Saturday, March 6, 2021
No menu items!
Home बीड नगर पालिकेच्या सभापतींना अधिकार किती? शहरातील समस्या कायम, विकासाचा नुसताच बोलबाला

नगर पालिकेच्या सभापतींना अधिकार किती? शहरातील समस्या कायम, विकासाचा नुसताच बोलबाला

मजीद शेख- बीड
नगर पालिकेच्या सभापतींची दरवर्षी निवड होते. आपली निवड व्हावी म्हणुन इच्छुकांची गर्दी नगराध्यक्ष किंवा नगर पालिका ज्यांच्या ताब्यात आहे त्यांच्याकडे असते. विचार केला तर नगर पालिकेच्या सभापतींना अधिकार किती असतात? एखाद्या सभापतींनी चांगली कामगिरी करुन दाखवली असं अलीकडच्या काळात दिसून आलं नाही. फक्त कॅबीन आणि कॅबीनसमोर सभापती पदाच्या नावाची पाटी एवढया पुरतचं सभापतीचं काम आहे का? स्वच्छता,पाणी पुरवठा, बांधकाम इत्यादी विभागाचे सभापती शहराच्या ठिकाणी असतात. मात्र सभापतींनी कधी नागरी समस्याकडे गांभीर्याने पाहितले असं होत नाही. त्यामुळे न.प.चे सभापती हे फक्त नामधारी ठरत आहेत. नामधारी पदाधिकारी काय कामाचे, त्यापेक्षा ते पद नसलेलं बरं. उगीच सभापती म्हणुन मिरवणं हे कितपत योग्य आहे?
नगर पालिकेच्या माध्यमातून शहराचा विकास होत असतो. ज्यांच्या ताब्यात नगर पालिका आहे, त्यांनी इमानदारीने शहराचा विकास करायला हवा. मात्र शहराच्या विकासा बाबत कुणी गांभीर्याने घेत नाही. तेच ते प्रश्‍न प्रत्येक निवडणुकीत उपस्थित होत असतात. नाल्या, रस्ते शहराच्या ठिकाणी व्यवस्थीत नसतात. लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. काही नगर पालिका प्रस्थापीत पुढार्‍यांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे ते विकासाच्या बाबतीत गंभीर नसतात. निवडणुकीत पैसा खर्च करायचा आणि निवडून आलं की, पैशाची वसूली करायची असं राजकीय समीकरणचं झालं आहे. नगर पालिकेत वर्षाला सभापती निवडतात. सभापती यांचा कार्यकाळ फक्त एका वर्षाचा आहे. एका वर्षात चांगल्या पध्दतीचं काम करता येते का? उपाध्यक्ष व सभापतींना तितके अधिकार नसतात. ते फक्त नामधारी असतात. सभापती म्हणजे खुप मोठं पद आहे असं नाही. स्वच्छता सभापतींनी कधी सकाळी उठून शहराची स्वच्छता पाहितली किंवा पाणी पुरवठा सभापतींनी कधी पाण्याच्या समस्यांकडे गांभीर्याने पाहितले असं अलीकडच्या काळात कधी घडलं नाही. एखाद्या सभापतींनी चांगलं काम केले त्याची चर्चा शहरात होत नाही, सभापतीमुळे नागरीकांना लाभ झाला असं ही झालं नाही, त्यामुळे सभापती पद हे फक्त लग्न समारंभ किंवा इतर कार्यक्रमात मिरवण्या इतपत कमी येणारं आहे. नगर पालिकेत एखादी कॅबीन आणि कॅबीनसमोर नावाची पाटी असली की, त्यातच सभापती खुष असतात. काही सभापतींना शहराची लोकसंख्या किती हे सांगता येणार नाही,किंवा कुठला वार्ड कोणत्या भागात येतो याचा अभ्यास नसतो. इतके अज्ञानी सभापती व नगरसेवक असतात. अशा अज्ञानी सभापतीकडे विकास कामाची अपेक्षा तरी काय करणार?


