-गणेश सावंत
मो. नं. ९४२२७४२८१०
प्रजासत्ताक दिनी देशाच्या राजधानीत जे झाले ते संतापजनकच. तळपायाची आग मस्तकाला जावी अन् लाल किल्ल्यावर चढाई करणार्यांची ढोपरं सोलून काढावीत एवढा तो संतापजनक प्रकार. लाल किल्ला हा भारताचा स्वाभिमान आहे. भारताची निधडी छाती आहे. आज त्याच लाल किल्ल्यात घुसखोरी छे..छे.. त्याच लाल किल्ल्याच्या छाताडावर थयाथया नाचण्याचा प्रकार होतोय हा संतापजनकच. परंतू लाल किल्ल्यात घुसखोरी करणारे ते कोण? याचा विचार व्हायला पाहिजे आणि त्याचा शोधही घ्यायला पाहिजे. गेली दोन महिने कडाक्याच्या थंडीत न्याय हक्काच्या मागणीसाठी लाखो शेतकरी शांततेच्या मार्गाने आंदोलन करतात.

प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅली काढण्याची घोषणा करतात, इकडे प्रजासत्ताक दिनाची परेड सुरू असते आणि तिकडे ट्रॅक्टरची परेड सुरू होते. पोलीसांनी उभारलेले सर्व सुरक्षा कठडे तोडून आंदोलक दिल्लीच्या हद्दीत घुसतात. थेट लाल किल्ल्यापर्यंत पोहचतात. राजाधानीत गोंधळ हल्ला कल्लोळ माजतो, कायदा व सुरक्षा व्यवस्थेचे लक्तरे अक्षरश: राजधानीच्या वेशीवर टांगले जातात. दिल्लीच्या रस्त्या रस्त्यावर धुमशान उडल्याचे पहायला मिळते. लाल किल्ल्यापर्यंत मजल गेल्यानंतरही आमची सुरक्षा व्यवस्था मुग गिळून गप्प असते, हाताची घडी तोंडावर बोट ठेवलेल्या पोलीस यंत्रणेवर हल्लेही चढवले जातात, अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न होतो, शंभर पेक्षा अधिक पोलीस जखमी होतात आणि त्यानंतर सुरू होते ते शेतकर्यांच्या आंदोलनाला बदनाम करण्याहेतू षडयंत्र. बदनामीच्या शेतकरी आंदोलकांवर रोखल्या जातात. शेतकर्यांवर हिंस्र, अतिरेकी यासह अन्य विश्लेषणाचे गोळे फेकले जातात. हे सर्व एवढ्यासाठीच होते, गेली दोन महिने जे शेतकरी शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होते ते सरकारच्या छक्के-पंजापुढे झुकले नाही, वाकले नाही, नरमले नाही, माघार घेतली नाही म्हणून हा जो सर्व खटाटोप होत असतांना भारताच्या अब्रुचे धिंधवडे निघतात याचे ना केंद्र सरकारला देणे-घेणे आहे ना लाल किल्ल्यात घुसखोरी करणार्या त्या तथाकथीत आंदोलकांना याचे देणे-घेणे आहे. जगाच्या पाठीवर इतिहासाबरोबर भूगोल असणार्या अखंड हिंदुस्तानची आण,बाण,शान म्हणून ज्या लाल किल्ल्याकडे पाहिल जाते तो लाल किल्ला प्रजासत्ताक दिनी छाती बडवत बसला असेल. हाय रे माझे कर्म, इंग्रजांचं राज्य असतांना माझ्याच माणसांना माझ्याचं छत्र छायेखाली डांबण्यात आलं. प्रारतंत्र्य असतांनाही माझ्या माणसांना माझ्याच छायेखाली शिक्षा ठोठावण्यात आल्या अन् आज स्वतंत्र्याच्या ७२ रीत माझ्याच माणसांनी माझ्या विरोधात कुच केली. जणू माझ्यावर आक्रमण केलं. तेंव्हाची आझाद हिंद सेना ही माझ्यासाठी अभिमानाची, स्वाभिमानाची होती. आजची ही जी पिलावळे आहेत ती माकड सेना नसेल काय? असे एक ना अनेक विचार लाल किल्ल्याच्या तणामणात येत असतील, तुम मुझे खून दो मैं तुम्हे आझादी दुँगा म्हणणार्या सुभाषचंद्र बोसांची आठवण येत असेल.

