शासनाला लाखो रुपयांचा चुना -के.के. वडमारे
बीड (रिपोर्टर):- डॉक्टर मंडळीला प्रसंगी देवही मानलं जातं, मात्र ही डॉक्टर मंडळी रुग्णांच्या टाळूवरचं लोणीही खायला मागं-पुढं बघत नाहीत, असाच प्रकार बीड शहरातील ८ डॉक्टरांनी आणि खासगी ट्रॅव्हल्स एजन्सी यांनी शासनाच्या राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमात लाखो रुपये बेकायदेशीररित्या कमवत शासनाच्या सर्वच नियमांना बगल दिली आहे. यामध्ये जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेनेही आपले हात धुवून घेतले. त्यामुळे ट्रॅव्हल्स एजन्सी सोबतच डॉक्टरांवरही गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी पुढे येत आहे.
राज्यस्तरीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातर्ंगत बीड जिल्ह्यातील अंगणवाडीतील बालकांची तपासणी करण्यासाठी ३९ चारचाकी गाड्या या प्रकल्पातर्ंगत अमर टूर्स ऍण्ड ट्रॅव्हल्स एजन्सी पाटोदा या संस्थेला टेंडर देण्यात आले. टेंडर देताना गाडी ही सहा वर्षांच्या आतील असावी, गाडीची पासिंग ही ४+१ अशी असावी, महिन्यात किमान दीड हजार किलोमीटर गाडी चालली पाहिजे. अशा टेंडर देतानाच्या अटी ह्या एजन्सीला घालण्यात आलेल्या आहेत. मात्र हा टूर्स ऍण्ड ट्रॅव्हल्सच्या चालक-मालक यांनी आपली चतुराई दाखवत इतरांच्या गाड्या या स्वत:च्या एजन्सीच्या मालकीच्या असल्याचे दाखविल्या. टेंडर पदरात पाडून घेतल्यानंतर टेंडरमधील सर्व अटींना हरताळ फासत जी डॉक्टर मंडळी या बालकांची तपासणी करते अशा डॉक्टरांना पटवत त्यांच्याकडील गाड्या महिना १५ हजार रुपये दराने आपल्या एजन्सीला लावल्या. या डॉक्टर मंडळाच्या गाड्या ह्या स्वत:ची इंडिगो, ऑल्टो, स्विफ्ट डिझायर ज्या गाड्यांची आरटीओ पासिंग ३+१ असताना किरायने लावल्या. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातून या टूर्स ऍण्ड ट्रॅव्हल्सला एका गाडी मागे २० हजार रुपये भाडे दिले जाते. गाड्या १३ वर्षांपुर्वीच्या जुन्या, वास्तविक पाहता ४+१ ची अट असताना ३+१ पासिंगच्या गाड्या वापरण्यात आल्या. ज्यांच्या गाड्या वापरल्या ती सर्व डॉक्टर मंडळी शासकीय सेवेत आहेत. त्यामुळे वरपासून ते खालपर्यंत या बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचा चक्का बोजवारा उडाला आहे. पाटोदा येथील अमर टूर्स ऍण्ड ट्रॅव्हल्स या कंपनीच्या संचालकाने आणि बीड शहरातील जी आठ डॉक्टर मंडळी आहे त्यामध्ये डॉ. सारंगकर (एम.एच. २३-५५६४), डॉ. शहाणे (एम.एच. २३-८२४२), डॉ. नालपे (एम.एच. १६-१६०४), डॉ. गुंजाळ (एम.एच. २३-५२२), डॉ. बोंद्रे (एम.एच. ४४-५६५१), डॉ. साबळे (एम.एच. ४४-जी-५२६५), डॉ. मोराळे (एम.एच. २३ -एडी २७८४) आणि डॉ. आंधळे राजू (एम.एच. ११-एके-१४३९) यांनी शासनाला फसवत लाखो रुपयांचा चुना लावला आहे. कोव्हीडच्या काळात या गाड्या बंद असतानाही एप्रिल २०२० पर्यंतचे या गाड्यांना पेमेंट दिलेले आहे. या सर्वांची कसून चौकशी करत या टूर्स ऍण्ड ट्रॅव्हल्स एजन्सीला काळ्या यादीत टाकण्या सोबतच या डॉक्टर मंडळीवरही गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
सीएस, डीएचओ यांचे कानावर हात
ही योजना जिल्हा शल्यचिकित्सक ज्यांच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी हेही या समितीवर आहेत. या बाबत जिल्हा शल्यचिकित्सक यांना विचारले असता हा सर्व प्रकार माझ्या कानावर आलेला आहे, मी चौकशी करून सांगतो, तुम्ही जे म्हणता, त्यात तथ्य आहे पण मला चौकशी करावी लागेल, असे म्हणत कानावर हात ठेवले तर जिल्हा आरोग्य अधिकारी यांनीही ‘मी फक्त या समितीवर आहे, तुम्ही म्हणताय, तो सर्व प्रकार बरोबर असून याबाबतची टेंडर प्रक्रिया राज्यस्तरावरून होते, त्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही, तरीही मी या बाबत नियमाला बगल देऊन या गाड्या चालवण्यात येत असल्याबाबत तीन वेळा शासनाला पत्र लिहिले आहे, असे सांगितले.
डॉक्टरांवर गुन्हे दाखल करा, ट्रॅव्हल्स एजन्सीला ब्लॅकलिस्ट करा
राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमात ज्या डॉक्टरांच्या गाड्या वापरण्यात येत आहेत ते डॉक्टर स्वत: या गाड्या वापरत आहेत. नाव मिशनचे आणि वापर स्वत:साठी करतात. त्यामुळे या डॉक्टरांवर गुन्हे दाखल करून त्यांचे डॉक्टरकीचे लायसेन्स रद्द करावे आणि अमर टूर्स ऍण्ड ट्रॅव्हल्स या एजन्सीचे लासेन्स रद्द करून ब्लॅकलिस्ट करावे, सोबत या गाड्यांवर जो खर्च झाला आहे ती रक्कम वसूल करावी, अशी मागणी केे.के. वडमारे यांनी केली आहे.