Saturday, November 27, 2021
No menu items!
Homeसंपादकीयअग्रलेख -‘मुकनायकाची गरज’

अग्रलेख -‘मुकनायकाची गरज’


काय करू आता, धरुनिया भीड
निषंक हे तोंड वाजविले
नव्हे जगी कोणी मुकियाचा जाण
सार्थक लाजून नवे हित
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा हा अभंग मुकनायकाच्या शिर्षकाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देऊन आपली थेट आणि स्पष्ट भूमिका मांडली. याच अंकाच्या पहिल्या लेखात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जर या हिंदुस्तान देशातील सृष्ट पदार्थाच्या व मानवजातीच्या चित्रपटाकडे प्रेक्षक या नात्याने पाहिले तर हा देश म्हणजे केवळ विषमतेचे माहेरघर आहे, असे निसंशय दिसेल. 101 वर्षांपुर्वीची परिस्थिती आणि आजची परिस्थिती लक्षात घेतल्यानंतर खरच या देशातून विषमता दूर झाली का? हा सवाल पुन्हा एकदा उपस्थित झाल्याशिवाय राहणार नाही. स्वातंत्र्याच्या बहात्तरीत जेव्हा या देशात विषमता पहायला मिळते तेव्हा पुन्हा एकदा मुक्यांचा नायक जन्माला यावा, असे प्रत्येकाला वाटते. परंतु इथे तुमची-आमची जी मानसिकता झालीय ती छत्रपती शिवाजी महाराज अथवा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जन्म घ्यावा, परंतु तो शेजारच्या घरात घ्यावा, या मानसिकतेमुळेच ही विषमता वाढतेय का? किंवा तुम्ही-आम्हीच सामाजिक विषमतेला खतपाणी घालतोय का? हा प्रश्‍न आता प्रत्येकाला पडायला हवा. 101 वर्षांपुर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मुकनायक या पाक्षिकाद्वारे समाजप्रबोधन करावं लागलं आणि हे समाजप्रबोधन करताना त्यांना जे प्रश्‍न पडले ते प्रश्‍न त्यांनी मुकनायकाच्या
  सिंह प्रतिबिंब
  14 ऑगस्ट 1920 रोजी लिहिलेल्या लेखातून मांडले. आज मुकनायक दिनी आम्ही त्याच सिंह प्रतिबिंब या लेखमालेतला परिच्छेद या ठिकाणी देत आहोत. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जी कुत्री, मांजरे बहिष्कृतांचे उचिष्टच नव्हे तर त्यांच्या मुलांची विष्टा खावून गेल्यास वरिष्ठ म्हणून म्हणविणार्‍यांना त्याचा विटाळ होत नाही, ती त्यांच्या अंगावर लोळली, ताटात जेवली तरी हरकत नाही पण एखादा महार जर त्यांच्या घरी गेला तर तो अगोदर दरवाजाच्या बाहेर भिंतीजवळ उभा राहतो, परंतु इतक्यात जर त्या घर मालकाची त्याच्यावर नजर गेली तर तो एकदम जोराने ‘अरे रे दूर हो तू, त्या ठिकाणी मुलांची घाण टाकायचे खापर आहे, त्याला शिवशील’, पण या कर्णकर्कशने आमच्या बहिष्कृत बंधूच्या अंत:करणास कधी शिवले आहे की, माझी या खापरा पलिकडेही किंमत आहे? आज समताप्रिय इंग्रजांचे राज्य नसते तर कुत्र्या-मांजरापेक्षा किंबहुना घाण काढण्याच्या फुटक्या खापरापेक्षा असहाय्य हिन समजणार्‍यांनी आमचे काय केले असते? हे जग चालक प्रभू तू सर्वभुती वास करणारा आहेस ना? बहिष्कृत वर्गामध्येही तुझाही अंश नांदत आहे ना, मग तुझ्या या रुपकाचा आज अनेक शतकांपासून नित्यच आपला अपमान होत आहे याबद्दल तुला काही वाटत नाही का? तुझ्याच