लाल किल्लेसे आयीं आवाज
सहगल, ढिल्लो, शहनवाज-शहनवाज
याची पुन्हा आठवण झाली असेल. अखंड हिंदुस्तान जेंव्हा पारतंत्र्यात होतं, पारतंत्र्याच्या साखळ दंडाने अखंड भारत जखडून टाकण्यात आला होता. पांढरतोंड्या इंग्रजांच्या तोडा आणि फोडा या राजकारणामुळे जात, पात, धर्म, पंतात विक्षिप्त निर्माण झाले होते अशा स्थितीत थोर सेनानी सुभाषचंद्र बोसांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. इ.स.१९४३ च्या जुलै मधील ५ तारखेला सुभाषचंद्र बोसांनी आपल्या फौजेला संबोधित केले तेंव्हा ते म्हणाले ‘हथियारों की ताकत और खून की कीमत से तुम्हें आजादी प्राप्त करनी है| फिर जब भारत आजाद होगा तो आजाद देश के लिए तुम्हें स्थायी सेना बनानी होगी, जिसका काम होगा हमारी आजादी को हमेशा-हमेशा बनाए रखना..
मैं वादा करता हूं कि अंधेरे और उजाले में, दुख और सुख में, व्यथा और विजय में तुम्हारे साथ रहूंगा मैं भूख, प्यास, प्रयाण पंथ और मृत्यु के सिवा कुछ नहीं दे सकता| पर अगर तुम जीवन और मृत्यु-पथ पर मेरा अनुसरण करोगे तो मैं तुम्हें विजय और स्वाधीनता तक ले जाऊंगा
मेरे वीरो! तुम्हारा युद्धघोष होना चाहिए-दिल्ली चलो! दिल्ली चलो! आजादी की इस लड़ाई में हममें से कितने बचेंगे, मैं नहीं जानता, पर मैं यह जानता हूं कि अंत में हम जीतेंगे और जब तक हमारे बचे हुए योद्धा एक और कब्रगाह-ब्रिटिश साम्राज्यवाद की कब्रगाह- दिल्ली के लालकिले पर फतह का परचम लहरा नहीं लेते, हमारा मकसद पूरा नहीं होगा|’ (पुस्तक नेताजी सुभाष चन्द्र बोस, लेखक-शिशिर कुमार बोस) हे सुभाषचंद्र बोसांनी म्हटलं होतं. आज त्याच लाल किल्ल्यावर निशाण ए साहेब ची पताका फडकवली अन् काहींच्या मते म्हणण्यापेक्षा थेट भाजपाच्या आणि नमो भक्तांच्या मते हा हिंदुस्तानचा अपमान झाला. होय लाल किल्ल्यावर जे झाले ते व्हायला नको होते पण ते कोणी केले? यावर आपण नक्की येवूच परंतू लाल किल्ला आझाद हिंद सेनेच्या त्या वीरांच्या आठवणीने गदगदुन गेला असेल. याच लाल किल्ल्यात आझाद हिंद सेनेचे कर्नल गुरूबक्षसिंह ढिल्लो, कर्नल प्रेम सहगल आणि मेजर जनरल शहनवाज खान यांच्यावर खटला चालू होता. इंग्रजांची तो खटला भरला होता, लाल किल्ल्यात या तिघांना एक प्रकारे डांबुन ठेवले होते. ही वार्ता देशभरात पसरली, जिथं तिथं आझाद हिंद सेनेच्या बाजून लोक उभे राहत गेले. ज्यांना शक्य होतं ते दिल्लीत पोहचले, लाल किल्ल्याच्या समोर जमा होवू लागले. या तीन वीरांसाठी कोणी जात पाहिली नाही ना पात पाहिली नाही, इथं अमीर नव्हता, गरीब नव्हता, मजदूर शेतकरी शहर असो या गाव अबालवृद्ध एकत्रित येत होते आणि लाल किल्ल्याच्या बाहेर आवाज देत होते. लाल किल्ले से आयी आवाज सहगल, ढिल्लो, शहनवाज-शहनवाज या पाठोपाठ आणखी एक घोषणा दिली जात होती,
लाल किल्ले को तोड दो,
आझाद हिंद फौज को छोड दो! ही घोषणा तेंव्हा लाल किल्ल्यासाठी अभिमानाची, स्वाभिमानाची वाटत असेल परंतू काल घुसखारी करणार्या तथाकथीत आंदोलकांची ती हिंसा पाहता किल्ल्यावरची ती चढाई पाहता लाल किल्ला तोड दो, किसान आंदोलन छोड दो एवढ्यासाठी तर नव्हती? अशी शंकाही दस्तुरखुद्द लाल किल्ल्याला येत असेल. शतकानु शतके राजकारणाचे खलबत्ते पोटात घेणार्या लाल किल्ल्याला प्रजासत्ताक दिनाच्या ७२ रीत घडलेल्या घटने एवढी आपमानास्पद बाब नक्कीच पारतंत्र्यात वाटली नसेल. तो ओरडून म्हणत असेल जळो तुमचं राजकारण, जळो तुमचे सत्ताकारण. सत्तेसाठी सत्त्याचा गळा घोटणारे राज्यकर्ते जेंव्हा भारताच्या स्वाभिमानाला नख लावतात तेंव्हा निधड्या छातीही दुबळ्या होतात. तेच दिल्लीत सुरू असलेल्या शेतकर्याच्या आंदोलनाबाबत घडतय. केंद्र सरकारने शेतकर्यांबाबत जे तीन कायदे केले ते तीनही कायदे देशभरातील शेतकर्यांना देशोधडीला लावून टाकणारे आहेत. त्या विरोधात शेतकर्यांचं गेल्या दोन महिन्यापासून आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनाकडे गांभीर्याने पाहणं हे सरकारचे कर्तव्य असतांना त्याकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आलं. अन्
प्रजासत्ताक दिनी जे घडलं की घडवलं?
