गेवराई (रिपोर्टर) तालुक्यातील गोदापात्र व सिंदफना नदी पट्ट्यात रात्री-अपरात्री हायवा व ट्रॅक्टरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक होत असून संबंधित वाळू तस्कर महसूल व पोलिस प्रशासनातील कर्मचार्यांना हाताशी धरून गोदापात्रात वाळूचे उत्खलन करत असल्याचे वेळोवेळी प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना अनेकवेळा सूचना निवेदन देऊनही कुठलीच कारवाई होत नसल्याने व वाळु लिलावबाबत विविध मागण्या घेऊन आमदार लक्ष्मण पवार यांनी गोदापट्ट्यातील ग्रामस्थ व कार्यकर्त्यांसह तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
गेवराई (रिपोर्टर)- गेवराई तालुक्यात गोदापत्रातून होणार्या अवैध वाळू वाहतुकीबाबत आ.लक्षण पवार यांनी दि.१३ जानेवारी रोजी प्रशासनाला निवेदन देऊन आमरण उपोषणाचा इशारा दिला होता या बाबत प्रशासनाने कुठलीही दखल ना घेतल्याने त्यांनी आज सकाळपासून उपोषणाला सुरुवात केली आहे. प्रशासनाला दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले होते की दि.४ जानेवारी रोजी राक्षसभुवन रोडवरील गंगावाडी येथील रुस्तुम मते यांना वाळू वाहतूक करणार्या भरधाव वेगात हायवाने चिरडल्याने यात त्यांचा जागीच मृत्यू झाला असून या दुर्दैवी घटनेने गोदा पट्ट्यातील ग्रामस्थांमध्ये संताप निर्माण झाला आहे. ज्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. प्रशासनाने या प्रकरणात गाडी जप्त करून संबंधित वाहन चालकावर गुन्हा दाखल केला असून विशेष म्हणजे सदरील वाहनाचा मालक पोलीस कर्मचारी असल्याचे निदर्शनास आले आहे. या आधीही वाळूने भरलेल्या वाहनांमुळे अनेकांचे जीव गेले आहेत तरी प्रशासन कोणतीही कठोर पावले उचलल्याचे निदर्शनात आले नाही. त्यामुळे गोदा पट्ट्यातील होणारा अवैध वाळू उपसा कायमचा बंद करण्यात यावा,वाळू तस्करी करणार्या वर कठोर निर्बंध घालावेत, वाळू लिलावाचे टेंडर तातडीने करून किचकट टेंडर प्रक्रिया सुलभ करून त्याचे दर कमी करण्यात यावेत,असे केल्याने अवैध वाळू तस्करी व चोरीवर नियंत्रण ठेऊन वाहने रात्री-अपरात्री भरधाव वेगाने धावणार नाहीत इतक्या वर्षात गोदाकाठच्या वाळूचे लिलाव झालेले नाही त्यामुळे सहा वर्षात शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला आहे. वाळू लिलावाचे अपसेट प्राईस जास्तीचे असल्यामुळे लिलाव टेंडर घेण्यास संबंधित गुत्तेदार धजावत नाहीत त्यामुळे ही अपसेट प्राइस कमी करावी, जिल्हाधिकारी स्तरावर महसूल व पोलीस कर्मचारी व अधिकार्यांच्या स्पेशल टास्क फोर्स निर्माण करावा व त्यामध्ये माजी सैनिकांना सामावून घ्यावे, टास्क फोर्सने संयुक्त कारवाई करून वाळू तस्करी व साठा करणार्या वर धाडी टाकाव्यात, वाळू तस्करांना रात्री-अपरात्री मोबाईल द्वारे अपडेट माहिती देणार्या महसूल व पोलिस प्रशासनातील कर्मचार्यांचे मोबाईल संभाषण तपासून दोषींवर कारवाई करावी, गंगावाडी प्रकरणात तलाठी निलंबित करण्यात आला आहे मात्र पोलीस अमलदार यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही तसेच गेवराई मतदार संघात असलेल्या गोदावरी सिंदफना नदी पट्ट्यातील वाळू वाहतूक व उत्कलन बाबत असलेले नियम अपसेट प्राईस संदर्भात तातडीने मंत्रालयात सचिव स्तरावर बैठक घेण्यात यावी यासह आदी मागण्या घेऊन आ.लक्ष्मण पवार यांनी गोदावरी व सिंदफना पट्यातील ग्रामस्थ व कार्यकर्त्यांसह आमरण उपोषण सुरू केले आहे.
यावेळी जि.प.सदस्य पांडुरंग थडगे, भाजपा तालुका अध्यक्ष प्रकाश काका सुरवसे, नगराध्यक्ष सुशील जवंजाळ, राजेंद्र राक्षसभुवनकर, भाजपा किसान आघाडीचे देविदास फलके,जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब गिरी, दीपक सुरवसे, उपसभापती संदीप लगड, प्रा.शाम कुंड, अरुण चाळक, ऍड.उद्धव रासकर,दूषण डोंगरे, हिरापूरचे सरपंच अमोल तिपाले,नगरसेवक अरुण मस्के,राहुल खंडागळे, अजित कानगुडे, भरत गायकवाड, जनमोहमद बागवान, माऊली पवार, भगवान घुंबार्डे, कृष्णा काकडे, छगन हादगुले, संजय इंगळे, राम पवार,किशोर धोंडलकर, राजाभाऊ मातकर, समाधान मस्के,मनोज हजारे, बाबा वाघमारे,संतोष भोसले, किशोर कोकरे, सुंदर काकडे, राजाभाऊ भंडारी, मधुकर वादे, सतीश दाभाडे, शेख अब्दुल भाई, मंजूर बागवान, शोएब आतार, बाबाराजे खरात,लक्ष्मण चव्हाण, गणेश मुंडे, शिवनाथ परळकर, जिजा कौचट, सरपंच घाटूळ, रविराज आहेर, महेश ढेरे यांच्यासह सर्व नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती आहे.
गंगावाडी येथील कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे – आ.लक्ष्मण पवार
वाळूचे शासकीय दर कमी करून लिलाव झाला पाहिजे जेणेकरून अवैध वाळू वाहतूक बंद होऊन सुरळीत वाहतूक होईल यातून जास्तीची वाहतूक करता येणार नाही व अधिकाऱ्यांनाही यात भ्रष्टाचार करता येणार नाही. तसेच गंगावाडी घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई करून मते कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे व निवेदनात दिलेल्या सर्व मागण्या तात्काळ मार्गी लागल्या शिवाय आपण माघार घेणार नसल्याचे यावेळी आ.लक्ष्मण पवार यांनी रिपोर्टरशी बोलताना सांगितले.