भक्तांनी कोणी कुणाचा अपमान साहू नये, म्हणून वेद-पुराणात सांगितले आहे ना, तुझेच भक्त कंठरवाने सांगत आहेत की, सुख हाच स्वर्ग, दु:ख तोच नरक मग आज या हिंदूभुवर हिंदू समाजात या हातभागी बहिष्कृत वर्गास सुख आहे का? त्यांना कुठेतरी मान आहे का? भजनात-पुजनात, किर्तनात, देवळात स्वत: तुझ्या दर्शनातही अंतर ना ? काशी, द्वारका, नाशिक, पंढरपूर इत्यादी सर्व ठिकाणी त्यांना दूरच हाणतात याची तुला लाज येत नाही का? वरील तीर्थक्षेत्रास धावून जाणार्‍या तुझ्या दर्शन तृशीतांचा अपमान व्हावा, हे तुला न्यायाचे दिसते का? का इतका तू निष्ठूर आहेस की, फक्त आमचीच तुला दया येऊ नये. बहिष्कृत तरुणांनो याचा विचार कराल का? नुसत्या टाळकुटीने किंवा पोती-पुराण वाजवल्याने तुमचा अपमान टळून तुम्हाला मोक्ष मिळेल? ज्या पुराणात अर्जुनाने निच म्हणताच बब्रुवाहन पुत्राने युद्ध केले ते कशासाठी? तर अपमान टाळण्यासाठीच ना, मातेने लाथ मारलेल्या लहान ध्रुव बाळाने आरण्यावास का पत्करला? लाथेचा अपमान सहन न होऊन कोपषमनार्थ त्याने ईश्‍वराचाच धावा केला ना?  रणामध्ये अभिमन्यूने जयद्रताला लाथ मारताच त्याने बाण टोचल्याप्रमाणे अकांत केला व अर्जुनाने उद्या जयद्रत्ताचा वध करील, असा पण केलेला ऐकून अभिमन्यूने प्राण सोडला. सैरेंद्री दासीला अपमान सहन न होऊन तिने किचकाचा प्राण घेविलाच ना, असे एक ना अनेक प्रश्‍न उपस्थित करत त्याकाळी बाबासाहेबांनी ‘सत्य आम्हा म्हणी, नव्हे घबाळ्याचे धनी, देतो तिक्ष्ण उत्तरे, पुढे व्हावियासे बरे’, असे लिखाण केले. 31 जानेवारी 1920 साली मुकनायक नावाचं पाक्षिक काढून अन्यायाविरुद्ध आणि वंचितांचा आवाज बनत बाबासाहेबांनी आपली लेखणी झिजवली. परंतु आज 101 वर्षानंतरही बाबासाहेबांच्या
  मुकनायकाची
  गरज
  तुम्हा-आम्हाला हवी वाटते. या शंभर वर्षांच्या कालखंडामध्ये अनेक बदल झाले, विज्ञानाच्या अविष्काराने प्रफुल्लीत झालेल्या आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात पत्रकारिता ही झपाट्याने फोपावली. परंतु आजची पत्रकारिता ही खरच वंचितांचे प्रश्‍न घेऊन समोर येतेय का? सत्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहते का? तर याचं उत्तर इलेक्ट्रॉनिक माध्यमांची भूमिका पाहितल्यानंतर ‘नाही’ आल्याशिवाय राहत नाही. आज 130 कोटींच्या देशामध्ये छूत-अछूतची बाब आपल्याला दिसून येत नसली तरी सत्तेसाठी आणि सत्यासाठी मात्र छूत-अछूतची बाब पदोपदी दिसून आल्याशिवाय राहत नाही. त्यावेळेस छूत-अछूतची बाब मोठ्या प्रमाणावर निदर्शनास येत होती म्हणून मुकनायकाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘स्वराज्याची सर सुराज्याला नाही, हे स्वराज्य नव्हे हे तर आमच्यावर राज्य, स्वराज्यातील आमचे आरोहण, त्याचे प्रमाण व त्यांची पद्धत राष्ट्रातील पक्ष, अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद, काक गर्जना, सिंह प्रतिबिंब, दास्योवलोकन, मागून आलेले लोण पुढे पोहचविणे, आमचा संदेश, उन्नतीचे साधन, हिंदी राष्ट्राची प्राणप्रतिष्ठा असे अनेक अग्रलेख लिहून त्या वेळेसच्या धर्म मार्तंडांच्या व्यवस्थेला सुरुंग लावले. व्यवस्थेला आव्हान दिले. दिन-दुबळ्या, मागास वंचितांचे आवाज बनले. त्या काळी जे बाबासाहेबांना करता आले किंवा केले आजतर बाबासाहेबांची घटना तुमच्या-आमच्या पाठिशी असताना, देश स्वातंत्र्य असताना आम्ही स्वराज्याची सर सुराज्याला नाही? हा सवाल का विचारत नाहीत. ‘हे
