बीड (रिपोर्टर)- ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारमधील अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी परवा २०२१-२२ चा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर लागलीच तीन दिवसांनी पेट्रोल, डिझेल, गॅसचा भाववाढीचा भडका उडाला असून घरगुती गॅस तब्बल २५ रुपयांनी महाग झाला आहे. जो गॅस ७२० रुपयांना मिळायचा तो आता ७४५ वर जावून पोहचला असून बीडमध्ये पेट्रोल ९४.१२ पैसे तर डिझेल ८३.३० पैसे प्रतिलिटर झाले आहे. महागाईचा भडका उडत असल्याने सर्वसामान्यांचे बजेट मात्र पुर्णपणे कोलमडून जात आहे.
मोदी सरकारच्या दुसर्या टर्ममधील तिसरा अर्थसंकल्प गेल्या दोन दिवसांपुर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी लोकसभेत सादर केला. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर महागाईचा भडका उडणार हे निश्चित झाले. पेट्रोल, डिझेलवर कृषी कर आकारल्यामुळे पेट्रोल-डिझेलची भाववाढ होणार हे निश्चित असतानाच अर्थसंकल्पाच्या तिसर्या दिवशी इंधन दरवाढीचा भडका उडाला असून गॅसचे दर तब्बल २५ रुपयांनी आज वाढवण्यात आले आहेत. त्यामुळे बीडमध्ये ७२० रुपयाचा गॅस तब्बल ७४५ रुपयांपर्यंत गेला आहे. पेट्रोल आणि डिझेलचीही दरवाढ झाल्याने आज मितिला प्रतिलिटर पेट्रोल ९४.१२ पैसे तर डिझेल ८३.३० पैशाने सर्वसामान्यांना घ्यावा लागत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या भाववाढीने देशवासियांना प्रचंड महागाईला सामोरे जावे लागणार आहे. गॅसची दरवाढ तब्बल २५ रुपयांनी झाल्यामुळे सर्वसामान्यांच्या घरातले बजेट पुर्णत: कोसळले आहे. नव्या वर्षात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात विक्रमी वाढ होत आहे. त्यामुळे आता प्रचंड महागाई वाढणार हे उघड असून पेट्रोल, डिझेल दरवाढीचा परिणाम अनेक क्षेत्रामध्ये होतो. मालवाहतुकीचा खर्च वाढतो आणि प्रत्येक वस्तू महाग होत असते. येत्या महिन्यात महागाईचे चटके प्रत्येक क्षेत्राला बसणार आहेत.