Friday, May 20, 2022
No menu items!
Homeबीडधान्य न उचलणार्‍या ८ लाख शिधापत्रिका धारकांची होणार तपासणी

धान्य न उचलणार्‍या ८ लाख शिधापत्रिका धारकांची होणार तपासणी


बीड (रिपोर्टर)- ऑगस्ट ते डिसेंबर २०२० या कालावधीत राज्यातील जवळपास ७ लाख ९० हजार शिधापत्रिका धारकांनी धान्याची उचल केली नसल्याचे समोर आले असून त्यामुळे ५ महिने धान्य न उचलणार्‍यांच्या शिधापत्रिका अपात्र, बोगस, अनुत्सुक असल्याची शक्यता निर्माण झाली असून अशा शिधापत्रिका धारकांची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले. एवढ्या मोठ्या संख्येने धान्य न उचलणार्‍या शिधापत्रिका धारक असतील तर त्यांची शिधापत्रिका रद्द अथवा अपात्र होऊन नविन पात्र लाभार्थ्यांना धान्य मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संगणकीकरण प्रकल्पाअंतर्गत राज्यात आधार आधारीत ई-पॉस प्रणाली यशस्वीपणे सुरू आहे. या प्रणालीद्वारे संगणकीकृत लाभार्थ्यांची बायोमेट्रिक ओळख पटवून शिधा वस्तूचे वाटप करण्यात येते मात्र ऑगस्ट ते डिसेंबर २०२० या कालावधीचा आढावा घेतला असता ७ लाख ९० हजार शिधापत्रिका धारकांनी धान्याच उचलले नसल्याचे दिसून आले आहे. दुसरीकडे धान्याची उचल न झाल्यामुळे राज्याचे एकूण धान्य उचलीचे प्रमाण ८८ ते ९० टक्केच्या दरम्यान मर्यादीत राहत आहे. राज्याला दिलेल्या ७.१६ लक्ष उद्दीष्टाइतके लाभार्थी आरसीएमएस प्रणालीद्वारे संगणकीकृत झाल्याने नवीन लाभार्थ्यांची नोंदी आरसीएमएस प्रणाली वर करता येत नाही त्यामुळे अपत्रा लाभार्थ्यांना वगळल्याशिवाय नवीन पात्र लाभार्थ्यांची निवड करणे शक्य नसते, असे समजते.

Most Popular

error: Content is protected !!