बीड (रिपोर्टर)- नैसर्गिक वाढीच्या वर्ग तुकड्यांवरील शिक्षकांना निधीसह अनुदान मंजूर करण्यात यावे या मागणीसाठी संभाजी ब्रिगेड बीड प्रणीत शिक्षक व कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे. यासह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येत आहे. आज सोमवार असल्याने आज आंदोलनाने जिल्हधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेले होते.
सन २०१२-१३ च्या नैसर्गिक वाढीच्या वर्ग तुकड्यांवर सुमारे १५ ते २० हजार शिक्षक कार्यरत आहेत. सदरील शिक्षक हे सुमारे १० ते १५ वर्षांपासून विनावेतन इमानदारीने काम करत असून आजपर्यंत शासनाने यावर कुठलीही ठोस भूमिका घेतलेली नाही. शिक्षकांना न्याय द्यावा या मागणीसाठी संभाजी ब्रिगेट शिक्षक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येत आहे. या वेळी श्रीकांत बागलाने, गणेश शिंदे, मनोज कवडे, उमेश पवार, गोवर्धन पवार, सचिन कदम सह आदींची उपस्थिती आहे.
तर दुसरं आंदोलन रस्त्यासाठी सुरू आहे. मिरगणे वस्तीला रस्ता नसल्याने भाऊसाहेब मिरगणे, शिवराम मिरगणे यांच्यासह इतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत आहेत. पाटोदा तालुक्यातील पारगाव घुमरा येथील पंडुदास रंगनाथ साठे यांचे आंदोलन सुरू आहे. जातीवाचक शिवीगाळ करून जबरदस्तीने शेतातील ज्वारीचे पिक चोरून नेले असून या प्रकरणात कारवाई करावी, अशी मागणी साठे यांची आहे. चौथे आंदोलन सामाजिक वनीकरणातील गैरप्रकाराबाबत आहे. वन विभागातील तेलंग यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी व मजुरांचे थकित वेतन तात्काळ द्यावे या मागणीसाठी गणेश ढवळे, शेख यूनुस, शिवशंकर भोसले, गवळी विलास, महंमद खान, कातखडे यांचे धरणे आंदोलन सुरू आहे. या सर्व आंदोलनांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून गेला होता.