गेवराई (रिपोर्टर)- मराठा आरक्षणासाठी गेवराई तालुक्यातील मालेगाव (खुर्द) येथे १ फेब्रुवारीपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला अनेकांनी पाठिंबा दर्शवत आंदोलनात सहभाग घेतलेला आहे. मालेगाव (खु.) येथील शेख रसूल हे मराठा आरक्षणासाठी आजपासून आमरण उपोषणाला बसले आहेत.
मराठा आरक्षणासाठी साष्टपिंपळगाव नंतर मालेगाव खुर्द येथेहीआंदोलन सुरू आहे. हे आंदोलन १ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आले. या आंदोलनस्थळी आतापर्यंत अनेकांनी भेटी देऊन आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शविला. मालेगाव खुर्द येथील शेख रसूल उस्मान यांनीही मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून पुढाकार घेत स्वत: आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. शेख रसूल यांनी मराठा समाजासाठी आंदोलन सुरू केल्याने त्यांचे सर्वस्तरातून कौतुक केले जाऊ लागले आहे.