बीड (रिपोर्टर):- तालुक्यातील लिंबागणेश ते बेलगाव शीव रस्त्यावर शेतकर्याने पोकलेनच्या सहाय्याने रात्रीतून विहिर खोदली. पंढरपुरहून गावी येणारी एक महिला रात्री त्या विहिरीत पडल्याने गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी बीडमध्ये दाखल करण्यात आले आहे.
बेलगाव ते लिंबागणेश शीव रस्त्यालगत शेषेराव भीमराव तुपे यांची जमिन असून १ फेब्रुवारी रोजी त्यांनी रस्त्यावरच विहिरीचे खोदकाम केले. ग्रामस्थांनी रस्त्यावर विहिर खोदू नका अशी मागणी केल्यानंतरही त्यांनी ते काम सुरूच ठेवले. काल रात्री पंढरपुर आलेल्या सुदामती माणिकराव वायभट (वय ५०) या त्या शीव रस्त्याने येतांना विहिरीत पडल्या. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर शहरातील एका खासगी दवाखान्यात उपचार चालू आहेत. विहिर खोदकाम करणारे शेषेराव तुपे यांच्या म्हणण्यानुसार विहिर खोदकाम माझ्याच शेतात आहे. ग्रामस्थांच्या म्हण्यानुसार गेल्या ५० वर्षापासून हाच शीव रस्ता आम्हाला जाण्या येण्यासाठी आहे. संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी शेत मोजल्यानंतरच विहिर खोदा अशी भूमिका घेतल्याने विहिरीचे खोदकाम बंद करण्यात आले आहे.