त्यातून देशाच्या अन्नदात्याला बदनाम केलं. दोन महिने जे शेतकरी शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होते ते शेतकरी प्रजासत्ताक दिनी आक्रमक कसे झाले? दोन महिन्याचा कालखंड हा थोडा नाही, घरादारावर तुळशीपत्र ठेवून भल्या थंडीत आंदोलन करणार्या शेतकर्यांची सहनशिलता कालच कशी संपली? दिल्लीत जेंव्हा आंदोलकांनी घुसखोरी केली तेंव्हा दिल्ली पोलीस काय करत होती? देशाच्या अस्मितेवर घुसखोरी होत होती तेंव्हा यंत्रणा काय करत होती? ट्रॅक्टर परेडमध्ये असे काही होईल हे गुप्तचर विभागाला माहित नसावे? लाल किल्ल्यात घुसेपर्यंत यंत्रणा काहीच करत नव्हती. पोलीस साधी एक गोळीही हवेत फायर करू शकत नव्हते? मग केंद्र सरकारला हे सगळं होवू द्यायचं होत का? दिल्ली पोलीस केंद्र सरकारच्या अधीन आहे. बाकी सर्वत्र सगळं काही ठिक होतं, काही ठरावीक ठिकाणीच हे आंदोलन चिघळलं कसं? असे एक ना अनेक प्रश्न जेंव्हा पडतात तेंव्हा आणखी एक प्रश्न पडतो, जर हे आंदोलकांनीच केलं असेल आणि घटना घडली असेल तर दिल्लीच्या अन्य भागात सर्व सामान्यांच्या घरादारात, दुकानात हिंसाचार व्हायला हवा? परंतू असं झालं नाही, एवढा मोठा हिंसाचार झाला, कुठलीही दुकान लुटली गेली नाही, कुठल्याही घरावर दगडफेक केली गेली नाही, सर्वसामान्य दिल्लीकरांना ट्रॉफिकच्या व्यतिरीक्त कुठलाही त्रास झाला नाही, कुठल्या महिलेची छेड काढली गेली नाही, दिल्लीकरांच्या वाहनावर दगडफेक नाही मग हे ठरावीक ठिकाणी आणि लाल किल्ल्यावर जे घडलं ते घडवलं कशावरून नसेल?
कारण दोन महिन्याच्या कालखंडात
शेतकरी वाकला नाही,झुकला नाही!
तेंव्हा सुरूवातीपासून शेतकर्याचं आंदोलन उधळण्यासाठी आणि शेतकर्यांना बदनाम करण्यासाठी कधी त्यांना खलिस्तानीवादी ठरवण्यात आलं, कधी नक्षलवादी तर अतिरेकी कधी ते शेतकरीच नाहीत म्हणून बेंबीच्या देठापासून भाजप नेत्यांनी बोंबाही मारल्या. सुरूवातीपासूनच हे आंदोलन कसं बदनाम होईल, देशपातळीवर शेतकर्याला कस नालायकामध्ये काढता येईल एवढ्यासाठीच भाजपाने प्रयत्न केला. हे उघड सत्य नाकारता येणारं नाही. जगाचा पोशिंदा म्हणून ज्या शेतकर्याकडे पाहिला जात, अन्नदाता म्हणून ज्या शेतकर्याला पुजलं जात त्या शेतकर्यांबाबत केंद्र सरकारची सुरूवातीपासून जी भूमिका उभा देश आणि जग पाहत आला आहे ते संतापजनक आहे. शेतकरी वाकत नाहीत, झुकत नाहीत, मागे हटत नाही असं पाहिल्यानंतर या आंदोलनाला बदनाम करण्या हेतू ज्या गोष्टी झाल्या आणि उघडकीस आल्या त्यातून सर्व काही स्पष्ट होतं.
