Friday, May 20, 2022
No menu items!
Homeबीडछायांकित प्रतवर ‘एनएन’ची बोगसगिरी

छायांकित प्रतवर ‘एनएन’ची बोगसगिरी


एनए कर भरणा पावत्या संशयाच्या भोवर्‍यात, एनए झालेला नसतांना एनए कर भरून पावती दिल्याची मिळाली माहिती; कर भरलेल्या पावत्या तयार करण्यासाठी होते हजारो रूपयाची देवाण-घेवाण
बीड तहसील कार्यालयातून झालेल्या अनेक एनएची नोंद तहसील कार्यालयात नसल्याने बनावट एनए बनविणारी टोळी सक्रीय असल्याची शंका, नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान झालेल्या रजिस्ट्रीचे एनए तपासणीसाठी बीड तहसील कार्यालयात पाठवले असता ६० एनएची नोंद तहसील कार्यालयात नसल्याचे आले समोर
बोगस एनएच्या आधारावर तीन-तीन वेळा झाली प्लॉटची रजिस्ट्री, साक्षांकीत प्रत तपासणी करून किंवा तहसील कार्यालयात झालेल्या एनएची सहनिशा करून बोगसगिरी थांबविता आली असती
जर तीन महिन्यात ६० एनए बोगस तर गेल्या दहा वर्षात झालेल्या रजिस्ट्री (खरेदीखत) तपासणी केली तर अनेक जमिनी वादात येण्याची शक्यता
बोगस एनएचे प्रकरण समोर असतांनाच कमी बाजारमुल्य दाखवून जमिनी रजिस्ट्री झाल्याची मिळाली माहिती; उच्चस्तरीय चौकशीची गरज, शासनाला लाखो रूपयांचा भुर्दंड
औरंगाबाद येथील डीआयजी पथकाने बीड निबंधक कार्यालयात झालेल्या खरेदीखताची तपासणी केली असता ५४ खरेदीखत निगेटीव्ह असल्याचे आले समोर
बोगस एनए प्रकरणात अनेक निष्पाप पक्षकार अडकलेले, प्रशासनाने आता गुंठेवारीचा मार्ग काढुन दिलासा द्यावा; सध्या रजिस्ट्री कार्यालयातील सर्व व्यवहार ठप्प
भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे ऍड.अजित देशमुख यांनी बोगस एनएचा मुद्दा उपस्थित करून मागितली माहिती, एनएमधील बोगसगिरी व एनए कर भरणा पावत्या संदर्भात रिपोर्टरने केला पाठपुरावा
शासकीय मुल्यांकनाप्रमाणे खरेदीखत होत असले तरी जमिनी खरेदी विक्रीचा करोडो रूपयाचा ओरिजनल व्यवहार गुलदस्त्यात; शासनाला बाजार मुल्य दाखवून होतो अंधारातून व्यवहार
एखाद्या दुसर्‍या एनएमध्ये खाडाखोड करून जे खरेदीखत तयार करायचे त्या खरेदीखतावरील नाव झेरॉक्सच्या माध्यमाने दुसर्‍याच्या एनएमध्ये ऍड करून बोगस एनए तयार करून देणारी टोळी सक्रीय
एनएच्या धसक्याने पाई-पाई जमा करून टिचभर जागा खरेदी करणारे हैराण, प्रशासनानेच त्यांना खरेदीखत करून दिले; चुक कोणाची?
एनए पडताळणीत जिल्ह्यातील सर्व कामे रूकलेली, लाखो रूपयाचा व्यवहार ठप्प, अनेकांना पैसा अडकल्याची भिती
सन १९९४-९५ साली जमिनीच्या खरेदी विक्रीसाठी वापरण्यात येणारे बॉंड बोगस असल्याचे समोर आले होते. याप्रकरणात करीम तेलगी नावाचा व्यक्ती बोगस बॉंड तयार करून विक्री करत असल्याचे समोर आल्यानंतर संपुर्ण भारतात हाहाकार माजला होता. संबंधिताला पोलीसांनी ताब्यात घेतल्यानंतरही बॉंड तयार करणार्‍या यंत्राशिवाय इतर कोणताही पुरावा पोलीसांना सापडला नसल्याने हे प्रकरण आले तसे थांबले. संबंधित तेलगी यांना या प्रकरणात शिक्षा झाली. करोडो रूपयांच्या बॉंड व्यवहारात झालेला भ्रष्टाचार एक-दोन राजकीय नेते यांच्यासह तेलगी नावाच्या व्यक्तीवर येवून संपला. यानंतर मात्र राज्य शासनाने काळजीपुर्वक लक्ष देवून बॉंड विक्री संदर्भात लक्ष दिल्याने त्यानंतर मात्र बोगस बॉंड प्रकरणसारखे कांड नंतर झाले नाही. या प्रकरणाचा विसर पडला असला तरी आता पुन्हा बोगस एनएच्या आधारावर अनेक रजिस्ट्री (खरेदीखत) झाल्याचे समोर आले असून भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे ऍड.