अंबाजोगाई येथील घटना, जखमीवर उपचार सुरू;
आरोपीविरोधात गुन्हा दाखल
बीड (रिपोर्टर)- अंबाजोगाई येथील डॉ. एस.एल. लहाने यांच्या मालकीच्या जागेत असलेल्या गॅरेज मालकास तहसीलदार यांच्या समक्ष मारहाण केल्याची घटना काल सायंकाळच्या दरम्यान घडली. यात सदरील गॅरेज चालक जखमी झाल्याने त्यास उपचारार्थ रुग्णालयात दाकल करण्यात आले आहे. या प्रकरणी अंबाजोगाई पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबाजोगाई येथील लातूर रोडवर सर्वे नं. 4617 मधील जागेसंदर्भात पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. जागेचा कब्जा आणि वस्तूस्थिती पाहण्यासाठी 6 फेब्रुवारी 2021 रोजी तहसीलदार बिपीन पाटील यांनी दुपारी बाराची वेळ दिली होती, मात्र ते सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी पाहणी करण्यासाठी आले होते. सदरील ठिकाणी गत काही वर्षांपासून असेल्या गॅरेज चालक महेश गाढवे यांना रघुनाथ माने (रा. बीड), रवी देशमुख, शैलेष चव्हाण, उमेश लकडे यांच्यासह इतरांनी मारहाण केली. तहसीलदार पाटील यांच्या समक्ष त्यांना मारहाण झाली. सदरील प्रकार सुरू असताना पाटील यांनी पोलिसांना पाचारण केले. जखमी गाढवे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी गाढवे यांच्या फिर्यादीवरून शैलेष चव्हाण, रघुनाथ माने, रवी देशमुख, उमेश लकडे यांच्यासह आदींवर कलम 324, 323, 143, 147, 148, 149 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.