बीड (रिपोर्टर) शिक्षण क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहेत. शिक्षणाचे खाजगीकरण केले आहे. शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागु करावी, प्रचलीत नियमानूसार विनाअनुदानीत शिक्षकांना अनुदान द्यावे, राज्यातील नागपूर आणि भंडारा या नगरपालिका आणि मनपाने कंत्राटी तत्वाने नव्याने शिक्षण स्वयंसेवक हे पद सुरू केले आहे ते तात्काळ बंद करावे या व इतर मागण्यासाठी 2 ऑक्टोबरला मराठवाडा शिक्षक संघाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकांचा विराट मोर्चा आयोजीत केला आहे.
या मोर्चासंदर्भात मराठवाडा शिक्षक संघाने नुकतीच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत संघटनेचे पी.एस.घाडगे, सरचिटणीस राजकुमार कदम यांनी या मोर्चा संदर्भात माहिती देताना पत्रकार परिषदेत सांगितले की, गेल्या 15 वर्षापासून वरिष्ट आणि कनिष्ट महाविद्यालयातून प्राध्यापकही कंत्राटी तत्वावर काम करतात. 2001 पासून राज्यातील 70 हजार शिक्षक विनावेतन काम करतात. काही शाळा आणि तुकड्यावरील शिक्षकांना प्रत्येक पाच वर्षाला वीस टक्के प्रमाणे चुकीच्या पध्दतीने अनुदान दिले जाते. हे अनुदान जुन्या पध्दतीने प्रचलीत नियमानुसार सुरू करावे. अंशदायी पेन्शन योजना रद्द करावी. जुनी पेन्शन योजना सुरू करावी. शिक्षकाणातील खाजगीकरण बंद करावे या व इतर मागण्यासाठी 2 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकणार आहे. अनेक शिक्षकांनी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही संयोजकांनी केले आहे.