अजित देशमुख यांनी बोगस एनए प्रकरणाला वाचा फोडून बोगस एनए झाल्याचे समोर आणून दिले. परंतू हे एनए बोगस कसे झाले? फक्त एनएच बोगस झाले का? हे बोगस एनए तयार करतांना प्रशासनाचे कोणकोणते विभाग, त्या विभागातील कोणकोणते कर्मचारी अडकलेले आहेत की एखादी टोळी या प्रकरणात सक्रीय आहे की काय? असे अनेक प्रश्‍न निरूत्तरीत होते. यासंदर्भात रिपोर्टरच्या प्रतिनिधीने पाठपुरावा केला असता बोगस एनएसह कमी बाजार मुल्यांकन दाखवून जमिनीचे व्यवहार झाल्याचेही समोर आले. एवढेच नव्हे तर एनए करण्यासाठी एनए कर भरणा करावा लागतो. त्या एनए कराच्या पावत्या संशयाच्या भोवर्‍यात असून आता बोगस एनए सोबत एनए कर भरलेल्या पावत्याही प्रशासनाने तपासणी करावे यातही मोठे भ्रष्टाचार झाला असल्याची माहिती मिळाली असून प्रशासनाने बोगस रजिस्ट्री संदर्भात हयगय न करता संबंधितांकडून दंड वसुल करणे व अधिकार्‍यांवर कारवाई करणे अत्यंत गरजेचे असून बोगस एनएला जर लगाम लावायची असेलतर साक्षांकीत प्रत शिवाय एनए करू नये असे सक्तीचे नियम लागू करण्याची अत्यंत गरज आहे. जेनेकरून भविष्यात गोरगरीब जनतेला ज्यांनी पाई-पाई गोळा करून टिचभर जमिन खरेदी केली अशांना त्रास होणार नाही. यासाठी प्रशासनाने गुंठेवारी संदर्भात विचार करावा जेणेकरून जिल्ह्यातील जमिनीचा व्यवहार पुन्हा पुर्वीप्रमाणे सुरळीत होईल. सध्या बीड रजिस्ट्री कार्यालयातील सर्व व्यवहार बंद असून गोरगरीब जनतेसह मोठे व्यापारी जे प्लॉटिंगचा व्यवसाय करतात त्यांचा मोठ्या प्रमाणात पैसा अडकल्याने एका प्रकारची या एनएमुळे भिती निर्माण झाली आहे. आता प्रशासनाने योग्य ते मार्ग काढुन जनतेला न्याय द्यावा अशी मागणी होत आहे.
बोगस एनए प्रकरणात बीड तहसील कार्यालयात बीड निबंधक कार्यालयातून झालेल्या गेल्या तीन महिन्याच्या रजिस्ट्री व त्याचे एनए तपासले असता ६० एनएची नोंद बीड तहसील कार्यालयात नसल्याने हे एनए बोगस झाले असल्याचे दिसून येत आहे. यात एखाद्या दुसर्‍या एनएमध्ये खाडाखोड करून जे खरेदीखत तयार करायचे त्या खरेदीखतावरील नाव झेरॉक्सच्या माध्यमाने दुसर्‍याच्या एनएमध्ये ऍड करून बोगस एनए तयार करून देणारी टोळी सक्रीय आहे की काय? अशी चर्चा असून खरेदीखत तयार करतांना एनएच्या छायांकित प्रतवरच निबंधक विभागाने रजिस्ट्री केली असल्याने बोगस एनएला पेव फुटले. जर निबंधक कार्यालयातील अधिकारी, कर्मचार्‍यांनी साक्षांकित प्रतशिवाय किंवा रजिस्ट्रीसोबत जे एनए जोडले गेले होते त्या एनएची कॉपी त्याचवेळी तहसील कार्यालयातून पडताळणी करून घेतली असती तर बोगस एनएला त्याचवेळी लगाम लागला असता. परंतू संबंधित विभागाने डोळे झाक करून छायांकित प्रतवर खरेदीखत तयार केले असल्याने बोगसगिरी झाल्याचे समोर आले आहे. एवढेच नव्हे तर बाजार मुल्यांकनापेक्षा कमी दराने खरेदीखत तयार केले असल्याची बाब औरंगाबाद येथील डिआयजी पथकाला समजल्यानंतर त्यांनी बीड रजिस्ट्री कार्यालयात झालेल्या खरेदी खताची पहाणी केली असता ५४ खरेदीखत निगेटीव्ह असल्याचे समोर आले. यात कमी बाजार मुल्यांकन दाखवून रजिस्ट्री करून दिले असल्याची गंभीर बाब समोर आली. या अनुषंगाने संबंधित पथकाने बीड निबंधक कार्यालयातील कर्मचार्‍यांना या ५४ व्यक्तींकडून वसुली करण्याचे आदेश दिल्यानंतर सध्या या ५४ व्यक्तींकडून वसुली सुरू आहे. एकंदरीत बीड रजिस्ट्री कार्यालयाने या सर्व बाबीकडे नियमाने लक्ष दिले असते तर बोगसगिरी थांबली असती परंतू आर्थिक व्यवहारातून एनएच्या बोगसगिरीला बढावा दिल्याचे दिसून येत आहे. हे सर्व प्रकरण समोर असतांना रिपोर्टरच्या प्रतिनिधीने फक्त एनएच बोगस झाले का? या संदर्भात पाठपुरावा केला असता एनए कर भरणा पावत्याही संशयाच्या भोवर्‍यात दिसून येत आहे. या सर्व प्रकरणाची प्रशासनाने आपल्यास्तरावर चौकशी करावी जेनेकरून गोरगरीब जनतेला न्याय मिळेल व बीड निबंधक कार्यालयातील कारोभार पुर्णत: सुरळीत सुर होईल.

