कार्डधारकांना अर्धाच माल दिला जातो; दुकानदाराच्या अनागोंधीचा व्हिडीओ व्हायरल
बीड (रिपोर्टर) काळेगाव हवेली येथील राशन दुकानदार कार्डधारकांच्या नावे गहु, तांदळाची चिट्टी काढतो खरा मात्र जितक्या किलोची चिट्टी निघते त्यापेक्षा अर्धाच माल कार्डधारकांना वाटप करून सर्वसामान्यांची पिळवणूक होत असल्याचे समोर आले. याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. राशन दुकानदार कशा पध्दतीने कार्डधारकांची लुट करतात हे या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. याप्रकरणी पुरवठा विभाग आतातरी जागे होईल का? आणि दुकानदारावर कारवाई करेल का? अशी मागणी गावातील काही नागरिकांनी केली आहे.
काळेगाव हवेली येथे पवार आशाबाई हरिभाऊ यांच्या नावे राशन दुकान आहे. राशन दुकानावर नियमानुसार कार्डधारकांना गहु, तांदूळ मिळत नाही. राशनचा भ्रष्टाचार रोखण्यासाठी ई पॉझ मशिन प्रत्येक दुकानदाराकडे सक्तीची केली असली तरी यातही दुकानदार पळवाटा काढत आहे. कार्डधारकांच्या नावे चिट्टी काढली जाते, मात्र राशन वाटप करणारा दुकानदार चिट्टीच्या पाठीमागे माल किती द्यायचा हे लिहून देत असल्याने संबंधीत माल देणारा व्यक्ती अर्धाच माल देत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये कार्डधारक दुकानदाराची हुज्जत घालत आहेत. माल का कमी दिला जातो? असा प्रश्न विचारला जात असला तरी दुकानदार वरून माल कमी आला असल्याचे सांगून कार्डधारकांची दिशाभूल करत आहे. पुरवठा विभाग अशा राशन दुकानदाराविरोधात कारवाई करेल का? असा प्रश्न गावकर्यांनी उपस्थित केला असून याबाबत पुरवठा अधिकार्याने दखल घ्यावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे पवार उमेश रामनाथ यांनी केली आहे.