Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeकोरोनाअखेर पंतप्रधानांसह मुख्यमंत्री, आमदार, खासदार घेणार लस

अखेर पंतप्रधानांसह मुख्यमंत्री, आमदार, खासदार घेणार लस


नवी दिल्ली (वृत्तसेवा):- देशामध्ये करोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. सरकारने पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्य कर्मचार्‍यांबरोबरच पहिल्या फळीतील करोना योद्ध्यांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला असून त्याच्या अंमलबजावणीला १६ जानेवारीपासून सुरुवात करण्यात आलीय. मात्र आता दुसर्‍या टप्प्यामध्ये राजकीय नेत्यांना करोनाची लस देण्यात येणार आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, सर्व खासदार, आमदार यांच्याबरोबरच इतर आजार असणार्‍या राजकीय नेत्यांचे लसीकरण केलं जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे अनेक दिग्गज नेते हे ८० वर्षांहून अधिक वयाचे आहेत. ८० हून अधिक वय असणार्‍या नेत्यांमध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, एचडी देवगौडा यांच्याबरोबरच भाजपाचे नेते लालकृष्ण अडवाणी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचाही समावेश आहे.


सरकारने करोना लसीकरणाची मोहीम टप्प्याटप्प्यांमध्ये राबवली जाणार असल्याचं आधीच स्पष्ट केलं आहे. करोना लसीकरणाचा दुसरा टप्पा एप्रिल महिन्यामध्ये सुरु होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये ५० वर्षांपेक्षा अधिक वय असणार्‍या मंत्र्यांबरोबर नेत्यांना करोनाची लस देण्यात येणार आहे. यात अगदी पंतप्रधानांपासून सर्व मुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे. सध्याची आकडेवारी पाहिली तर लोकसभेमधील तीनशेहून अधिक नेते ५० पेक्षा जास्त वर्षांचे आहेत. तर राज्यसभेमधील २०० हून अधिक खासदार हे वयाची पन्नाशी ओलांडलेले आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये भारत सरकार तीन कोटी वैद्यकीय कर्मचारी आणि पहिल्या फळीतील करोना योद्ध्यांना करोनाची लस देणार असून दुसरा टप्पा मार्चच्या शेवटी किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरु होईल, असं हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!