कर भरणा पावत्या संशयाच्या भोवर्‍यात
एनए करण्यापुर्वी एनए कर भरणे गरजेचे आहे, एनए कर भरल्यानंतरच एनए होते. यासाठी तलाठी यांच्याकडून एनए कर भरून पावती घेणे गरजेचे आहे. परंतू बीड रजिस्ट्री कार्यालयात गेल्यानंतर असे निदर्शनास आले की ज्या प्लॉटचे एनएच झाले नाही अशा प्लॉटचेही एनए कर भरून घेतल्याच्या पावत्या रिपोर्टरच्या हाती लागल्या. तसेच काही पावत्यामधील रक्कम अक्षरी एक नोंद केलेली व आकड्यामध्ये दुसरी रक्कम टाकलेली दिसून आली. याचाच अर्थ कर भरणा पावत्या संशयाच्या भोवर्‍यात असून कर भरणा पावत्या देण्यासाठी हजारो रूपयाची घेवाण-देवाण होत असल्याचेही समोर आले आहे. जर एनएच झालेला नाही तर मग त्या प्लॉटची एनए कर पावती दिली कशी? पावतीमधील रक्कमेत खाडाखोड हा एकूण प्रकार संशयाच्या भोवर्‍यात असून कर भरणा पावत्या संबंधित विभागच्या अंगलट येणार यात काही शंका नाही.