लाल किल्ल्यावर कुच करणारा
दिप सिध्दू भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असल्याचे अनेक पुरावे आता समोर येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सनी देओल यांच्या सोबतचा दिप सिद्धूचा फोटो व्हायरल झाला आहे. शेतकरी नेतेही लाल किल्ल्यावर जे झाले ते दुर्भाग्य पुर्ण होते. परंतू ते कोणी केले? त्या मागे कोणाचा हात आहे? आंदोलनात घुसखोरी करून हे आंदोलन हिंसक बनवणारे कोण? असे एक ना अनेक प्रश्न विचारत ते थेट भाजपावर आरोप करत आहेत. दिप सिद्धूनेही शेतकर्यांच्या नेत्याला धमकावलं आहे. मी जर तोंड उघडलं तर दिल्लीतून पळून जायला जागा उरणार नाही म्हणजे काय? शेतकर्यांच्या खांद्यावर कोण बंदुका ठेवतय? त्यांच्या पाठीत खंजीर कोण खुपसतय? अन् अखंड हिंदुस्तानच्या शेतकर्याला कोण बदनाम करतय? हे सर्व या घटना क्रमावरून आता उघड होतय. शेतकरी विरोधी कायदे करायचे आणि त्या विरोधात आवाज उठवलाच तर त्या शेतकर्यांचा आवाजच नाही तर त्यांच्या नरडीवर पाय देण्यासाठी त्यांचे चारित्र वेशीला टांगण्यासाठी जो काही खटाटोप होतोय तो देशाच्या संस्कृतीला सार्वभौमतेला शोभणारा नाही. शेतकरी दोन महिन्यापासून आंदोलन करत असतांना त्यांच्या डुंकुनही न पाहणारे कालच्या हिंसाचारावर शेतकर्यांच्या पाठीवर शाब्दीक आसूड ओढतात आणि या देशाची गोदी मिडिया त्यांचीच री ओढते. देशाच्या पंतप्रधानाला चित्रपटात ठुमके मारणारी कंगना दिसते तिच दु:ख त्यांना कळतं. देशसेवा करणारा
बीडचा कुत्रा मोदींना दिसतो
परंतू दोन महिने थंडीत कुडकुडणारा शेतकरी मोदींना दिसत नाही. बीडच्या पोलीस दलामध्ये देशसेवा करणारा रॉकी नावाचा श्वान मरण पावतो आणि दुसर्याच क्षणी मन की बात मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी दु:ख व्यक्त करत श्रद्धांजली वाहतात. तेंव्हा मोदींच्या या तत्परतेचे आणि भावनेचे अवघा देश स्वागत करतो. आम्हीही स्वागत केलं परंतू गेल्या दोन महिन्याच्या कालखंडात दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणार्या ७० पेक्षा जास्त शेतकर्यांनी आंदोलन स्थळी जीव सोडला. यावर पंतप्रधान साधं ट्विटही करत नाहीत. विद्यमान संरक्षण मंत्री राजनाथसिंह जेंव्हा विरोधी बाकावर होते तेंव्हा दिल्लीत शेतकर्यांचं एक आंदोलन सुरू होतं, तिसर्या दिवशी राजनाथसिंह तेथे जातात आणि म्हणतात हे शेतकर्यांचं आंदोलन आहे जिथं शेतकर्यांचं आंदोलन असेल मग ते कुठल्याही पक्ष संघटनेचं असो, कुठल्याही जात, पात, धर्माचं असो तिथं आम्ही जाणार, त्यांचे प्रश्न ऐकणार आज तीन दिवस झालं तुम्ही या ठिकाणी बसले आहात पंतप्रधानांच्या गुप्तचर यंत्रणे बाबत याची माहिती पंतप्रधांनाना झाली असेल परंतू त्यांनी भ्र शब्द ही काढला नाही. असं राजनाथसिंहांनी देशात कॉंग्रेसचं सरकार होतं तेंव्हा म्हटलं होत, राजनाथ सिहांना त्यावेळेस तीन दिवस मोठे वाटत होते आज तर दोन महिने उलटून गेले तरीही पंतप्रधानांनी यावर भाष्य केलं नाही. हे दुर्दैवं नव्हे काय? शेतकर्यांचे प्रश्न समजून घेण्यापेक्षा त्यांना दडपून टाकण्याची भूमिका भाजप आणि भाजप सरकारने घेतली आहे आणि आंदोलन व आंदोलक यांची मुस्कटदाबी करून त्यांना बदनाम करण्याची जी सुपारी सातत्याने दिली जात आहे त्या सुपारीला आडकित्यात आणता येणार नाही परंतू सरकार केंव्हा आडकीत्यात येईल हे सांगणे कठीण आहे. लाल किल्ला हा देशाचा स्वाभिमान असल्याने त्यावर अवैधपणे कुच करणारे शोधले गेले पाहिजेत आणि कुच करू देणारे ही शोधलेच गेले पाहिजेत.