Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeमहाराष्ट्रशेतकर्‍यांच्या संघर्षाला महाराष्ट्रातून ताकद देणार- शरद पवार

शेतकर्‍यांच्या संघर्षाला महाराष्ट्रातून ताकद देणार- शरद पवार

कोल्हापूर (रिपोर्टर):- दिल्लीत केंद्रीय कृषी विधेयकांविरोधात शेतकर्‍यांचे जे आंदोलन सुरू आहे, त्याला ताकद देण्यासाठी राज्यातील सर्व समविचारी पक्ष आणि नेत्यांना एकत्रित करण्यात येणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेऊन आंदोलनास पाठिंबा देण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी कोल्हापुरात पत्रकार बैठकीत दिली.
स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी पवार कोल्हापुरात आले होते. तेव्हा पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, प्रमुख मागण्या मान्य होत नसल्याने दिल्लीत शेतकर्‍यांचे आंदोलन सुरूच आहे. याबाबत केंद्राने समिती नेमली असली तरी ज्यांचा केंद्राच्या निर्णयाला पाठिंबा आहे, असे नेते या समितीत आहेत. त्यामुळे विधेयकाला पाठिंबा असलेल्या नेत्यांबरोबर कसली चर्चा करायची म्हणत शेतकर्‍यांनी चर्चा टाळली आहे. आता शेतकर्‍यांना ताकद देण्यासाठी देशभरातील लोकांना एकत्रित करण्याची मोहीम सुरू आहे. राज्यातही याबाबत सोमवारी बैठक घेण्यात येणार आहे. ज्यांचा शेतकर्‍यांच्या आंदोलनास पाठिंबा आहे, त्या सर्व घटकांना एकत्रित करण्यात येणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीनंतर दिल्लीत जाऊन शेतकर्‍यांसोबत असल्याचे जाहीर करण्यात येईल असेही पवारांनी स्पष्ट केले. मराठा आरक्षण मिळावे ही राज्य सरकारची भूमिका आहे, त्याच दिशेने सरकारची पावले पडत असल्याचे सांगून पवार म्हणाले, खोटे आरोप करून राज्य सरकार अस्थिर करण्याचे षडयंत्र चालले आहेत. मात्र, हे सरकार भक्कम आहे. ते पाच वर्षे नक्की टिकेल. खोट्या आरोपांचा सरकारवर काहीही परिणाम होणार नाही.

Most Popular

error: Content is protected !!