Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeसंपादकीयअग्रलेख- महागाईत तेल

अग्रलेख- महागाईत तेल

गणेश सावंत
९४२२७४२८१०
लोकांनी लोकांसाठी लोकाकरीता चालवलेल्या राज्यात सर्वसामान्य लोकांसाठी सरकार काही करतय की नाही? हा सवालच नाही तर उत्तर घेण्याची वेळ आज येवून ठेपलीये. २०१४ सालापासून अच्छे दिन येणार या भाबड्या आशेवर आपला रहाटगाड चालवणार्‍या सर्वसामान्यांच्या बोकांडीवर महागाई थयाथया नाचत असल्याने सर्वसामान्यांचं कंबरड केंव्हाच मोडून गेलय तरीही अच्छे दिनची गुहार देणार्‍या केंद्रातील मोदी सरकारला सर्वसामान्य माणसांच्या व्यथा उमजून येत नाहीत. सर्वसामान्य रोज महागाईच्या खाईत लोटल्या जातोय. काबाडकष्ट करून मिळालेल्या रोजगारावर उपजिविका भागवतांना त्याच्या नाकेनऊ येतय. कधी भाकरीसाठी पीठ नसतं तर कधी भाजीसाठी तेलाची वाणव भासते. तरी देश प्रगतीपथावर जात असल्याचा दावा केंद्र सरकारकडून केला जातोय. ज्या सर्वसामान्य माणसांना मुलभूत गरजा हव्या आहेत त्या मुलभूत गरजांकडे मात्र स्पेशल दुर्लक्ष केलं जातयं. लोकांची उपासमार होतेय की लोक मरतायत याच सरकारला कुठलंही देणं-घेणं दिसून येत नाही. जात, पात, धर्म, पंताच्या विषयात रस घेत ते विषय भावनिकतेचे बनवायचे आणि देशभरातील सर्वसामान्य माणसात पेरायचे अन् मुख्य विषयांकडून लक्ष विचलीत करायचं हेच धोरण सध्या केंद्रातल्या भाजप सरकारचं दिसून येतं. महागाईचा भस्मासूर अक्षरश: सर्वसामान्य माणसांना मरणयातना देत असतांना भाजप सरकारचं नव्हे तर नमो भक्तही जेंव्हा नमो-नमोचा नारा देवून दाताचं पाणी गिळत पोट भरण्यात समाधान व्यक्त करत असतील अन् मुख्य प्रश्‍नांविरोधात
तांडव
करत नसतील तर लोकशाहीच्या या देशात या पेक्षा ते दुर्दैव काहीच नसेल. २०१४ पासून आजपावेत पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ ही २-४ रूपयाची नाही तर २५-३० रूपयाची आहे. अन् २०१४ सालापासूनच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अच्छे दिनची गुहार लावली होती. देशवासियांना प्रत्येकाच्या खात्यात पैसे येतील अशी आशा दिली होती. मात्र ना खात्यात पैसे आले ना अच्छे दिन आले. उलट जे दिवस होते ते दिवस न राहता महागाईच्या काळ्याकुट्ट रात्री होतांना दिसून येत आहे. येथे धर्माचं आणि मंदिर मस्जिदचं राजकारण करतांना जेवढ्या संवेदना केंद्र सरकार दाखवत आहे तेवढ्या संवेदना सर्वसामान्यातील सर्व सामान्य माणसाच्या प्रश्‍नासाठी दाखवल्या असत्या तर नक्कीच आज देशवासियांना अशा महागाईच्या खाईत लोटलं गेलं नसतं. परंतू सर्वसामान्यांच्या आशा, अपेक्षा आणि आकांक्षापेक्षा उच्च वर्णीय, मातब्बर, उद्योगपती, धनदांडगे, शेटजी-भटजी यांचं पोट कसं भरलं जाईल? त्यांना जास्तीत जास्त भौतिक सुख कसं दिलं जाईल? आदानी अंबानी जगतजेते श्रीमंत कसे होतील? आणि या सर्वांच्या बिदाग्यातून आपल्या पक्षाचा खर्च कसा काढता येईल एवढच धोरण या सहा ते सात वर्षाच्या कालखंडामध्ये भाजप सरकारने आखलं. देवदेवतांची विटंबना झाली की तांडव केला जातो. मंदिर, मस्जिदच्या नावावर तांडव केला जातो परंतू जिते जागते देव असणार्‍या कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, दीनदुबळ्यांच्या घरावर ही महागाई अक्षरश: तुळशीपत्र ठेवत आहे. तिथं मात्र तांडव करणार्‍यांचे हातपाय लुळे पडतात. तेथे ते पंगु होतात, नवे-नवे ते षंडच असतात अशी संतप्त प्रतिक्रिया जर जनमाणसातून व्यक्त होत असेल तर ती नक्कीच चुकीची नाही. आज मित्तिला ज्या पद्धतीने पेट्रोल आणि डिझेलचे दरवाढतच आहेत, पेट्रोल शंभरी गाठत आहे तसे गोरगरीबाच्या घरात महागाईचा टेंबा जळत आहे आणि तो टेंबा कधी त्या गरीबाची झोपडी जाळेल हे सांगणे कठीण होवून बसले आहे. २०२० चे साल हे कोरोनाचे अत्यंत वेदनादायी आणि विदारक साल होवून गेले. या सालामध्ये ना काही करता आलं ना काही जमवता आलं. उलट काहींच्या घरातले कर्तेधर्ते कोरोना बळी गेले, ते सरणावर निपचीत पडले. एकीकडे
