गेवराई (रिपोर्टर)- जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या गेवराई तालुक्यातील तलवाडा, मादळमोही, गढी, ग्रा.पं.सह २२ ग्रामपंचायतींपैकी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे ८, भाजपा ५, शिवसेना ४, महाविकास आघाडी २, अपक्ष १ ठिकाणी सत्तेत आला असून तलवाडा ग्रामपंचायतीत २० वर्षांपासून वर्चस्व राखून असलेले सुरेश हात्ते यांच्या पॅनलला अवघ्या दोन जागा मिळाल्या. या ठिकाणी महाविकास आघाडी १५ जागा घेऊन बहुमतात आली तर बप्पासाहेब तळेकरांचं वर्चस्व असलेल्या मादळमोहीत दिपक वारंगे यांच्या सर्वच्या सर्व १७ जागा बहुमताने विजयी झाल्या. या ठिकाणी तळेकरांना जबरदस्त हादरा मतदारांनी दिला. गेवराई तालुक्यावर पुन्हा एकदा माजी आमदार अमरसिंह पंडितांचे वर्चस्व ग्रा.पं.निवडणुकीच्या माध्यमातून दिसून आले.
गेवराई तालुक्यातील एकूण २२ ग्रामपंचायतींसाठी निवडणुक होऊन २१ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले होेते. त्यापैकी गोविंदवाडी ही ग्रामपंचायत बिनविरोध होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आ. अमरसिंह पंडित यांचे गेवराई तालुक्यावर पुन्हा एकदा वर्चस्व राहिले असून या निवडणुकीत मादळमोही, भडंगवाडी, कुंभारवाडी, गढी, सुर्डी (बु.), डोईफोडवाडी, चोपड्याचीवाडी या राष्ट्रवादीच्या ताब्यात आल्या तर तळेवाडी, मन्यारवाडी, पांढरवाडी, टाकळगव्हाण, बाबुलतारा या पाच ग्रामपंचायती भाजपाच्या ताब्यात गेल्या असून जव्हारवाडी, मुळुकवाडी, खर्डा, मानमोडी या ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात गेल्या आहेत. गंगावाडी, तलवाडा या ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीचे वर्चस्व राहिले आहे तर चव्हाणवाडी या ग्रामपंचायतीमध्ये जय हनुमान ग्रामविकास पॅनलचा दणदणीत विजय झाला. या निवडणुकीमध्ये दोन मातब्बरांना जबरदस्त धक्का बसला. तलवाडा ग्रामपंचायत सुरेश हात्तेंच्या ताब्यातून गेली तर मादळमोही ग्रा.पं.वर २० वर्षांपासून निर्विवादीत वर्चस्व गाजवणारे बप्पासाहेब तळेकर यांना पराभवाचा सामना करावा लागला.