Friday, May 20, 2022
No menu items!
Homeबीडकेजकेजच्या प्रशासकीय अधिकार्‍याने घेतले झोपेचे सोंग शुद्धीकरण केंद्र अद्यापही बंदच

केजच्या प्रशासकीय अधिकार्‍याने घेतले झोपेचे सोंग शुद्धीकरण केंद्र अद्यापही बंदच


केज (सय्यद माजेद): गेल्या वर्षभराच्या कालखंडात कोरोनासारख्या महामारीने सर्वत्र हाहाकार उडवून दिल्यानंतर चिकन गुनिया, मलेरिया यासारखे आजार प्रामुख्याने तोंड वर काढत राहिले असताना आणि लोकांचे आरोग्य धोक्यात असताना केजचे प्रशासकीय अधिकारी मात्र सर्वसामान्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असून केज, धारूर या दोन प्रमुख शहरांसह बारा गावांना धनेगावच्या तलावातून अशुद्ध पाणीपुरवठा केला जात असून अद्यापही जलशुद्धीकरण केंद्र बंद असल्याने हे अधिकारी नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहेत.
गेली तीन-चार वर्षे मराठवाड्यात दुष्काळ पडलेला होता. यामुळे धनेगावचे धरण कोरडे पडले होते. यावर्षी चांगला पाऊस झाल्याने हे धरण पुर्णत: भरले. या धरणातून केज, धारूर आणि बारा गावांना पाण्याचा पुरवठा केला जातो.
सोनीजवळा या ठिकाणी शुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले असले तरी गेल्या अनेक दिवसांपासून शुद्धीकरणासाठी ब्लिचींग पावडर उपलब्ध नाही. ब्लिचिंग पावडरवर लाखो रुपये खर्च केले जातात, तसे बिल दाखवले जाते, मग हे लाखो रुपये नेमके कुठे जातात. असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. पाण्याचे शुद्धीकरण न करता गढुळ पाण्याचा पुरवठा जिल्हा प्रशासन व नगर प्रशासन नागरिकांना करत असल्याने नागरिकांना विविध आजारांची लागण होऊ लागली आहे. वेळोवेळी मागणी करूनही जि.प.चा पाणीपुरवठा, केज आणि धारूर नगरपंचायत याबाबत ठोस भूमिका घेत नसल्याने नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे.

उद्या जाऊन पाहणी करतो -प्रभारी मुख्याधिकारी हजारे
केजच्या जलशुद्धीकरण केंद्राबाबत प्रभारी मुख्याधिकारी हजारे यांना विचारले असता याबाबतची माहिती घेण्यासाठी मी उद्या जलशुद्धीकरण केंद्राच्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणची पाहणी करतो आणि हे शुद्धीकरण केंद्र कुठल्या कारणावरून बंद आहे याबाबतची माहिती घेतो, असे रिपोर्टरशी बोलताना हजारे म्हणाले.

Most Popular

error: Content is protected !!