाना विहिरीसमोर समनापूर शिवारातील शेतकर्‍यांना नदीतून प्रवास करावा लागतो. पावसाळ्यात या शेतकर्‍यांनाही कोल्हारवाडी, समनापूर मार्गे शेतात जावे लागते. तसेच शनिवारी समनापूर शिवारातील या शेतकर्‍यांची अवस्था पाहण्यासाठी गेले असता त्यावेळी त्यापरिसरातील एका शेतकर्‍याचा मृत्यू झाला होता. या शेतकर्‍याचा मृतदेह रूग्णालयातून ऍम्ब्युलन्समधून घरी घेवून जाण्यासाठी डोंगर उतरून नदीचे पात्र ओलांडून मृतदेह घेवून जावे लागले. सुदैवाने नदीचे पात्र कोरडे होते. तसे पाहिले तर या शेतकर्‍यांना सात महिने पाण्यातून व पाच महिने दगडातूनच प्रवास करावा लागतो.

एका शेतकर्‍याचा होडी उलटून बळी
पिढ्या ना पिढ्या आहेरचिंचोली गावातील ग्रामस्थ सिंदफना नदीतून प्रवास करून आपल्या शेतात शेती पिकवितात. तीन वर्षापूर्वी त्या गावात थर्माकॉलची होडी तयार करून त्या होडीतून शेतकर्‍यांची सध्या ये-जा सुरू आहे. काही दिवसापूर्वी गावातील एक ग्रामस्थ शेतीला पाणी देण्यासाठी शेतात जात असतांना रात्रीच्या वेळी अचानक बोट पलटली. यात त्या शेतकर्‍याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. होडी उलटण्याच्या घटना अनेक वेळा घडल्या. गावातील तरूण मुले हमखास होडीतून कोणी शेतकरी प्रवास करत असेल तर त्याच्यावर नजर ठेवून असतात. म्हणूनच गावातील श्रीराम रकटे, योगेश सावंत, राजेंद्र मस्के या तरूणांनी अनेक वेळेस होडी उलटल्यानंतर पोहून बुडणार्‍यांचे प्राण वाचविले. सुदैवाने आत्तापर्यंत त्या गावात मोठी घटना घडलेली नाही. यापुर्वीच प्रशासनाने शेतकर्‍यांचा प्रश्‍न मार्गी लावावा.

तात्पुरता लोखंडी पुल करा
आहेरचिंचोली गावातील ग्रामस्थ होडीने प्रवास करतात. हा त्यांचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्‍न असल्याने तेथील सरपंच विकास रकटे यांनी पाठपुरावा करून आ.संदिप क्षीरसागर यांच्याकडे ग्रामस्थांच्या वतीने तात्पुरता लोखंडी पुल सिंदफना नदीवर करावा. जेणेकरून ग्रामस्थांना तात्पुरता दिलासा मिळेल. तसेच पिढ्या ना पिढ्या या गावातील ग्रामस्थ जीव धोक्यात टाकून शेती पिकवितात. सुदैवाने मोठी दुर्घटना अद्यापही गावात घडलेली नाही. या ग्रामस्थांना आ.संदिप क्षीरसागर यांच्याकडून अपेक्षा असून या संदर्भात आ.संदिप क्षीरसागर पाठपुरावा करत असून लवकरच आमच्या गावाचा प्रश्‍न मार्गी लागेल अशी माहिती सरपंच विकास रकटे, गोविंद खुणे, विनायक रकटे, संजय मस्के यांनी दिली.

Most Popular

error: Content is protected !!