कोरोनाची मार
अन् महगाईची धार
सर्वसामान्यांना जिथं तिथं वेदना देत होती. लोकांच्या अंगाअंगावर जखमा करत आहे तिथं केंद्र सरकार आणि अच्छे दिनचा नारा देणारे भाजपवाले या जखमांना मलम लावण्यापेक्षा त्या जखमांवर मीठ शिंपडण्याचे काम जेंव्हा करू लागले. तेंव्हा सर्वसामान्य मीठ रूपी महागाईने तडफडू लागले आहेत. गेल्या महिनाभराच्या कालखंडामध्ये सुमारे २० वेळेस पेट्रोल आणि डिझेलचे भाव पैशापैशाने वाढत गेले. आज मित्तीला पेट्रोल ९२ रूपयाच्या पुढे तर डिझेल ८३ रूपयांपर्यत प्रति लीटर गेले आहे. आज जरी जागतिक पातळीवर कच्चा तेलाचे भाव वाढले जात आहेत म्हणून ही दरवाढ रोखता येत नाही असे सरकारकडून गुळगुळीत आणि चमचमीत उत्तर दिले जात असले तरी मागील सात महिन्यापूर्वी कच्चा तेलाचे भाव प्रचंड प्रमाणात गडगडलेले होते. चहाच्या कटींग एवढ्या पैशामध्ये कच्चा तेलाचा ड्रम येत होता तेंव्हाही पेट्रोल-डिझेलचे भाव केंद्रातल्या मोदी सरकारने कमी केले नव्हते. त्यावेळी किमान तीन महिन्याच्या कालखंडात शंभर टक्के नफा केंद्र सरकारने स्वत:च्या खिशामध्ये घातला. त्यानंतर दरवाढ मोठ्या प्रमाणावर झाली मात्र आता सर्वसामान्यांच्या कपड्यांना खिसाच राहणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतरही केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलचे भाव रोखण्यात अपयशी ठरत आहे अथवा त्यांना हे भाव रोखायचे नाहीत. कोरोनाच्या मारा पाठोपाठ महागाईच्या धारदार तलवारीने लोकांचे अंगअंग छिलले जखमा झाल्या तरी मोदी सरकारला याचे काहीच देणे नाही या भूमिकेत सध्या सरकार वागत आहे. हीच परिस्थिती कायम राहिली तर उद्या
महागाईचा भडका
उडाल्याशिवाय राहणार नाही आणि या भडक्यात कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, दीनदुबळ्यासह मध्यम वर्गीय होरपळून निघल्याशिवाय राहणार नाही. पेट्रोल आणि डिझेल शंभरी गाठत असल्याने त्याचे सर्व पडसाद हे सर्वच बाजारपेठांवर पडत आहेत. भाजीपाल्यापासून किराणा सामानापर्यंत बि-बियाणे खतांपासून औषधोपचारापर्यंत इतरपर्यंतच नव्हे तर जिवानावश्यक वस्तूपर्यंत हे पडसाद उमटतांना दिसून येत असल्याने आज ९० रूपये किलोचे खाद्य तेल १३० व जे जाऊन पोहचले आहे त्यापेक्षा कित्येक पटेने जीवनावश्यक वस्तू पुढील काळात महाग होणार हे आता निश्‍चित आहे. एकीकडे कोरोनाने उद्वस्त झालेले कुटुंब आणि दुसरीकडे हा महागाईचा भडका त्यातही पेट्रोल-डिझेलची दरवाढ म्हणजे महागाईत तेल ओतण्यासारखा प्रकार आहे आणि हा प्रकार रोखण्यात अपयशी ठरलेले केंद्रातले भाजप सरकार या पापाचे जन्मदाते बाप म्हणावे लागतील. अर्थकारण, समाजकारण आणि राजकारण करतांना गेल्या सात वर्षाच्या कालखंडात मोदी सरकारने केवळ धनदांडगे उद्योगपती डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतले. जात, पात, धर्म, पंतासाठी राजकारण करत सत्तेचे शस्त्र वापरले मात्र इथं देवळातून पोट भरत नाही इथं काबाड कष्ट आणि कर्मातून पोट भरावं लागतं हे बहुदा अच्छे दिनचा नारा देणार्‍या भाजपीयींना माहित नसावं. असो परंतू आज सर्वसामान्य माणसांचं घर महागाईने जळत आहे त्याची दाह भक्तांच्या घरापर्यंत जायला वेळ लागणार नाही आणि त्याची हाय आणि हाळ सरकारला नक्कीच लागेल.

Most Popular

error: Content is protected !!