केज, शिरूर, वडवणी, पाटोदा, आष्टी नगरपंचायतच्या मतदार याद्या १५ फेब्रुवारीला प्रसिद्ध होणार
बीड/केज (रिपोर्टर)- राज्यातल्या १३ नगर परिषदा व ८२ नगरपंचायतीच्या निवडणुका येत्या काही दिवसात होत असल्याने निवडणुकीच्या तयारीला स्थानिक प्रशासन लागले आहे. मतदान याद्या तयार करणे,त्याबाबतचे आक्षेप नोंदवणे यासह इतर कामे स्थानिक प्रशासन करणार आहे. १५ फेब्रुवारी २०२१ रोजी प्रभागनिहाय मतदार याद्या या ५ नगरपंचायत अंतर्गत प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. कोरोनाच्या संसर्गामुळे स्थानिक पातळीवरच्या निवडणुका घेण्यात आल्या नाहीत त्यामुळे राज्यातल्या मुदत संपलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतींवर प्रशासकाची नेमणुक आली आहे. येत्या काही दिवसांमध्ये राज्यातील १३ नगर परिषदा व ८२ नगरपंचायतींच्या निवडणुका घोषीत होणार असल्याने निवडणुकीची तयारी प्रत्येक नगरपंचायत प्रशासनाकडून केली जाऊ लागली. मतदार याद्या बनवण्यात आल्या असून त्या प्रभागनिहाय १५ फेब्रुवारी २०२१ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या १-३-२०२१ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे तर मतदार केंद्र निहाय मतदार याद्या ८ मार्च २०२१ रोजी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. बीड जिल्ह्यातील केज, वडवणी, शिरूर, आष्टी, पाटोदा या पाच नगरपंचायतींमध्ये निवडणुका होणार असल्याने येथील नगरपंचायत प्रशासनाने याद्या प्रसिद्ध करण्यासाठी तयारी सुरू केली आहे.