बीडचा विकास काय झाला
बीड नगर पालिका गेल्या अनेक वर्षापासून क्षीरसागर यांच्या ताब्यात आहे. विकास कामाचा नुसताच बोलबाला केला जातो. प्रत्यक्षात किती विकास झाला हे शहराच्या अवस्थेतून दिसून येत आहे. अनेक भागात साधे कच्चे रस्ते नाहीत. नाल्या तुंबून रस्त्यावरुन वाहतात. पाण्याच्या पुरवठ्या बाबत नियोजन नसतं. शहरात ढीगभर समस्या असतांना. समस्या असतांना त्या-त्या खात्याचे सभापती नेमकं काय करत असतात? सभापतींना ह्या समस्या दिसत नाही का? मग हे सभापती फक्त नावालाच आहेत हे सिध्द होतं. सभापतीचं अध्यक्षापुढे चालत नाही का? यासह अन्य प्रश्‍न शहराच्या बाबतीत उपस्थित होत आहे.
वार्डात जावून समस्या जाणुन घेतल्या जात नाहीत
आपण नगरसेवक आहेत आणि आपलं काही कर्तव्य आहे याचा विसर निवडुन आल्यानंतर नगरसेवकांना होत आहे. ज्या वार्डातून आपण निवडून आलो आहेत. त्या वार्डाची नगर सेवकांनी रोज पाहणी केली पाहिजे. कुठल्या गल्लीत कचरा जमा झालेला आहे. नाली कुठं तुंबली, तेथील लोकांच्या काही समस्या आहेत का? अशा पध्दतीचं काम नगर सेवक करतांना दिसत नाही. काही बोटावर मोजण्या इतके नगर सेवक चांगलेही असतील पण इतरांचं काय?


महिला नगरसेवक नावाला
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महिलांना पन्नास टक्के आरक्षण आहे. महिला नगर सेवक झाल्यानंतर त्यांचा कारभार प्रत्यक्षात त्यांचे पती किंवा इतर नातेवाईक पाहत असतात. वार्डातील समस्यांची जाण महिलांना नसते. त्यांना तशी जाणीव करुन दिली जात नाही. सभागृहात महिला प्रश्‍न उपस्थित करत नाहीत. अभ्यास करुन कामकाम करणार्‍या किती महिला आहेत हा आज संशोधनाचा विषय आहे. काही बहाद्दर पती स्वत:च्या नावापुढेच नगरसेवक किंवा सभापती म्हणुन नाव लावून मिरवत असतात. अशांच्या बुध्दीची कीव करावी तितकी कमीच आहे.

Most Popular

गढी येथील नवोदय विद्यालयातील १२ विद्यार्थी कोरोना बाधित ; जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांची भेट

नवोदय विद्यालयातील सर्व विद्यार्थी अध्यापक आणि कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करावी - जिल्हाधिकारी गेवराई (भागवत जाधव)

सुनेच्या त्रासाला कंटाळून सासर्‍याची आत्महत्या; सुने विरुद्ध गुन्हा दाखल

बीड (रिपोर्टर)- सुनेच्या त्रासाला कंटाळून सासर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २४ फेब्रुवारी रोजी घडली असून या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात...

जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढला ९५ रुग्ण पॉझिटिव्ह

सर्वाधिक बीडचे ३८बीड (रिपोर्टर)- बीड जिल्ह्यामध्ये कोविडच्या रुग्णांची संख्या मध्यंतरी कमी झाली होती. मात्र आता पुन्हा कोविडने डोके वर काढले. काल ५७...

मांजरसुंबा घाटात ट्रक उलटला लोकांनी नारळ लुटले

बीड (रिपोर्टर)- मांजरसुंबा घाटात दिवसाआड अपघाताची मालिका सुरु असून आज सकाळी नारळ घेऊन बीडकडे येणारा एक टेम्पो पलटल्याने त्याला पाठिमागून दुसरे दोन...