  स्वराज्य नव्हे तर
  आमच्यावर राज्य’
  हा प्रश्‍न तुम्हा-आम्हाला का पडत नाही. पत्रकारितेचा वसा घेतलेल्यांना जोपर्यंत प्रश्‍न पडणार नाहीत, तोपर्यंत कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, दिनदुबळ्यांसह वंचितांचे प्रश्‍न  त्यांना कळणार तरी कसे? आज स्वतंत्र भारतामध्ये कुठे ना कुठे सामाजिक विषमता असणारे प्रकार घडून येतात. कधी बाईपेक्षा गाईला महत्व दिल्याचे प्रकारही उघड होतात. तरीही तुम्हा-आम्हाला प्रश्‍न पडत नाही. ज्याच्याकडे जगाचा पोशिंदा म्हणून पाहितले जाते, अन्नदाता म्हणून पाहितले जाते त्याला उपजीविकेसाठी घाम गाळल्यानंतरही सरणावर जावे लागते. ज्या वेळेस या अन्नदात्याची शेती संकटात येते, त्याचं भविष्य संकटात असल्याचे त्याच्या लक्षात येते आणि तो आजच्या व्यवस्थेविरोधात, आजच्या सरकारविरोधात आवाज उठवतो, ‘हे स्वराज्य नव्हे आमच्यावर राज्य आहे,’ असं म्हणतो तेव्हा तोच शेतकरी नक्षलवादी, अतिरेकी, खलिस्तानवादी ठरतो. तरीही मुकनायकाचे वारसदार असणारे राज्य करणार्‍यांची री ओढतात. हे दुर्दैव नव्हे तर काय? सध्या दिल्लीत सुरू असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाकडे जर आपण पाहितले तर ते पोटतिडकीने आपलं भविष्य किती अंधारमय आहे, जे शेतीबाबत कायदे करण्यात आले आहेत, ते किती दुष्परिणाम करू शकतात, परावलंबी करू शकतात, हे ओरडून सांगत असताना इलेक्ट्रॉनिक माध्यमं मात्र शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांकडे या आवाजाकडे दुर्लक्ष करतात आणि कायदे किती चांगले आहेत हे बिंबवण्याचा प्रयत्न केवळ राजसत्तेच्या आदेशामुळे करतात तेव्हा मुकनायकाची गरज भासते. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी
  ‘मी या देशाचा
   मालक
   म्हणत देशातल्या उभयतांना घरा घरावर पाट्या लिहा ‘मी या देशाचा मालक आहे’, हे स्पष्टपणे सांगितलं आहे. आज जरी मुकनायक तुमचा आवाज बनत नसला तरी आजच्या तरुणाने स्वत: नायक बनने अधिक महत्वाचे आहे. होय, आम्ही या देशाचे नागरिक नव्हे तर मालक आहोत. राज्यात आणि केंद्रात जी व्यवस्था स्थापन आहे ती आमच्या मतांमधून निर्माण झाली आहे आणि त्या व्यवस्थेला आमचेच कोट कल्याण करावयाचे आहे हे ठणकावून सांगण्यासाठी आता तरुणांनी पुढं यायला हवं, तरुणांनी ‘मुकनायक’ व्हायला हवं, तर आणि तरच सत्यासाठी, न्यायासाठी, हक्कासाठी आपले देह चंदनासारखे झिजवणारे फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांचे फलित होईल. 

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!