बीड (रिपोर्टर)- विज वितरण कंपनीकडून जास्त दाबाने विजेचा पुरवठा केला जात नसल्याने शेतकर्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. सध्या रब्बीचा हंगाम असल्याने शेतकर्यांना पाणी देण्यासाठी विजेचा पुरवठा सुरळीत केला जात नाही. नित्रूड येथील विजेच्या लपंडावाला कंटाळून येथील शेतकरी विज वितरण कंपनीच्या कार्यालयावर २ फेब्रुवारीला मोर्चा काढणार आहेत.
नित्रूड परिसरामध्ये विजेच्या प्रश्नाबाबत विज वितरण कंपनी दुर्लक्ष करत आहे. डी.पी. खराब झाल्यानंतर तो तात्काळ दिला जात नाही त्यातच रात्री आणि दिवसा विजेचा लपंडाव सुरुच असल्याने शेतकर्यांना आपल्या पिकांना पाणी देण्यासाठी संकटाला तोंड द्यावे लागते. विज वितरण कंपनीने उच्च दाबाने विजेचा पुरवठा करावा, नित्रूड फिडरवर आठ तास थ्री फेज लाईट सलग देण्यात यावी, नित्रूड गावातील पांदण डी.पी.वरील सिंगल फेज २५ चे दोन रोहित्र चांगल्या प्रतीचे तात्काळ बसवण्यात यावे, नित्रूड गावातील सर्व सिंगल फेज व शेतीतील थ्री फेज डीपींची इतर रिपेअरिंग तात्काळ करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी २ फेब्रुवारी रोजी किसान सभेच्या वतीने तेलगाव येथील उपअभियंता कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन बालासाहेब तेलगड, शेख साकीब, राधेश्याम भास्कर, सय्यद शकीब यासह आदींनी दिले आहे.