बीड तहसील कार्यालयात नोंदच नाही
नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यात झालेले खरेदीखत व त्या खरेदीखतासोबत जोडलेले अनेक एनए बोगस असल्याचा प्रश्‍न ऍड.अजित देशमुख यांनी उपस्थित केला. या अनुषंगाने बीड निबंधक कार्यालयात गेल्या तीन महिन्यात झालेल्या खरेदीखताचे एनए तपासणीसाठी बीड तहसील कार्यालयात पाठविले असता त्यापैकी ६० एनएची नोंद बीड तहसील कार्यालयात नसल्याने एकच खळबळ उडाली. हे एनए झेरॉक्स प्रतच्या सहाय्याने तयार केली असल्याची बाब समोर आली असून एका तीन महिन्यात ६० एनए बोगस झाल्याचे किंवा तहसीलमध्ये नोंद नसल्याचे समोर आले. तर मग गेल्या दहा वर्षाचे खरेदीखत तयार झालेले तपासले तर हजारो खरेदी खतासोबत असलेले एनए बोगस असतील यात काही शंका नाही. यासाठी प्रशासनाने बोगसगिरी थांबवायची असेल तर यापुढे साक्षांकित प्रतशिवाय किंवा तहसील कार्यालयात सहनिशा केल्याशिवाय रजिस्ट्री करू नये आणि ज्या रजिस्ट्री आत्तापर्यंत झालेल्या आहेत त्यांच्यासाठी गुंठेवारीचा मार्ग काढावा जेनेकरून पक्षकारांना दिलासा मिळेल.

कमी बाजार मुल्यांकन व करोडोचा व्यवहार
औरंगाबादच्या डीआयजी पथकाने बीड निबंधक कार्यालयात कमी बाजार मुल्यांकन दाखवून खरेदीखत तयार केले असल्याचे समोर आणून दिले. त्यानंतर बीड निबंधक कार्यालयाने संबंधिताकडून वसुली केली असली तरी कमी बाजार मुल्यांकन दाखवून रजिस्ट्री केल्या कशा? याची चौकशी करावी तसेच डीआयजी पथकाने ५४ रजिस्ट्री निगेटीव्ह असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. त्यामुळे या पथकाने पुर्वी झालेल्या गेल्या दहा वर्षाच्या खरेदीखत तपासणी करावी जेणेकरून वसुलीच्या माध्यमाने प्रशासनाला लाभ मिळेल. विशेष म्हणजे निबंधक कार्यालय बाजार मुल्यांकनाकडे लक्ष देवून खरेदीखत करून देतात परंतू ज्या जमिनीचा व्यवहार शासकीय बाजार मुल्यांकनाअंतर्गत कार्यालयात होतो तोच व्यवहार खर्‍या अर्थाने करोडोचा असतो. प्रशासनाला मात्र बाजार मुल्यांकनाच्या नियमाने लाभ भेटतो. खर्‍या अर्थाने रजिस्ट्रीचा झालेला व्यवहार पाहिला तर प्रशासनाला लाखो रूपयाचा चुना लागतो.

गुंठ्ठेवारी एकमेव पर्याय
आज जे एनए बोगस असल्याचे समोर आलेले आहेत त्या एनएवर दोन-दोन, चार-चार वेळा रजिस्ट्री करण्यात आलेल्या आहेत. त्यावेळी या एनएची सहनिशा केली नसल्याने सर्व काही सुरळीत चलत होते. परंतू आता बोगस एनए प्रकरण समोर आल्याने सर्वांनाच याची धास्ती बसली आहे. खरेदी विक्री व्यवहार एनएत अडकून गेला असून ज्या रजिस्ट्री निबंधक कार्यालयातून झाल्या त्या रजिस्ट्री आता बोगस कशा? याचा प्रशासनानेच विचार करावा. यात खरेदी करणार्‍या किंवा विक्री करणार्‍या पक्षकाराचा काही एक संबंध नाही. ज्या रजिस्ट्री निबंधक कार्यालयातून झाल्या याच्यावर विश्‍वास ठेवूनच जनतेने खरेदी विक्री व्यवहार केला. मग यात या जनतेचा काय दोष म्हणून प्रशासनाने या एनए प्रकरणावर उपाय म्हणून गुठ्ठेवारी लावणे हा एकमेव पर्याय असून गुंठ्ठेवारी संदर्भात पक्षकारही सहमती देतील अशी चर्चा सर्वसामान्यातून होत आहे.

Most Popular

error: Content is protected !!