Tuesday, May 17, 2022
No menu items!
Homeबीडकर्जबाजारी झालेल्या शेतकर्‍याने घेतला गळफास बँकेसह खासगी लोकांचे होते पैसे

कर्जबाजारी झालेल्या शेतकर्‍याने घेतला गळफास बँकेसह खासगी लोकांचे होते पैसे

गेवराई (रिपोर्टर):- शेतकरी आत्महत्याचे सत्र मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात सुरूच आहे. कालच एका शेतकर्‍याने विहिरीमध्ये उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना घडत नाही तोच रात्री पुन्हा एका शेतकर्‍याने गळफास घेवून आत्महत्या केल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. या शेतकर्‍याने कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली असल्याचे सांगण्यात आले. सदरील शेतकर्‍याकडे बँकेसह खासगी लोकांचे कर्ज होते. त्यामुळे त्याने आपली जीवनयात्रा संपवली आहे.

मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त आत्महत्या बीड जिल्ह्यामध्ये होत आहे. गेल्या काही महिन्यापुर्वी महाआघाडी सरकारने कर्जमाफीची घोषणा केली असली तरी आत्महत्येचे सत्र काही थांबलेले नाही. कालच गेवराई तालुक्यात एका शेतकर्‍याने विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली होती. या घटनेला काही तासाचा अवधी उलटत नाही तोच याच तालुक्यातील जातेगाव तांडा येथील विजय श्रीराम पवार (वय ५० वर्षे) या शेतकर्‍याने चिंचेच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. बँकेचे आणि खासगी लोकांचे पैसे असल्यामुळे शेतकर्‍यानी आत्महत्या केली असल्याचे समोर आले. दरम्यान केंद्र आणि राज्य सरकारचे शेतकरी विरोधी धोरणं असल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडत आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी ठोस उपाय योजना आखल्या जात नसल्यामुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्या होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान २०२० साली मराठवाड्यात सर्वात जास्त आत्महत्या बीड जिल्ह्यात झाल्याची नोंद सरकार दप्तरी करण्यात आली आहे. गेल्या २० वर्षापासून महाराष्ट्रात आत्महत्याचे सत्र सुरू असून चिंता व्यक्त केली जात आहे.

Most Popular

error: Content is protected !!